विभाग नववा : ई-अंशुमानउंट – हा शब्द उष्ट्र या संस्कृत शब्दावरून आला असून उष्ट्र या संस्कृत शब्दाचें आवेस्ता भाषेंतील उश्त्र या शब्दाशीं साम्य आहे. ॠग्वेद व अथर्ववेद संहितेंत आणि ऐतरेय व शतपथ ब्राह्मणांत उष्ट्र शब्द आला आहे. (ज्ञानकोश ३ ३ विभाग २४७ पान). उंटाला अरबी शब्द जेमल आहे व त्याचे हिब्रू शब्द गेमल, इटालियन शब्द गॅमेलो, फ्रेंच शब्द चॅमू, जर्मन शब्द कॅमेल, इंग्रजी शब्द कॅमल इत्यादि भाषांतील शब्दांशीं साम्य आहे. सस्तन व रवंथ करणार्या प्रण्यांपैकीं ही एक जात असून तिच्या दोन पोटजाती आहेत. एक अरबी उंट व दुसरी बॅक्ट्रियन उंट. या दोन पोटजातींत महत्त्वाचा फरक हा असतो कीं, अरबी उंटाला एकच मदार असून बॅक्ट्रियन उंटाला दोन असतात. अरबी उंटाची जात बरीच पसरलेली असून अरबस्तानशिवाय इजिप्त, इराण, हिंदुस्थान, कॅनेरी बेटें, इत्यादि ठिकाणीं ती सांपडते. शिवाय अलीकडे ती जात आस्ट्रेलिया व उत्तर अमेरिका इकडेहि गेली आहे. बॅक्ट्रियन उंटाची जात हिमालय व तारस पर्वतांच्या आसपास आणि मध्य आशियांत सर्वत्र आहे. या दोन जातींमध्यें दुसरा महत्त्वाचा फरक असा कीं, अरबी उंटांपैकीं बॅक्ट्रियन उंटाचे आंखूड पाय असतात. पण एकदंर शरीर अधिक मोठें असतें व अंगावर केंस लांब व दाट वाढून हिवाळ्यांत त्याचें थंडीपासून रक्षण करतात. शिवाय बॅक्ट्रियन उंटांमध्यें रानटी व पाळीव अशा दोन जाती असून रानटी उंटाच्या मदारी लहान, केस कमी, कान व मुसकट आंखूड असतात. उंट जातीच्या प्राचीन प्राण्यांचे जे अवशेष सांपडले आहेत त्यांच्या आकाराशीं इतर उंटांच्या जातीपेक्षां या बॅक्ट्रियन रानटी जातीचें साम्य अधिक आहे; व त्यावरून असें ठरतें कीं, रानटी उंट ही पळून गेलेल्या पाळीव उंटापासून बनलेली जात नसून उलट रानटी उंट हीच सृष्टींतील मूळ जात असून तिच्यापासून सुधारून दुसर्या जाती बनल्या असल्या पाहिजेत. याच उपपत्तीला डॉ. स्वेन हेडिननें रानटी उंटाची राहणी व संवयी नीट अवलोकन करून पुष्टी दिली आहें असें प्रो. लेचे याचें म्हणणें आहे. जुन्या ख्रिस्ती धर्मग्रंथांत उंटाचा उल्लेख आहे. यावरून अरबी उंट ही सर्वांत जुनी पाळीव जात आहे असें पाश्चात्त्य लेखकांचें म्हणणें आहे. परंतु वेदांतहि हा शब्द आलेला असून गाईप्रमाणें उंटहि दान दिल्याचा उल्लेख असल्यामुळें हिंदुस्थानांतील पाळीव उंटाची जात फार जुनी होय.
उंट हा प्राणी दिसावयाला सुंदर नसला तरी त्याच्या विलक्षण शरीररचनेमुळें प्रेक्षणीय असतो यांत शंका नाहीं. आणि उपयोगाच्या दृष्टीनें पाहतां तर तो अत्यंत आवश्यक प्राण्यांपैकीं आहे. उंटाचा उपयोग लांबलांब ओसाड वाळूच्या मैदानांतून प्रवास करण्याकरितां, तसेंच दूरचा प्रवास जलद करण्याकरितां असा दोन्ही प्रकारें होतों. राजपुताना, अरबस्तान, मध्यआशिया, साहारा, वगैरे मोठमोठ्या वालुकामय प्रदेशांतून प्रवास करण्यास उंटाखेरीज दुसरें कोणतेंच जनावर टिकणें शक्य नाहीं. व यावरून उंटाला‘वालुकारण्य नौका’ (शिप ऑफ दी डेझर्ट) असें यथार्थ नामाभिधान प्राप्त झालेलें आहे; त्याच्या पोटाची रचना अशी असते कीं, बरेच दिवस पुरेल इतका मोठा पाण्याचा पुरवठा त्याला एकदम करतां येतो. व त्यामुळें निर्जल अशा शेंकडो मैल लांबीच्या वाळवंटांतून पाण्याचा थेंबहि न मिळाला तरी उंट प्रवास करूं शकतो. उंटाला चवथ्या वर्षापासून या कामाला हळूहळू लावतात, ठराविक खुणा किंवा शब्द उच्चारताच बसणें व उठणें इत्यादि क्रिया करण्याचें त्याला शिकवितात व हळूहळू अधिकाधिक ओझें वाहण्याची त्याला संवय लावतात. उंट ५०० ते १००० पौंडापर्यंत ओझें नेऊं शकतो. वाळवंटांत प्रवास करतांना साधारणपणें रोज २५ मैल याप्रमाणें तीन दिवस सारखा प्रवास उंट करतो. व चवथ्या दिवशीं त्याला पाणी मिळावें लागतें. तथापि विशेष चपळ जातीचे उंट रोज ५० मैलांप्रमाणें सारखे पांच दिवस चालूं शकतात. शिवाय प्रवासांत विसांव्याकरितां थांबविला तरी उंटाला सावलीची अपेक्षा नसते. तापलेल्या वाळूंत व भर कडक उन्हांतच उभा राहण्यानें त्याला आनंद वाटतो. वाळवंटात जेव्हां मोठें धुळीचें वादळ उसळतें तेव्हां उंट पुढले गुडघे जमीनीवर टेकून व नाकपुडया मिटून घेऊन मान वाळंवटावर पसरून ठेवतो व वादळ बंद होईपर्यंत स्वस्थ उभा राहतो व या स्थितींत उभा राहिल्यानें वरील माणसांनांहि त्याच्या मागल्या बाजूला आश्रय घेऊन वादळापासून बचाव करतां येतो. उंटाची चाल मात्र फार चमत्कारिक असल्यामुळें नवखा माणूस एका दिवसाच्या प्रवासानेंच अगदीं थकून जातो.
हत्तीप्रमाणें उंटांचाहि मद वाहूं लागून ते मस्त बनतात व अशा वेळीं मोठमोठ्यानें ओरडून एकमेकांशीं भयंकर मस्तीहि करतात. माणसांनां अशा स्थितींत त्यांच्यापासून धोका असतो. उंटीण पुरे अकरा महिन्यांनीं विते. तिला दर खेपेस एकच पोर होतें व तें एक वर्ष अंगावर दुध पितें. उपजल्यापासून आठ दिवसांत त्याची उंची ३ फूट होते. परंतु पुरी वाढ होण्यास त्याला सोळा सतरा वर्षें लागतात. उंट चाळीस पन्नास वर्षें जगतो. अरबांनां उंटाचें मांस फार आवडतें. उंटणीचें दूधहि फार पुष्टिकारक असतें. त्याचें लोणी मात्र निघत नाहीं. उंटाच्या अंगावरचे लांब केस दर उन्हाळ्यांत कापून त्याचीं वस्त्रे करतात व रंग देण्याचें ब्रश करतात. कातडें कमवून फार टिकाऊ बनवितां येतें. त्याची लीद जळणास उपयोगी पडते व त्याच्या राखेपासून नवसागर काढतात.
उंटाचें मुख्य खाद्य झाडाचा पाला, झुडपें वगैरे होय. तें तो आपल्या भक्कम पुढल्या दातांनीं ओरबाडून खातो. हा प्राणी फार गरीब असतो खरा, परंतु घोडा व हत्ती यांच्या प्रमाणें धन्यावर प्रेम करणारा, व त्याच्या हुकुमांत वागणारा मात्र तो बिलकूल नसतो. पाठीवर स्वार बसला न बसला याची तो कांहींच पर्वा न करतां तडक चालूं लागतो. वास्तविक पाळीव जनावरांतले गुण उंटाच्या अंगीं मुळींच उत्पन्न झालेले नसून तो गाढवासारखेंच मूर्ख, गरीब जनावर असल्यामुळें मनुष्य त्याच्या कडून काम करून घेऊं शकतो.