विभाग नववा : ई-अंशुमान
उंज – बडोदें संस्थान. कडी प्रांत. सिद्धपूर तालुक्यांतील एक गांव. राजपुताना-माळवा रेल्वेवर असून हें अहमदाबादपासून उत्तरेस ५६ मैल व सिद्धपूरपासून दक्षिणेस ८ मैल लांब आहे. लो. सं. (१९११) ९२५८. रजपूत राजाच्या वेळीं मारवाडांतून जे कडवे कुणबी गुजराथेंत उतरले ते याच गांवीं. गुजराथेंतील एकदंर लोकसंख्येंत कडवा कुणबी १/४ भरतील. त्यांमध्यें १०-१२ वर्षांच्या ठरीव काळांत एकदांच उपवर वरवधूंचीं लग्नें होतात. ४० दिवसांची मुलगी झाल्याबरोबर तिचें लग्न केलेंच पाहिजे असा त्यांचा निर्बंध असल्यामुळें तितक्या मुदतींत जर कोणी चांगला वर सांपडला नाहीं तर एखादा मुखत्यार नवरा पाहून त्याच्याशीं लग्न लावतात. परंतु मुलगी अविवाहित ठेवीत नाहींत. पुढें वयांत आल्यावर मुलीचे आई बाप बरोबरीचा मुलगा पाहून त्याच्याशीं पाट (नत्र) लावून देतात. कित्येकदां मुखत्यारहि सांपडत नाहीं अशा स्थितींत त्या लहान मुलीचें लग्न फुलांच्यां गुच्छाशीं लावतात. व नंतर तो गुच्छ विहिरींत टाकून देतात.
या गावीं म्यु. कमिटी असून संस्थानाकडून २ हजार रुपये दरसाल देणगी मिळते. कडव्या कुणब्यांचें एक मोठें देऊळ असून त्या ठिकाणीं दरसाल यात्रा भरते. शिवाय गुजराथी-इंग्रजी दोन शाळा व गुजराथी शाळा, धर्मशाळा व स्थानिक कचेर्या आहेत.