विभाग नववा : ई-अंशुमान
ईस्टर – ईस्टर हा ख्रिश्चन लोकांचा प्रमुख वार्षिक उत्सव आहे. येशू ख्रिस्ताच्या ‘पुनरुत्थाना’च्या स्मरणार्थ हा उत्सव पाळण्यांत येतो. हा आनंदाचा उत्सव असल्याकारणानें, या वेळीं उपासनामंदिरें, व मंदिरांतील वेदी निरनिराळ्या सुंदर पुष्पांनीं व उत्तम दागिन्यांनीं सजविल्या जातात. पाद्री व इतर ख्रिस्ती लोक पावित्र्य, आनंद इत्यादि गुणांची दर्शक अशीं शुभ्र वस्त्रें परिधान करितात; जिकडे तिकडे रोषणाई करण्यांत येते.
ईस्टर हें नांव ट्यूटन लोकांच्या पुराणांतरी आढळून येतें व वारांच्या नांवाप्रमाणेंच हेंहि नांव त्या पुराणांपासून घेतलेलें आहे.‘ईस्टर’हा शब्द ईओस्ट्रे अगर ओस्टार या वसंत देवतेच्या नांवापासून बनलेला आहे. या वसंत देवतेचा महिना एप्रिल हा आहे व त्याला‘ईस्टर’महिना असें संबोधण्यांत येते. ‘ईस्टर’उत्सवाचें मूळ हिब्रू लोकांच्या ‘पासोव्हर’उत्सवांत आढळून येतें असें कांहींचें मत आहे, व तें बर्याच अंशानें खरेंहि आहे. पण या हिब्रू व ज्यू लोकांच्या ‘पासोव्हर’ (निर्याण) उत्सवांत ख्रिश्चन लोकांनीं ‘ख्रिस्त हा स्वार्थत्याग व सोशीकपाचें उत्कृष्ट उदाहरण आहे व त्याला कधींच मरण नाहीं’या नवीनच कल्पनेची भर घातली व या उत्सवाला नवीन वळण लावलें. अशा रीतीने पासोव्हरचें झालेलें रूपांतर म्हणजेच ख्रिश्चन लोकांचा ईस्टर उत्सव होय.
ईस्टर उत्सवाचा उल्लेख ‘नवा करार’अगर‘ प्रेषितांचे ग्रंथ’यांत आढळत नाहीं. तरी पण हा उत्सव पाळण्याची चाल, फार प्रचीन आहे यांत शंका नाहीं. पूर्वींपासूनच हा उत्सव केव्हां व कसा पाळला जावा यासंबंधीं अनेक भांडणें उपस्थित झालीं होतीं. ज्यू जातीचे ख्रिश्चन लोक ईस्टर मास सुरू होण्याचा पहिला दिवस उपवास म्हणून पाळीत तर ‘जंटाईल’ख्रिश्चन हे ईस्टर आठवडा सुरू होण्याचा पहिला दिवस उपवासाचा मानीत. पश्चिमेकडील ख्रिस्ती मंडळी ईस्टर आठवड्याचा पहिला दिवस पाळीत, तर पूर्वेकडील ख्रिस्ती मंडळी ईस्टर महिन्याचा पहिला दिवस पाळीत. या संबंधीचा निकाल लागण्याकरितां, कान्स्टंटाइन बादशहानें ३२५ सालीं एक सभा बोलाविली. त्या सभेंत ईस्टरचा उत्सव, ईस्टर आठवड्यांतील रविवारींच पाळावा. व सर्व जगांत त्याच दिवशीं हा उत्सव पाळला जावा असें ठरविलें; हा रविवार कोणत्या तारखेला पडतो हें ठरविण्याचें व जाहीर करण्याचें काम अलेक्झांड्रिया येथील धर्मगुरूकडे सोंपविण्यांत आलें. वसंतसंपातानंतरच्या पौर्णिमेनंतरच्या पहिल्या आठवड्याचा रविवार हा ईस्टर उत्सवाचा मुख्य दिवस ठरला. पण निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या वेळीं वसंत संपात होत असल्यानें हा मुख्य दिवस देखील निरनिराळ्या तारखेस पडूं लागला. अद्यापि देखील पूर्वेकडील ख्रिस्ती मंडळांत व पश्चिमेकडील ख्रिस्ती मंडळांत हा फरक दृष्टीस पडतो.
ईस्टर उत्सवाचे चार भाग पडतात. (१) ईस्टर सुरू होण्यापूर्वींचा चाळीस दिवसाचा उपवास. (२) ईस्टरच्या पूर्वींचा रविवार व नंतरचा रविवार या मधील १५ दिवसांचा काळ; या अवधींत ईस्टर उत्सवाचे जे प्रमुख विधी ते करण्यांत येतात. (३) ऑक्टेव्ह ऑफ ईस्टर; या अवधींत बॉप्तिस्मा घेणारे नवे लोक शुभ्रवस्त्रें परिधान करतात. (४) ईस्टरटाईड - हा खरा ईस्टरचा काल होय. या कालांत उपासनामंदिरांत मोठा उत्सव साजरा केला जातो.
हा उत्सव धार्मिक स्वरूपाचा असल्यानें या उत्सवामध्यें आचाराचें बरेंच स्तोम माजलें असल्यास त्यांत आश्चर्य नाहीं. प्रार्थनामंदिरांत वेदीवर चढतांना पहिल्या पायरीच्या जवळ उत्तर दिशेला एक भली मोठी मेणबत्ती रोंवून ठेवण्याची प्रमुख वहिवाट या उत्सवांत आढळून येते. कांहीं ठिकाणीं पायरीच्या मधोमध हा दिवा ठेवण्याची चाल आहे. या दिव्याला बाजूबाजूनें लहान लहान नळ्या लावल्या असून त्यांतहि एकेक मेणबत्ती खोंवलेली असते. हे मेणबत्तीचे दिवे कांहीं प्रार्थनामंदिरांत चांदीचेहि केलेले आढळतात. ज्या प्रार्थनामंदिराला पैशाची उणीव नसेल त्याठिकाणींच असले चांदीचे दिवे असणार हें उघड आहे. ईस्टरच्या उत्सवांत हा मेणबत्तीचा दिवा अहोरात्र लावण्याची, रोमनकॅथॉलिक प्रार्थनामंदिरांची चाल आहे.
लौ कि क आ चा र – मध्ययुगांत ईस्टरमध्यें लोक अनेक आचार पाळीत, पण ते पुढें पुढें बंद होत गेले. कैद्यांना बंधसुक्त करणें, गरीबांनां दानधर्म करणें, देवस्थानांतून भोजन घालणें यांसारख्या गोष्टी त्यावेळीं होत. हल्लीं सुद्धां ईस्टर हा लग्नाला सुमुहूर्त समजतात. रशियामध्यें अद्याप ईस्टरमधील आदितवारी एकमेकांचें चुंबन घेऊन व तोंडानें‘ख्रिस्त अवतरला आहे’असें म्हणून एकमेकांनां सलामी देतात. ईस्टरअंडी देण्याची चाल सार्वत्रिक आहे. ओस्टारा (वसंत) देवीच्या प्राचीन उपासनेचा अवशेष म्हणून ही अंड्यांची कल्पना दिसते. हल्लीं हीं अंडीं साखरेचीं किंवा चाकोलेटचीं करितात. तीं भरींव किंवा पोकळ असून त्यांचा आकार वाटेल तेवढा लहानमोठा असतो. कधीं कधीं हीं अंडीं पुठ्ठ्यायाचीं किंवा लांकडांचीं करून त्यांत मिठाई किंवा मुलांचीं खेळणीं भरतात. रशियांत शेतकरी लोक ईस्टरच्या दिवशीं कोंबडींचीं अंडीं चांगलीं उकळून त्यांनां भपकेदार रंग फांसतात व तीं रस्त्यातून गडगडत सोडतात. ईस्टरच्या मागचा लेंटचा सहा आठवड्यांचा काळ सन्यस्तवृत्तीनें रहाण्याचा म्हणून मानला जात असल्यानें ईस्टरचा मोसम केवळ मजा करण्याचा अशी लोकांची समजूत आहे.
[ सं द र्भ ग्रं थ – विंगहॅम-दि अँटिक्विटीज ऑफ दि ख्रिश्चन चर्च; बेडे – एक्लिझियास्टिकल हिस्टरी ऑफ इंग्लंड; ब्रँड-पॉप्यूलर अँटिक्विटीज; चेंबर-बुक ऑफ डेज; एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका भाग ८; एनसायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँड एथिक्स भाग ५. ]