विभाग नववा : ई-अंशुमान
उखाणे – उखाणे म्हणजे स्त्रियांचें प्राकृत काव्य. मराठी वाङ्मयाचे जे निरनिराळे संप्रदाय आहेत त्यांमध्यें उखाण्यांचाहि समावेश होतो. विवाहाच्या मंगल कार्यांत, नवर्यानें बायकोचें, व बायकोनें नवर्याचें नांव घेतांना, ते नांव नुसतें न घेतां, इतर प्रासयुक्त वाक्यांचा उपयोग करून तद्वारां तें नांव घेणें याला उखाणा असें म्हणण्याची चाल आहे. लग्नांत विहिणीविहिणी एकमेकींनां उखाणे घालून उणेंपुरें काढतात व स्पष्ट नव्हे परंतु व्यंगोक्तिद्वारा त्यांनां नांवे ठेवितात. विहिणीपेक्षां करवल्याकडेसच हें काम सोंपविलेलें असतें.
मराठी भाषेंत जे उखाणे आढळतात त्यांचें वर्गीकरण केल्यास उखाण्यांचे दोन वर्ग पडतात. (१) साधे उखाणे व (२) कूट उखाणे. कूट उखाण्यांचें उदाहरण – तांबडी पालखी हिरवा दांडा आंत बसल्या बोडक्या रांडा (उत्तर – मिरचीचे बीं). ‘सप्त शृंगें जयाचे शिरीं तो प्रहर रात्रीं गर्जना करी, त्याचा शब्द ऐकोनिया नारी, भ्रतारातें त्यागिती’ (उत्तर – कोंबडा). अशा प्रकारचे कूट उखाणे, म्हणीवजा असतात असें म्हटल्यास हरकत नाही. आशेचें वर्णन,‘पतिव्रता भली पण सारा मुलूख पालथा घाली. असें केलें आहे तें म्हणी वजा आहे. कांहीं कांहीं उखाण्यांत फारच कल्पकता असते. ‘एवडासा करंडा त्यांत मोगर्यांच्या रांगा ( उ. डाळिंब );‘एवढीशी टिटवी सगळें तळें आटवीं (उ. दिव्याची वात ). कांहीं उखाण्यांत निरनिराळ्या वस्तूंचें सूक्ष्म विवेचन केलेलेंहि आढळतें :- उदा. वार्याचें वर्णन पहा. ‘रंग नाहीं रूप नाहीं आभाळ म्हणशील काय? आदि नाहीं अंत नाहीं देव म्हणशील काय? आभाळ भूत देव नाहीं विचार करतोस काय? सांग मला नांव प्राणी व जीव निघून जाय ! संस्कृत भाषेंतहि उखाण्यांसारखे पुष्कळ कूट श्लोक आहेत. परिस्थितीप्रमाणें नवीन तर्हेचे उखाणे घेण्याचीहि पद्धत आहे. उदाहरण –‘लो. टिळकांनां लागला स्वराज्याचा छंद, X X चें नांव घेतें तोंड करा बंद’;‘येरवड्याच्या तुरुंगाला पडला देशभक्तांचा वेढा X X च्या तोंडांत घालते पेढा’; इंग्रजी भाषेंतील शब्दहि प्रास साधण्यासाठीं घेण्याची पद्धत पडलेली दिसते. उदा. ‘इंग्रजी भाषेंत चंद्राला म्हणतात मून, X X X चें नांव घेते X ची सून;’ इंग्रजीं भाषेंत, पाण्याला म्हणतात वाटर X X चें नांव घेते X X X ची डाटर इत्यादि. ब्राम्हणांच्या लग्नांत विहीण जेवीत असतांना, जीं उखाण्याच्या द्वारां उत्तरेंप्रत्युतरें होतात तीं मासाल्याकरितां पुढें दिलीं आहेत.
समोर होता कोनाडा त्यांत होता तवा, रुसूं नका, फुगू नका, सावकास जेवा. चंदनाच्या पाटावर ठेवला पाय, सावकास जेवायला केलेंत काय ? समोर होता कोनाडा, त्यांत होता गडू, सावकास जेवायला केले बुंदीचे लाडू. मांडवाचे दारीं होता चाफा, नवर्या मुलीकडच्या करवल्या कलावंतिणीचा ताफा.
पुढील कुळंबाऊ उखाण्यांतून काव्य भरलेलें आहे. एखाद्या साध्या माणसाची बायको सुद्धां आपल्या नवर्याला गौरवून त्याच्या पदरीं पडल्यानें आपल्याला धन्य समजत आहे. या प्रकारचे उखाणे घेतांना व ऐकतांना मनाला आल्हाद झाल्यावांचून राहात नाहीं.‘झुणुक झुणुक जात होते, खिडकीवाटे पाहत होते, हा डौल कोणाचा, आबाजीच्या पोटचा, व्हनजीच्या पाठचा, चक्रीमुंडाशाचे बाळुपाटील भ्रतार आमचा. मुली फुगड्या खेळतांनाहि एकमेकींवर उखाणे घेतांत. उदा. ‘आपट्याचें झाड माझ्या झपाट्याखालीं, मामाची लेक माझ्या डाव्या हाताखालीं.’