विभाग नववा : ई-अंशुमान
उझानी.- उझानी हें संयुक्त प्रांतांतील बदौन जिल्हा व तालुक्यांतील एक शहर आहे. रोहिलखंड व कुमाउन रेल्वेवर बदौन शहरापासून हें ८ मैल आहे. १९११ सालीं लो. सं. ८२७४ होती. याबद्दल अशी दंतकथा सांगतात कीं, पूर्वीं या गांवाला पिंपळाचीं झाडें पुष्कळ असल्यामुळें पिपेरिया नांव होतें. परंतु उज्जनीच्या महीपाल राजानें तें नांव बदलून टाकिलें. रोहिल्यांच्या सत्तेखालीं हें गांव होतें त्यावेळीं दुसरा अबदुल्लाखान याची राजधानी उझानीस होती. त्यानंतर लवकरच इंग्रजांची सत्ता झाली व सारा वसुलीच्या वेळीं दंगा झाला.
शहरांत मुख्यत्वेंकरून घरें जरी चिखलमातीचीं बांधलेलीं आहेत तरीं एकंदर देखाव्यावरून शहर भरभराटींत आहे असें वाटतें. रस्ते फरसबंदी आहेत. अबदुल्लाखानचें अर्धे बांधलेलें थडगें व एक मशीद हीं येथील पाहण्यासारखीं स्थळें होत. म्युनिसिपल कमिटीची स्थापना सन १८८४ सालीं झालीं. १९०३-४ सालीं म्यु. उत्पन्न सात हजार होऊन खर्च तेवढाच झाला. येथून तूप, साखर, आणि धान्य बाहेर गांवी जातें. साखर शुद्ध करण्याचा मुख्य कारखाना आहे. पूर्वी नीळ पुष्कळ पिकत होती. सांप्रत तो धंदा लयाला गेला आहे. येथें दोन शाळा असून त्यांची व्यवस्था मु. कमिटीकडे आहे. शिवाय कमिटी दोन शाळांनां मदत करिते.