विभाग नववा : ई-अंशुमान
उत्तर अमेरिका – अमेरिका खंडाचे मुख्य तीन स्वाभाविक विभाग आहेत; उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका व दक्षिण अमेरिका. उत्तर अमेरिकेची व जुन्या जगाच्या उत्तर खंडाची तुलना केली असतां यूरेशिया व उत्तर अमेरिका यांच्यांत बरेंच साम्य आढळतें. या साम्यावरून असें दिसतें कीं, या दोन्ही भागांपैकीं कोणताहि भाग भूस्तरशास्त्रदृष्ट्या एकापेक्षां जुना अथवा नवा नाहीं व दोहोंमध्यें अतिशय जुने असे भूस्तरविषयक फरक सारखेच झालेले आहेत.
उत्तर अमेरिका व यूरेशिया यांच्यांत हवापाण्यासंबंधींहि साम्य आहे. अमेरिकेंतील अपॅलेचेन व यूरोपांतील हर्सेनियन पर्वतात विपुल कोळसा आहे व तो भूस्तरशास्त्रदृष्ट्या सारखाच जुना ठरतो. यावरून अति प्राचीन काळीं सुद्धां हवापाण्याच्या मानानें व भूगोलाच्या दृष्टीनें या दोहोंत साम्य होतें असें दिसतें. हल्लींहि हवापाण्याच्या दृष्टीनें अमेरिका व यूरेशिया यांच्यांत साम्य आहे. तथापि एकंदरींत येथील हवा विषम आहे. या भागांतील हिंवाळा यूरोपातील हिंवाळ्यापेक्षां जास्त कडक असतो. पण पश्चिम किनार्यावरील प्रदेशांतून हवा कमी थंड असते.
या देशाच्या भूपृष्ठाचें‘लारेन्सियन हायलंड,’ अपॅलेचेन हॉयलंड,’ नार्थ अमेरिकेच्या पर्वतांच्या ओळी व मध्यवर्ती मैदान असे भाग पडतात.
न द्या.- येथील नद्यांमध्यें मिसिसिपीप्रणाली, नेलसन व सेंट लॉरेंन्स प्रणाली, मॅकेंजी, यूकॉन, फ्रेझर, कोलोरॅडो व रिओग्रँडी ह्या मुख्य आहेत.
स रो व रें. – ओंटारिओ, एरी, ह्यूरॉन, मिचिगान व सुपिरिअर हीं येथील मुख्य सरोवरें आहेत.
उत्तर अमेरिकेचें क्षेत्रफळ सुमारें ८०,००,००० चौरस मैल आहे. येथील लोकवस्ती बहुतेक‘जुन्या जगांतील’ आहे. नार्थ अमेरिकेंतील समशीतोष्ण कटिबंधांतील प्रदेश बराच प्रगतीच्या मार्गांत पुढें गेलेला आहे. कारण या भागांत यूरोपांतील सुधारलेल्या लोकांनीं वसाहत केलेली आहे. पूर्व किनार्यावरील वसाहतीपासून आंतील भागांत झालेली प्रगति भूप्रकृतीला अनुसरून आहे.
सेंट लारेन्स नदीपासून ओहिओ व सेंट लारेंन्सचें आखात व चेसॅपिक बे यांच्या दरम्यान असलेल्या अटलांटिक महासागराच्या किनार्यापासून मैदानापर्यंतचा प्रदेश लोकसंख्या, उद्योगधंदे, संपत्ति, वगैरे बाबतींत विशेष पुढें गेलेला आहे. युनायटेड स्टेट्सच्या आग्नेय भागांत नीग्रो गुलामगिरी व तिचे परिणाम अद्यापि दृष्टीस पडतात. येथें राहणारे इटालियन, हंगेरियन, जर्मन, इंग्रज वगैरे सर्व प्रकारचे लोक अमेरिकन झाले आहेत. मेक्सिकोमध्यें मूळ रहिवाशांचें प्रमाण उत्तरेंतील भागापेक्षां जास्त आहे.
दोन शतकांपूर्वीं येथें बहुतेक फक्त मूळ रहिवाशीच होते. परंतु हल्लीं बहुतेक महत्त्वाच्या भागांतून त्यांच्या जागीं नवीन लोकांची वस्ती झाली आहे. मूळ रहिवाशांची हकालपट्टी बहुधां क्रुर, कडक व अन्यायी मार्गांनीं करण्यांत आली. तथापि एकंदर देशांत सुधारणेची प्रगति झाली. हे मूळ रहिवाशी उत्तर टोंकाकडे अथवा वायव्येकडे फारसे कमी झालेले नाहींत. यांच्या संस्कृतीची वगैरे माहिती ज्ञानकोश विभाग चवथा बुद्धोत्तर जग पृ. ४५८-४६५ येथें दिली आहे. [ कानडा, युनायटेड स्टेट्स, न्यू फाऊंडलंड या सदराखालीं उत्तर अमेरिकेंतील निरनिराळ्या देशांची माहिती त्या त्या लेखांत दिली आहे.]