विभाग नववा : ई-अंशुमान
उच्च शहर – पौराणिक व इतिहासदृष्ट्या हें फार महत्त्वाचें आहे. सर अलेक्झांडर, कनिंगहॅम यांचें असें म्हणणें आहे कीं, अलेक्झांडरनें पंजाबमधील नद्यांच्या संगमावर बांधलेलें हेंच शहर होय. शिवाय कफंडचा मुलगा अयंड राज्य करीत असतां सिंध प्रांताचे ४ विभाग केलेले असून त्यांपैकीं एकाचें मुख्य शहर हें उच्च होतें, असें रशीदुद्दीनचें मत असल्याबद्दलहि तो उल्लेख करतो. बाराव्या शतकांत उच्चाला देवगड ही संज्ञा असून तेथील राजा देवसिंग मुसुलमानांच्या भीतीनें मारवाडांत पळून गेला होता. सय्यद जलालुद्दीन बुखारी यानें देवसिंगची मुलगी सुंदरपुरी हिला मुसुलमान बनवून एक उंच किल्ला बांधण्यास सांगितलें. मुसुलमान इतिहासकार याचा उल्लेख करीत नाहींत. रेव्हर्टीचें म्हणणें भाटिया शहर हेंच होय. मुसुलमानी विद्येचें उच्च हें केंद्र होतें. फारसी इतिहासकार मिनाजुद्दीननें हें फिरोजी पाठशाळेचें मुख्य ठिकाण केलेलें होतें. नंतर बर्याचशा घडामोडी होऊन अखेर अकबर बादशहाच्या वेळीं मोंगल सत्तेखालीं उच्च आलें. अद्याप मुसुलमानांचें तें पवित्र स्थान मानलें जातें. याठिकाणीं त्यांचीं असंख्य मंदिरें आहेत. त्यांची व्यवस्था बुखारी व जिलानी मुकदम पाहतात. [ इं. गॅ. व्हा. २१. ]