विभाग नववा : ई-अंशुमान
ईस्टविक्, एडवर्ड बॅक् हाऊस (१८१४-१८८३) – पौरस्त्य वाङ्मयविशारद. अँग्लो इंडियन. चार्टर हाऊस आणि ऑक्सफोर्ड या ठिकाणीं शिक्षण झाल्यावर १८३६ त यानें मुंबई रिसाल्यांत नोकरी धरली; परंतु वाङ्मयाकडेच याचा कल असल्यामुळें याला लवकरच राजकीय कारभारांत घेतलें. १८४३ त ‘किस्सोइ संजान’ (पारशांच्या हिंदुस्थानांतील आगमनाचा इतिहास) या फारशी ग्रंथाचें भांषांतर यानें केलें व बाँबे एशिआटिक सोसायटीच्या नियतकालिकांतून‘लाईफ ऑफ झोरॉस्टर’ (झोरास्टरचें चरित्र), सिंधी शब्दकोश व निरनिराळे लेख लिहिले. आजारपणामुळें यूरोपांत असतां फ्रँकपोर्ट येथें तो जर्मन भाषा शिकला व त्यानें शेलरचें‘रोव्होल्ट ऑफ दि नेदरलंडस’, (नेदर्लंड लोकांचें बंड) आणि बॉपचे‘कंपॅरेटिव्ह ग्रामर’ (तुलनात्मक व्याकरण) या पुस्तकांचीं भाषांतरें केलीं. १८४५ त त्याला हेलेबेरी कॉलेजांत हिंदुस्थानी भाषेचा प्रोफेसर नेमिलें. पुढें दोन वर्षांनीं त्याचें हिंदुस्थानी व्याकरण प्रसिद्ध झालें. यानंतर गुलिस्तानची गद्यपद्य भाषांतरासहित नवी आवृत्ति,‘प्रेमसागर’ ची हिंदी भाषांतरासहित एक आवृत्ति आणि‘बाग ओबहार’ व बिदपयीचें‘अन्वार-इ-सुहाइली’ यांचीं भाषांतरें त्यानें प्रसिद्ध केलीं. १८५१ त त्याला रॉयल सोसायटीचा फेलो निवडण्यांत आलें. १८५७-५८ त‘दि ऑटोबायोग्राफी ऑफ लुथ फुल्ला’ (लुथफुल्लाचें आत्मचरित्र) त्यानें छापलें. दक्षिणी भाषेंत बायबल सोसायटीकरितां‘बुक ऑफ जेनेसेस’ छापलें. १८६० पासून ते ६३ पर्यंत तो इराणांत ब्रिटीश वकिलातीबरोबर चिटणीस म्हणून होता. तेथून परत आल्यावर ‘दी जर्नल ऑफ दि डिप्लोमेट’हें पुस्तक लिहिलें. १८६६ त हिंदुस्थानच्या स्टेट सेक्रेटरीचा तो प्रायव्हेट सेक्रेटरी झाला, व १८६७ त सरकारी कामाकरितां व्हेनेझुएला येथें गेला; परत आल्यावर चार्लस डिकन्सच्या विनंतीवरून त्यानें ‘स्केचेस ऑफ लाइफ इन साउथ अमेरिकन रिपब्लिक’ हा लेख लिहिला. १८६८-७४ पर्यंत तो पेनरिन आणि फालमाउथ यांच्या वतीनें पार्लमेंटचा सभासद होता. १८७५ त ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीकडून त्याला एम. ए. ची पदवी मिळाली. निरनिराळ्या वेळीं त्यानें मरेचीं अनेक‘इन्डियन हँडबुक्स’ लिहिलीं. त्याचा शेवटला ग्रंथ म्हणजे‘केसर नामा-इ-हिंद’ हा होय. ऑईल ऑफ वाइट मधील व्हेंट नोर या ठिकाणीं तो मृत्यु पावला.