विभाग नववा : ई-अंशुमान
ईस्ट इंडीज - ब्रिटिश, डच, फ्रेंच व पोर्तुगीज असे चार ईस्ट इंडीज विभाग आहेत. पूर्वीं हिंदुस्थान, फर्दर इंडिया व मलाया आर्चिपेलॅगो या समूहाला ईस्ट इंडीज म्हणत; कारण ज्यावेळीं वेस्ट इंडीजचा शोध लागला त्यावेळीं तो हिंदुस्थानचा पश्विम भाग असावा असा समज होता. हल्लीं हिंदुस्थानांतील ब्रिटिश मुलुखाला ब्रिटिश ईस्ट इंडीज, फ्रेंच मुलुखाला फ्रेंच ईस्ट इंडीज व पोर्तुगीज मुलुखाला पोर्तुगीज ईस्ट इंडीज म्हणतात. कधीं कधीं फक्त मलाया आर्चिपेलॅगोलाच ईस्ट इंडीज म्हणतात; व या प्रदेशांतील जावा, सुमात्रा वगैरे डच लोकांच्या मुलुखाला साधारणत:“डच ईस्ट इंडीज”म्हणतात. [ स्टेट्समन्स ईयर बुक ]