विभाग नववा : ई-अंशुमान
उडीद – हें एक द्विदल धान्य आहे. याचें झाड सुमारें एक हातभर उंच वाढतें. यास संस्कृतांत माष, गुजराथींत अडद, हिंदींत उरद वगैरे नांवें आहेत.
उडदाच्या दोन जाती आहेत. (१) काळे व जाड दाण्याचे (२) आणि हिरवट व बारीक दाण्याचे.
हिंदुस्थानांत उडदाची लागवड पुष्कळ होते; परंतु लागवडीच्या क्षेत्रफळाचे बरोबर आंकडे मिळत नाहींत.
उडीद सामान्यत: ज्वारी, बाजरी किंवा कापूस वगैरेबरोबर पेरतात किंवा केव्हां केव्हां त्याचें स्वतंत्र पीकहि काढण्यांत येतें. पावसाच्या आरंभीं पेरणी होऊन एक प्रकारचें पीक आगस्ट व सप्टेंबर महिन्यांत आणि दुसर्या प्रकारचें आक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत तयार होतें. मुगाप्रमाणें याला हलक्या जमिनीची जरूर नसते, उलट जड अथवा कठिण जमिनींतच त्याचें पीक चांगलें येतें. हें स्वतंत्र पेरलें असतां सरासरी दर एकरी ५ मण धान्य व त्याच्या तिप्पट चारा निघतो. उडीद हें बहुतेक खरीप पीक असून पुष्कळ वेळां तांदूळ निघाल्यानंतर त्या शेतांत रब्बी पीक म्हणूनहि पेरतात.
उडदाच्या हिरव्या शेंगांची भाजी करितात. वाळलेल्या धान्याची डाळ करून त्याची आमटी अथवा डाळ भाजून दळल्यावर त्याचे लाडू केले जातात. उडदाच्या पिठाचे पापडहि करितात.
पंजाबकडे उडीद अमळ गरम अशा पाण्यांत भिजवून, कुटून, वाळवून व त्यांत तूप अथवा ताक मिळवून त्याचे बरी व सेप नांवांचे पदार्थ करितात. उडीद हें धान्य व त्याचा चारा गुरांनां खाण्यास देतात. उडदाच्या अंगीं औषधी गुणहि आहेत.
उडीद पौष्टीक, स्निग्ध, कफ करणारा, शुक्र वाढविणारा, मेंदु, मांस व बल बाढविणारा, पचनाला जड, शौचास साफ करणारा असून शुक्राचें उत्सर्जनहि करतो. अर्दित वगैरे वातरोगांवर उडदाचीं अन्नें हितकर होतात. [ वॅट वगैरे].