विभाग नववा : ई-अंशुमान
उचले व भामटे – उचले, भामटे अथवा गांठ चोर म्हणून एक चोरांचा प्रकार आहे. या लोकांची वस्ती पुणें जिल्ह्यांतील भिमथडी, हवेली, खेड आणि शिरूर ह्या तालुक्यांतून आहे. हे लोक तेलगू मुलखांतून इकडे आले असावे. कारण त्यांची घरगुती बोलण्याची भाषा मोडकी-तोडकी तेलगूच असून पुष्कळशा बायकापुरुषांचीं नांवें दक्षिणेकडील नांवांप्रमाणेंच असतात. पुणें जिल्ह्याखेरीज हे लोक महाराष्ट्र, वर्हाड व गुजराथ या प्रांतांतील कित्येक ठिकाणीं आढळतात. या लोकांनीं मूळ देश केव्हां व कां सोडला यांची त्यांनां कल्पना नाहीं. व आपण दक्षिणेकडील द्राविड जातीपैकीं आहों याचीहि त्यांनां जाणीव नाहीं. पांच सहा पिढ्या इकडे पुणें जिल्ह्यांत रहात आहों असें हे लोक सांगतात; व ही गोष्ट बहुधा खरी असावी. पुण्याकडील उचल्यांनाच भामटे म्हणतात. परंतु वास्तविक भामटे हे दक्षिणेकडून आलेले नसून उत्तरेकडून आलेले आहेत. ते रजपूत जातीपैकीं आहेत, कारण द्राविडी जातीचे उचले व रजपुती जातींतील भामटे यांच्या शरीराच्या ठेवणीमध्यें फार फरक आहे. रजपुती भामट्यांचे शरीरावयव रेखीव व सुरेख असतात. त्यांचा रंग गौर असतो. आणि हे शरीरानें बांधेसूद भक्कम आणि चपळ असतात. हे भामटे लोक निरनिराळे वेष करितात. कांहीं वर्षें सतत एक प्रकारचाच वेष कायम ठेवून शेंकडों मैल दूरदूरच्या खेड्यापाड्यांत जाऊन तेथें ज्या तर्हेचा स्वत:चा वेष असेल तशाच प्रकारचा पोषाख करणार्या लोकांच्या घरांत शिरून चोर्या करतात. कित्येक वेळां स्वत:चें व रहात्या खेड्याचें खोटेंच नांव सांगून एकाद्या मोठ्या व्यापाराच्या किंवा धनिकाच्या घरीं त्याच्याच जातीसारखा वेष घेऊन नोकरी धरितात. प्रथम कांहीं दिवस नोकरी मोठ्या इमानानें करून धन्याचा विश्वास संपादतात. आणि नंतर संधि साधून पुष्कळसें धनद्रव्य व मालमत्ता चोरून पळून जातात.
खुद्द पुणें शहरांत या उचल्यांचा व भामट्यांचा फार सुळसुळाट होता. शिवाय आसपासच्या वडगांव, फुग्याची वाडी, पाबळ, बोपुडी, कणेरसर, कोंढवें, मुंढवें, तळेगांव इत्यादि खेड्यांतहि हे आढळतात. पुण्याच्या उचल्यांमध्यें बहुतेक गायकवाड व जाधव हीं दोनच आडनांवे असतात. या उचल्यांच्या जातींत महार, मांग इत्यादि अस्पृश्य जातींखेरीज इतर कोणाहि हिंदू, व मुसुलमान इसमाचा प्रवेश होतो. अशा उचल्यांच्या टोळींत ब्राह्मण, मारवाडी, वाणी, सोनार, शिंपी इत्यादि उच्च व मध्यम जातींचे हिंदू आढळून आलेले आहेत. व उचले बनलेले इसम आपल्या जातींतून नवे नवे लोक मिळवीत असतात. उचल्यांमध्यें गायकवाड व जाधव हीं दोनच आडनांवें असण्याचें कारण सदर्हू जातींतले मूळ इसम या दोन आडनांवांच्या घराण्यांत नोकरील असून पुढें त्यांनीं आपल्या मालकांचीं आडनांवें घेतलीं असावीं असा एक तर्क आहे. उचल्यांच्या जातींचे मूळपुरुष या दोन घराण्यांतले होते, असें हे लोक सांगतात.
या जातींत शिरणार्या माणसाला बराच विधि करावा लागतो. प्रथम जातीची जमात करून सर्वांची परवानगी मिळवावी लागते. व प्रवेश फी म्हणून १५ त २५ पर्यंत रुपये द्यावे लागतात. नंतर दुसर्या दिवशीं या नव्या इसमाला आंघोळ घालून नवा पोषाख देतात. नंतर एक वृद्ध उचल्या त्याच्या तोंडांत हळद व साखर यांची चिमूट टाकतो. पुढें सर्वांचें जेवण होतें, त्यांत हा नवा इसम व दोन तीन वृद्ध उचले एका ताटांत बसून जेवतात. अशा रीतीनें हा विधि संपतो. नव्या इसमाला कोणत्या तरी एका आडनांवाचे पुरुष आपला कुटुंबी करून घेतात व नंतर दुसर्या आडनांवाचा इसम आपली मुलगी देऊन त्याचें लग्न करतो. या सर्व समारंभांत वाजंत्री, पानसुपारी वगैरे औपचारिक गोष्टी असतात.
या जातींत पुढील नांवें आढळतात. पुरुषवाचक :- बापू, चिनाप्पा, चंद्र्या, धाग्या, एलाप्पा, गिडाप्पा, गितु, कुशाण्णा, फकिर्या, रामा, सखा व सिराळ्या इत्यादि. स्त्रीवाचक:- आकू, भागी, धोंडी, एल्ली, मुक्ती, मरी, राई, रमी, रख्मी, सखी व तुकी इत्यादि. पुण्यांतले उचले कृष्णवर्णीय व द्राविड किंवा तेलगू लोकांच्या चेहर्याचे असतात. असें सांगतात कीं, हे लोक मारखाण्याची अगोदर पुष्कळ संवय करून घेतात. त्यामुळें पकडला गेलेल्या उचल्याला कितीहि मारहाण केली तरी त्याच्या डोळ्यांतून पाण्याचा टिपुसहि निघत नाहीं. आणि कबुली जबाब कधीं मिळत नाहीं.
हे लोक मोठमोठ्या मिशा, कल्ले, कानावर झुलपें आणि डोक्यावर शेंडी ठेवितात. दाढी मात्र कोणी ठेवीत नाहींत. त्यांची घरगुती भाषा मराठी आणि तेलगू यांच्या मिश्रणानें बनलेली आहे. “लेरा”= नाहीं, “इंपल” = भाकरी, “कुरा”= भाजी, “नेइ”= लोणी, “टलबटा”= पागोटें, “अंगी”= कोट, “ नोर”= चेहरा, “ मुकू “ = नाक, “ अंटकल” = केस, “यदुपराव”= तूं का पळतोस, “सितीगडक”= रागावूं नको, “देमती सकीनाषटी = तूं काय आणलें आहेस, “रुपायाची काया”= तूं रुपाया विसरलास काय, इत्यादि. यांची राहणी सामान्यत: मराठ्या सारखीच असते.
उचले लोक कधीं घर फोडीची किंवा मोठी मारहाणीची चोरी गांठींत नाहींत. असल्या चोर्या करणारे मांग, रामोशी हे लोक होत. उचले लोक खिसे कापणें किंवा गर्दीमध्यें अंगावरचे दागिने पळविणें असल्या चोर्या फक्त दिवसाच करितात. अर्थात जत्रा, यात्रा वगैरे यांचे चोरी करण्याचे मुख्य प्रसंग होत. माल कोणता व किती किंमतीचा चोरावा या बद्दल नियम नसतो. जें हाताला लागेल तें पळवितात. चोरीला निघण्यापूर्वीं ते आपल्यांतील मुख्याचा सल्ला घेतात. या मुख्याला पाटील किंवा येलुंग्या म्हणतात. केलेली चोरी पचली म्हणजे जातीला जेवण देऊन त्यांत सर्वजण यथेच्छ मद्य पितात. या जेवणाखाणाचा खर्च जातीचा मुख्य पाटील आपल्या हिश्यांतून करतो. प्रत्येक चोरींतला कांहीं हिस्सा या पाटलाला द्यावयाचा असतो. चोरी करणारा सांपडल्यास त्याला सोडण्याकरतां वकील वगैरे देण्याचा खर्च पाटील करतो. रविवार व मंगळवार हे दिवस चोरीला अशुभ मानतात. कोणी कोणाविरुद्ध फितुर होऊन बातमी दिल्याचा आरोप केल्यास सर्व जातीच्या जमातीपुढें त्याची चौकशी होते. आरोप खोटा ठरला तर फिर्यादीला दंड होतो. आरोपी निर्दोषी आहे असें म्हणत असल्यास त्याला कढईंत उकळणार्या तेलांत टाकलेला खबुतराच्या अंड्या एवढा दगड बाहेर काढण्याचें दिव्य करावें लागतें. त्यांची आराध्य दैवतें बहिरोबा, भवानी, खंडोबा मरीआई, म्हसोबा, वेताळ; व येल्लामा हीं होत. कोणी आजारी पडल्यास असल्या देवांना नवस करतात व बळी अर्पण करितात.
या जातींतल्या पाटलाचा उर्फ येलुंग्याचा अधिकार वंशपरंपरा चालतो. हे लोक चोर्या करण्याकरितां आगगाडीनें मद्रास कलकत्यापर्यंतहि जातात. खिसे कातरण्याकरितां त्यांच्या जवळ कोयत्याच्या आकाराची एक बारीक सुरी असते. तिला उल्लीमुख म्हणतात व ती ते तोंडांत किंवा जिभेखालीं लपवून ठेवितात. अलीकडे या जातीची संख्या कमी होत आहे व शिक्षण वाढत आहे: [ मुं. गॅ. ]