विभाग नववा : ई-अंशुमान
ईक्षणयंत्र - या यंत्रास ईक्षण-यंत्र किंवा आरसाहि म्हणतां येईल. पण अलीकडे आरसा हा शब्द प्रचारांत, कांचेच्या आरशास (कांचेच्या पाठीस पारा लावून केलेला) लाविला जातो. पण ईक्षण-यंत्रांतील आरसा कांचेचा नसून तो एक धातूचा पत्रा असून, त्यावरून किरणांचें योग्य तर्हेनें पृथक्करण होण्याकरतां तो घांसून घासून चांगला चकचकीत केलेला असतो. प्रारंभीं हा तांबें व जस्त यांच्या मिश्रणांत तें पांढरें होण्याकरतां थोडेसें आर्सेनिक म्हणजे ताल (हा एक सोमलांतील धातु आहे) घालून यांच्या मिश्रणापासून जो धातु होतो त्याचें करीत असत. त्याचा उपयोग परावर्तक दुर्बिणींत (रिफ्लेक्टिंग टेलेस्कोप) करतात. शस्त्रक्रियेच्या वेळीं अंतरिंद्रियें पाहाण्याकरतां निरनिराळ्या ईक्षण-यंत्रांचा उपयोग करतात.
र च ना. – सर ऐझॅक न्यूटनच्या वेळेपासून आतांपर्यंत धातु-दर्पणाच्या कृतींत बराच फरक झाला आहे. चांदी, जस्त, निकेल किंवा आर्सेनिक यांचे निरनिराळ्या प्रमाणांत निरनिराळे मिश्र धातू वरील दर्पणास चांगले उपयोगी होतील, असें पुष्कळदां सुचविलें गेलें; पण प्रचारांत जास्त उत्तम असा मिश्र धातु २५२ भाग तांब्यांत ११७.८ भाग कथील मिळवून जो धातू होतो तोच चांगला ठरला आहे. अशा तर्हेचा धातु कठिण पण ठिसूळ होऊन त्याचा पृष्ठभाग घासून चांगला चकचकीत, गुळगुळीत, स्वच्छ होतो च त्याला ओलावा लांगूं दिला नाहीं तर तो विटतहि नाहीं. बाह्य गोलभिंग (लेन्स) तयार करण्यास जीं हत्यारें लागतात तींच हत्यारें हा आरसा तयार करण्यास उपयोगी पडतात. परावर्तक भागाला हळू हळू गोलाकार देत देत नंतर शेवटीं त्याचें परवलय तयार करतात.
यानंतर लवकरच कांचेच्या पृष्ठभागावर रजतक्षारा (सिल्व्हर साल्ट) मार्फत शुद्ध रजताचा मुलामा देण्याची पद्धत लीबिग नांवाच्या शास्त्रज्ञाला सांपडली. व त्यामुळें कांचेचे आरसे तयार होऊन या धातूंच्या आरशास मागें पडावें लागलें. धातूच्या आरशाकरतां केलेला धातु कितीहि चांगला असला तरी तो नासणार नाहीं असें कधींच सांगतां येणार नाहीं. एवढेंच नव्हे तर या दर्पणाच्या सहाय्यानें जर बराच वेळ काम केलें तर त्याचा चकचकीतपणा कमी होऊन त्याला पुन्हां जिल्हई द्यावी लागते, व अशा तर्हेनें बराच त्रास पडून अखेर तो शास्त्रीय निरीक्षणाकरतां त्याच्या पूर्वींच्या स्थितींत रहात नाहीं. त्याचें केन्द्रान्तर (फोकल लेंग्थ) बदलतें च त्यामुळें सूक्ष्ममापक वगैरेंतहि सुधारणा करणें भाग पडलें. याच कारणामुळें अलीकडे परावर्तक दुर्बिणीला धातुदर्पण वापरण्याऐवजीं कांचेचाच आरसा वापरण्याकडे विशेष प्रवृत्ति आहे (पण याला अपवाद म्हणून सर विल्यम ह्युजिन्स नामक शास्त्रज्ञाच्या वुलसेहिल नांवाच्या वेधशाळेंतील दुर्बिणींतील अठरा इंची धातूचा आरसा तयार केल्यापासून म्हणजे १८७० पासून तों तहत आजपर्यंत बिलकुल बिघडला नाहीं. व त्याला पुन्हां घांसावेंहि लागलें नाहीं. आणि याच आरशाच्या सहाय्यानें त्यानें निरनिराळे महत्त्वाचे वेध घेतले आहेत. त्याचप्रमाणें दुसरे सहा इंची आरसेहि आजपर्यंत जसेच्या तसेच चकचकीत आहेत). हर्शेल, रास, लॅसेल, व डीलास वगैरे शास्त्रज्ञांनीं धातूचेच आरसे वापरले पण ते त्यांनीं स्वत:च तयार करून घेतले होते.
कांचेच्या आरशाची जर यांशीं तुलना केली तर कांच धातूपेक्षां बरीच स्वस्त असून तिला पारा लावण्यास खर्च बराच कमी लागतो. त्याचप्रमाणें ती हलकी असून तिच्यावर कामहि सहज तर्हेनें करतां येतें. याशिवाय कांचेच्या आरशाची तेजोधारणाशक्ति धातूच्या आरश्यापेक्षां जास्त आहे तरी पण दूरदर्शक व्यास सारखाच असेल तर पदार्थाभिमुख कांचेच्या तेजोधारणाशक्तीपेक्षां आरशाची तेजोधारणाशक्ति कमी येईल. कांहीं चुकीच्या तुलनेमुळें फोकाल्ट नांवाच्या शास्त्रज्ञानें तेजोधारणाशक्तिच्या बाबतींत धातूचा आरसा कांचेच्या आरश्यापेक्षां जास्त पसंत केला होता. पण सर डेव्हिडमिलनें स्वानुभवानें असें दाखविलें कीं, १२ इंच दूरदर्शक व्यासाचा १० इंच दूरदर्शक व्यास असलेल्या वक्रीभवन करणार्यापेक्षां चांगला असतो. पण यांचा आकार जर जास्त मोठा झाला तर, मोठ्या पदार्थाभिमुख कांचेच्या जास्त जाडपणामुळें, आणि त्यामुळें होणार्या जास्त उजेडाच्या शोधनामुळें वर सांगितलेलें प्रमाण मोठमोठ्या कांचांच्या बाबतींत जवळ जवळ सारखें होतें.
रो स वि ल्य म पा र्स न (१८००-१८६७) यानें के ले ला धा तू चा आ र सा. – प्रथम विल्यम हर्शेल यानें बर्याच मोठ्या प्रमाणावर परावर्तक दुर्बिणी तयार केल्या, पण यानें त्यांच्या आकृतीसंबंधीं कांहींच प्रसिद्ध न केल्यामुळें अर्थातच त्याच्यामागून रोसला, धातूच्या आरशाच्या कृतीबद्दल श्रेय मिळालें. रोसनें १२६.४ भाग तांबें व ५८.९ भाग कथील घालून आरशाकरितां धातु तयार केला. त्याच्या निरनिराळ्या पट्टया करून त्या तीन फूट लांबींत सोळा बसविल्या, त्या बसविण्याकरितां २.७५ भाग तांबें व १ भाग जस्त याचें मिश्रण करून एक हलका धातु तयार केला व त्याच्या चौकटींत वरील पट्टया बसविल्या. या दोन्हीहि धातूंचे प्रसरणगुणक सारखेच आहेत. १८२८ च्या‘एडिंबरो जर्मल ऑफ सायन्स’ मध्यें त्यानें हा धातु घोटण्याच्या यंत्राचें वर्णन सविस्तर दिलें आहे. घोटणारा, आरसा फिरत असतांना, आरशावर सरळ लंबपार्श्व अशा दोन्हीहि गतीन फिरतो. आरसा व घोटणारा, यांना समकेंद्रांतून काढलें असतां; घोटणारा लंबवर्तुळांत फिरूं लागतो; पण त्याची केंद्रच्युति फार थोडी असते; अशा तर्हेनें खरी खरी परवलय रचना मिळते. १८३९ च्या सप्टेंबरमध्यें एक तीन फूट आरसा तयार करून तो दुर्बिणींत बसविला; त्यामुळें साधारण चांगलीं प्रतिबिंबें मिळालीं, व त्याची चौकटहि कांहीं विवक्षित असल्यामुळें वातावरणांतील उष्णतेच्या वगैरे फरकास तो लागलीच अनुरूप होत असे. यानंतर तीन फुटी घन आरसा करण्याचा रोसनें विचार केला. आतांपर्यंत घन आरसा तयार करण्यांत अशी एक अडचण होती कीं, तो हळू हळू आकुंचन पावत नसून त्याच्या बाजू एकदम आकुंचन पावतात व नंतर मध्य भागावर दाब पडून कधीं कधीं त्याला भेगा पडतात. हा घन तुकडा सारखा थंड होण्याकरतां ज्यांच्यांत या धातूचा रस ओतावयाचा त्या सांच्याचें बूड त्यानें ‘हूप’ लोखंडाचें (लोखंडाची एक जात) केलें व बाजू वाळूच्या करून त्यांचें तोंड उघडें ठेविलें, व अशा तर्हेनें वरील अडचण दूर करून भेगा किंवा रंध्र न पडतां त्यानें एक ३ फूटी घन तुकडा तयार केला. या लोखंडांत धातु थंड होत असतांना त्यांतून जो वायू निघेल, तो बाहेर जाऊं देण्याची शक्ती किंवा सोय असते. १८४० मध्यें ३ फूटी आरसा तयार झाल्यानंतर १८४२ सालीं याच पद्धतीनें त्यानें ६ इंच व्यासाचा दुसरा एक आरसा तयार केला व १८४५ त हा प्रर्वतक दुर्बिणींत बसवून दुर्बीण तयार केली. या यंत्राचें केन्द्रांतर ५४ फूट आहे. या दुर्बिणींतून‘ओरायन’ (मृगशीर्ष) च्या तेजोमेघाचे त्यानें वेध घेतले.
हर्शेल किंवा रासे यांनीं तयार केलेल्या या धातूच्या आरशासारखे आरसे किंवा यांत्रिकद्दष्टया त्यापेक्षांहि पूर्णत्वास गेलेले असे नष्ट झालेल्या पांपी शहरच्या अवशेषांत सांपडले. त्याचप्रमाणें सौरेनस नांवाच्या वैद्यकशास्त्रज्ञाजवळ हे ईक्षणयंत्र होतें.