विभाग नववा : ई-अंशुमान
उत्तंक – वेद ॠषीचा शिष्य. एकदां गुरु अग्निशुश्रूषणादि कारभार याच्यावर सोंपवून परगांवीं गेले असतां गुरुपत्नी ॠतुमती झाली. तेव्हां आश्रमांतील स्त्रिया उत्तंकाला गुरुपत्नीचा ॠतु व्यर्थ न घालविण्याविषयीं आग्रह करूं लागल्या. पण उत्तंकानें मनोनिग्रह केला. त्यामुळें गुरु घरीं परत आल्यावर फार प्रसन्न झाले व ब्रह्मचर्याश्रम संपवून स्वगृहीं परत जाण्यास कांहीं दक्षिणा न मागतां त्याला अनुज्ञा दिली. पण गुरुपत्नीनें पौष्य राजाच्या स्त्रीचीं कुंडलें मागितलीं. तीं उत्तंकानें तक्षकाचा विरोध बाजूला सारून मोठ्या खटपटीनें गुरुपत्नीला अर्पण केलीं. यानेंच जनमेजय राजाला सर्पसत्राची कल्पना सुचवून तक्षकाचा सूड घेतला. [ म. भा. आदि. अ. ३ ]