विभाग नववा : ई-अंशुमान
उडियासांझिया – हे लोक संबळपुरांत राहतात. गवंडी व बांधकामाची मजूरी हे यांचे धंदे होत. हें उड्र किंवा ओड्र नांवाच्या फिरत्या लोकांचे वंशज आहेत. छत्तीस गडांत यांची संख्या एक हजार आहे. यांचा व सांझिया गुन्हेगारांच्या जातीचा काहींच संबंध नाहीं. संबळपुरांत यांचा दर्जा बराच उच्च आहे. ब्राह्मण याच्या हातचें पाणी पितात.
यांच्यात बनेटिया व खांदाईत असे दोन वर्ग आहेत. बनेटिया उच्च व खांदाईत नीच गणले जातात. हे उडिया राजाच्या घरीं शिपायाच्या खेरीज इतर कामें देखील करीत. बनेटिया सांझिया लोक खांदाईती लोकांबरोबर अनुलोम विवाह करतात. पण खांदाइत लोकांच्या घरीं जेवत मात्र नाहींत. फक्त दही व साखर खातात. यांच्यातहि देवकांचें थोडेसें प्रस्थ आहे.
मुलींचीं लग्नें ७ ते १० च्या आंत होतात. १२ व्या वर्षीं लग्न न झाल्यास विधवाविधीनें तिचें लग्न होतें. लग्नाची मिरवणूक फार थाटाची असते. लग्न उडिया पद्धतीनें लागतें. वरात घरीं आल्यावर पाण्यानें भरलेली सात भांडीं वर उपडी करतो. मग तो आपलें तोंड धुवून तीं भांडीं फोडतो व पळून जातो व बायका त्याच्यावर रंग ओततात. नवव्या दिवशीं वधू सर्व सासरच्या माणसांच्या कपाळास दही व साखरेचा टिळा लावते. घटस्फोट व विधवाविवाह जातीस संमत आहेत. हे लोक विश्वकर्म्याची पूजा करतात; श्राद्धेंहि करतात. हे लोक स्वच्छ प्राण्यांचें मांस खातात पण दारू पीत नाहींत. द्रुगच्या राजाची दृष्टी एका साझिया स्त्री वर गेली व ती विवाहित असूनहि हस्तगत व्हावी म्हणून त्यानें फार खटपट केली. त्याला त्रासून नऊ लक्ष सांझिया वरार बांधाकडे गेले. तेथेंहि राजानें त्या बाईचा पाठलाग केला म्हणून तिनें अग्निप्रवेश केला. ही कथा ओडनी गीतांत आहे.