विभाग नववा : ई-अंशुमान

उटकटारी - ह्या झाडास संस्कृतांत उत्कट, गुजराथींत उटकटो, हिंदुस्थानी भाषेंत उडिंगण, उटकटावा, मराठींत उटकटारी, उताटी, कांटे चुबुक अशीं नांवें आहेत. ही वनस्पति हिंदुस्थानांतील बहुतेक भागांतील जंगलांत सांपडतें. या झाडाची उंची सुमारें हात दोन हात असते. याचें फळ वाटोळें असून त्यावर लांब लांब कांटे असतात व फुलाचा रंग पांढरा असतो. हिचीं पानें किंचित् कोंपरे कातरल्यासारखीं असून त्यांच्या पृष्ठभागीं व शिरेवर सफेत रंगाचे कांटे असतात. उन्हाळ्यांत ही झाडें सुकून गेल्यासारखीं दिसतात. परंतु पावसाळा सुरू होण्याबरोबर पुन्हां त्याच जागीं फुटतात. या वनस्पतीचें मूळ व बीं फार औषधी आहे. मुलास डांग्या खोकला होतो त्यावर या झाडाची मुळी शस्त्र न लावतां काढून मुलाच्या गळ्यांत बांधावी. धातु पुष्टतेवर या झाडाचें मूळ गोखरू व कवचबीज यांचा दुधांत पाक करून सेवन करावा. किंवा मूळाचें चूर्ण दुधांत घ्यावें. (पदे)