विभाग नववा : ई-अंशुमानउ – नागरी लिपींतील पांचवें अक्षर. याला हल्लीचें स्वरूप प्राप्त होण्याला चार अवस्थांतून जावें लागलें. पहिली अवस्था अशोकच्या गिरनार येथील शिलालेखांत (ख्रि. पू. ३ र्या शतकांतील) दृष्टीस पडते; तर दुसरी ख्रि. पू. पहिल्या शतकांतील मथुरेच्या लेखांत अंकित झाली आहे. तिसरी अवस्था दुसरींतील खालच्या रेघेला बांक पडून घडली आहे हें उघड दिसतें. चवथें वळण इ. स. ५३२ तील राजा यशोधर्म याच्या वेळच्या मंदोसर लेखांतलें आहे. आजचा उ इ. स. ८३७ च्या जोधपूर लेखांत स्पष्ट व वळणदार असा पहावयास मिळेल. [ प्राचीन लिपिमाला. ] *(पुस्तकातील लिपिमालेची आकृती येथे टाकणे.)