विभाग नववा : ई-अंशुमान
ईस्टर बेट – रापानुयी. दक्षिण पॅसिफिक महासागराच्या पूर्व भागांत दक्षिण अक्षांश २७ ८’व पश्चिम रेखांश १०९० २८’यांवर हें बेट वसलें आहे. याचा आकार साधारणत: तिकोनी आहे; व त्याच्या तीन कोनावर तीन ज्वालामुखी पर्वतशृंग आहेत. क्षेत्रफळ ४५ चौरस मैल. बेटाच्या किनार्यांवर एकहि उत्तम बंदर नाहीं. सुपीक जमीन पुष्कळच असून हवा बरीच सर्द आहे.
कधीं कधीं नकाशांत ईस्टर बेटाला डेव्हिस बेट म्हटलेलें आढळतें, पण १६८६ मध्यें डेव्हिसनें रापानुयी खरेंच संशोधिलें कीं नाहीं यासंबंधीं निश्चयपूर्वक कांहीं सांगतां येत नाहीं. १७२२ सालच्या ईस्टरच्या दिवशीं (ता. ६ एप्रिल ) अॅडमिलर रॉगेव्ही या ठिकाणीं येऊन पोंहोचला. १७७४ त कॅप्टन कुकनें पुन: हें संशोधून याला टीपी किंवा वैहु असें नांव दिलें. यानंतर एक दोन संशोधक येथें आले होते. रॉगेव्ही आला तेव्हां बेटावर बहुधां पॉलिनेशियन वंशाचे सुमारें दोन तीन हजार लोक होते. आपण रापाइटी किंवा उपारो या प्रदेशांतून आलों असें ते सांगत. १८६३ मध्यें पेरुव्हियन लोकांनीं येथील पुष्कळसे लोक धरून चिंचा बेटावर काम करण्यास नेले. पुढील सालीं एक जेसुइट मिशन येथें येऊन त्यांनीं पुष्कळशा लोकांनां ख्रिस्ती बनविलें. १८६८ त रापानुयींची संख्या ९०० होती पण १८८६ मध्यें ती सारी १५५ भरली.
ईस्टर बेट हें प्राचीन अवशेषांवरून फार प्रसिद्ध आहे. मोठमोठ्या घडीव दगडाचे सिमेंटनें जोडल्याशिवाय तयार केलेले पुष्कळसे चौथरे येथें सांपडले आहेत. समुद्र कांठीं असलेल्या चौथर्यांवर बांधलेल्या कांहीं भिंती ३० फूट उंच, २०० ते ३०० फूट लांब व ३० फूट रुंद आहेत. मोठमोठे दगडी पुतळेहि पुष्कळ सांपडले आहेत. हल्लीं बेटावर राहणार्या लोकांनां या अवशेषांची पूर्व माहिती नाहीं.
येथील लोक उंचीला कमी असतात. बायका पुरुषांपेक्षां सुंदर दिसतात. मुलें लहान असतांना यूरोपियनाप्रमाणें दिसतात पण पुढें मोठीं झाल्यावर तीं काळीं पडतात. गोंदून घेण्याची चाल सध्यां कमी झाली आहे. इतर पॉलेनेशियन जातींपेक्षां यांचा नैतिक दर्जा उच्च म्हणतां येईल. मादक पेयें मुळींच प्रचारांत नाहींत. चोरी करणें हें अनीतीचें लक्षण मानण्यांत येत नसे. चोरी पचली नाहीं तर तो ईश्वरी कोप समजत. लग्नापूर्वींचें वदफैली वर्तन फारसें विचारांत घेत नसत. लग्नानंतर नवर्याला आपली बायको दुसर्याला उसनी किंवा विकत देण्याची पूर्ण मुभा असे. तथापि जारकर्माला देहांत शासन असे. घटस्फोट नवरा बायकोच्या संमतीनें करण्यांत येई. या लोकांतील करमणुकीच्या खेळांत पायापेक्षां हातांचा जास्त उपयोग करण्यांत येतो. उत्सवप्रसंगीं करण्यांत येणारा हूला-हूला नाच शृंगारिक आहे.
प्राचीनकाळीं ईस्टर बेटांत एकतंत्री राज्यकारभार असे. राजघराणें मोठें पूज्य मानून, अस्वस्थतेच्या काळांतहि त्याला कोणी धक्का लावण्यास धजत नसे. १८६३ त पेरुव्हियन लोकांनीं तेथील राजा व मुख्य मंडळी यांनां पकडून ठार मारिलें. तेव्हांपासून कोणतीहि एक सर्वमान्य सत्ता अस्तित्वांत नाहीं. या बेटाचे प्राचीन रहिवाशी मृतांनां कधीं कधीं पुरण्यापूर्वीं प्राणी वगैरेंनां खाण्याकरितां उघड्यावर टाकीत. परवांपर्यंत नरमांस भक्षण यांच्यात रूढ असे. तथापि ते धार्मिक विध्यनुसार नसे. या लोकांची भाषा पॉलिनेशियन असून त्या द्वीपसमूहांतील याच बेटांत फक्त वर्णमाला आढळते.
यांचा मुख्य देव मेके मेके असून, त्याचा आकार पक्ष्यासारखा दाखवितात. देवळें मुळींच नाहींत. मंत्र, ताईत वगैरे प्रकार आहेतच. भुतांराक्षसांची यांनां भीति वाटते. सुंता किंवा तद्वाचक शब्द यांच्यांत नाहीं.
[ सं द र्भ वा ङ्म य – थॉम्सन – टे पिटो टे हेनुआ ऑर ईस्टर आयलंड (रिपोर्ट ऑफ दि युनायटेड स्टेट्स नॅशनल म्यूझियम, १८८९); १८९७ सालच्या याच रिपोर्टांतील कुकचा लेख; ए. रि. ए. मधील फ्लारेन्स ग्रेचा‘ईस्टर आयलंड’ हा लेख रापानुयी लोकांची चांगली माहिती करून देईल ]