विभाग नववा : ई-अंशुमान
उत्तरध्रुवप्रदेश – उत्तरध्रुवाचें पूर्ण रीतीनें अद्यापि संशोधन झालें नसलें तरी त्या प्रदेशाचे भूगोलदृष्टया काय काय विशेष आहेत, तें सांगतां येण्याइतकें संशोधन झालें आहे यांत शंका नाहीं. उत्तरध्रुवाच्या कक्षेंत, आर्टिक महासागराच्या भोंवतालचा यूरोप, आशिया, अमेरिका व ग्रीनलंड यांचा उत्तरेकडील भाग येतो. ग्रीनलंड व यूरोप यांच्यामधून अटलांटिक महासागराचा फांटा, आर्टिक महासागराला मिळाला आहे.
ज्या ठिकाणीं उन्हाळ्यांतील कांहीं दिवस सोडून दिल्यास कायमचें बर्फाचें आच्छादन असतें व ज्या ठिकाणची हवा अगदीं असह्य थंड असते अशा ठिकाणीं राहून संशोधन करणें किती कठिण असेल, याची कल्पनाच करणें बरें. अशा स्थितींत तेथें भूस्तरशास्त्रदृष्ट्या काय काय चमत्कार आढळतील तें पहाणें अत्यंत दुर्घट असल्यास त्यांत नवल नाहीं; तरी पण धाडशी संशोधकांनीं आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून भूस्तरशास्त्रोपयोगी अशी माहिती मिळविली आहे. त्यावरून या प्रदेशांत अर्केयन दगड सर्व ठिकाणीं आढळून येतो. अगदीं ईशान्येकडील भागांत कोळसा उत्पन्न करणारे दगड सांपडतात. ज्यूरासिक दगड देखील, दक्षिणेकडील प्रदेशांत सांपडतो. लोखंड उत्पन्न करणारा चुनाहि सांपडतो. तृतीय युगांतील दगड व मायोसीन युगांतील प्रस्तरीभूत वनस्पतीहि क्वचित् आढळून येतात. ग्रँटलंड येथें तृतीय युगांतील कोळसा उपलब्ध आहे. उत्तरध्रुवाजवळील प्रदेशांत एकसुद्धां मोठा पर्वत आढळून येत नाहीं. क्वचित् लहानशा टेकड्या मधून मधून आढळतात. ग्रीनलंडचें डोंगरपठार बरेंच विस्तृत आहे; पण तें नेहमीं बर्फाच्छादित असतें. या उत्तरध्रुवामधील प्रदेशांत जानमयेन या बेटांत मात्र एक ज्वालामुखी पर्वत आहे.
ह वा मा न. – आर्टिक महासागर व उत्तरध्रुवप्रदेश हे नेहमींच बर्फाच्छादित असल्यामुळें समुद्राच्या कांठचें हवामान व जमिनीवरचें हवामान यांत मुळींच फरक आढळून येत नाहीं. या प्रदेशांतील हवामानाची माहिती मिळविण्याकरितां रशिया, कानडा, इत्यादि राष्ट्रांनीं स्वतंत्र अशा संस्था या प्रदेशांत काढल्या आहेत व त्या संस्थातर्फें या प्रदेशांतील हवामानाबद्दलचें संशोधन चालू आहे. चतुर्थयुगांतल्यापेक्षां तृतीययुगांत येथील हवा अधिक चांगली होती, असें या हवामानशास्त्रवेत्त्यांनीं ठरविलें आहे. या सर्व प्रदेशांत निरनिराळ्या ठिकाणचें निरनिराळें हवामान पाहून प्रो. गॉन यानें सर्वसाधारण हवामानाचे आंकडे पुढीलप्रमाणें दिले आहेत. संबंध वर्षांतली ६५०, ७००, ८००, ९००, या अक्षांशा मधील हवामानाची सरासरी अनुक्रमें २१० ७०, १२० ९०, १० १०, .९ फारेनहीट आहे. अगदीं उत्तरेकडील भागांत रात्रीपेक्षां दिवसा धुकें अधिक असतें. उन्हाळ्याच्या दिवसांत धुकें अतिशय असतें तर हिवाळ्यांत अजीबात नसतें; मे ते सप्टेंबर या महिन्यांत दर महिन्यांत वीस दिवस बर्फवृष्टि होते. ऑक्टोबर ते एप्रिल महिन्यांत हें प्रमाण महिन्यास साडे अकरा दिवस पडतें.
उत्तरध्रुवांतील भूप्रदेशांत, फार उंचीवर जरी विशेष वनस्पति व पुष्पें आढळून येत नाहींत तरी जसजसें आपण खालीं येऊ लागतों तसतसें आपणाला वनस्पति व पुष्पें दिसूं लागतात. ग्रीनलंड व एलेस्मीयर प्रदेशांत, उन्हाळ्यांत, निरनिराळ्या लता, झाडें, झुडपें दिसतात. या लतांची अगर वृक्षांची उंची फार नसते. गवत देखील पुष्कळ उगवतें, व या गवताच्या येथील एस्किमो जातीचे लोक उशा करतात.
फलपुष्पवनस्पतींच्या मानानें या प्रदेशांत प्राण्यांची वस्ती प्राचीन आहे. समुद्रांत देवमाशांची समृद्धि पुष्कळच आहे. या प्रदेशांत रानडुकर पुष्कळ आढळून येतात. कोल्हे, लांडगे, या जनावरांचेंहि वास्तव्य येथें आहे. निरनिराळ्या रंगाचे असें ससेहि येथें आढळतात. लोंकर उत्पन्न करणारीं जनावरेंहि या ठिकाणीं बरींच आहेत. पशूप्रमाणेंच पक्ष्यांचीहि वस्ती येथें आहे. पण हे पक्षी निरनिराळ्या ॠतूंमध्यें निरनिराळ्या ठिकाणीं सांपडतात. ग्रीनलंडच्या मध्य भागांत मात्र, नेहमीं बर्फाचें साम्राज्य असल्यामुळें पशुपक्ष्यांचें वास्तव्य आढळून येत नाहीं.
उत्तरध्रुवासारख्याच अत्यंत थंड प्रदेशांत वस्ती करून राहणें कल्पनातींत कठिण आहे. तथापि प्रयत्नानें कां होईना पण उत्तर अमेरिकेच्या अगदीं उत्तर भागांत व सैबीरियाच्या उत्तर टोंकाकडे कायमची वस्ती करून राहतां येईल असें संशोधकानीं प्रतिपादन केलें आहे. नार्वेच्या उत्तरेकडील उत्तरध्रुवप्रदेशांत थंडी थोडी कमी प्रमाणांत पडत असल्यानें या प्रदेशांत, निरनिराळे जातिसंघ कायमची वस्ती करून राहतात व ते दक्षिणेकडील लोकांशीं तारायंत्रें, रेल्वे इत्यादिकांच्या साहाय्यानें दळणवळण चालू ठेवतात. ज्या ठिकाणीं उन्हाळ्यामध्यें बर्फ पडत नाहीं अशा उत्तरध्रुवाकडील कोणत्याहि प्रदेशांत, ज्या ठिकाणीं फलपुष्प समृद्धि असेल तेथें, कायमची वस्ती करणें शक्य आहे असें संशोधकांचें मत आहे. दुर्दैवानें, या उत्तरभूप्रदेशांत खनिज पदार्थांची मात्र अगदीं वाण आहे. लॅप्स नांवाचे नेहमीं भटकणारे लोक हे यूरोपच्या उत्तर टोंकाकडील प्रदेशांतील मूळचे रहिवाशी असावेत असें मानण्याला प्रमाणें आहेत. या उत्तरेकडील प्रदेशाच्या पूर्व टोंकाकडील प्रदेशांत सॅमॉइडिस हे लोक रहात असून हेहि लॅप्स लोकांप्रमाणेंच, आपली उपजीविका काळवीट, मासे इत्यादिकांवर करतात. स्पिट्झबर्जन व फ्राँझ जोसेफ लँड या टापूंत, मूळचे कायमचे रहिवाशी नसावेत असें दिसतें. कानडा व अलास्का या प्रदेशांत उत्तरध्रुवाच्या अगदीं उत्तरटोंकाच्या बाजूपर्यंत, उत्तर अमेरिकेतील इंडियन टोळ्या हिंडतात. अमेरिकेच्या किनार्याच्या आश्रयानें रहाणार्या एस्किमो लोकांच्या टोळ्या, याचें अमेरिकेंतील कोळी लोकाशीं मिश्रण झालें असल्यानें शुद्ध एस्किमो जातीचा मनुष्य मिळणें हल्लीं दुर्लभ झालें आहे. उत्तरध्रुवाकडील द्वीपकल्पामध्यें एस्किमो लोकांच्या वस्तीच्या ज्या खाणाखुणा सांपडल्या आहेत त्यांवरून या प्रदेशांत पूर्वीं एस्किमो लोकांनां शिकारीला योग्य अशी ही जागा होती असें अनुमात काढतां येतें. ग्रीनलंड प्रदेशांतील एस्किमो लोकांत मात्र फारसा संकर झालेला आढळून येत नाहीं. ग्रीनलंडच्या पश्चिमेकडील एस्किमोंची वस्ती, डॅनिश लोकांच्या वसाहतींत असून ते आतां बरेच सुधारले आहेत. या वसाहतींतील यूरोपियन व एस्किमो या लोकांचें इतकें बेमालुम मिश्रण झालेलें आहे कीं या वसाहतींत अस्सल एस्किमो जातीचा मनुष्य मिळणेंच कठिण आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. मेलव्हिल उपसागराच्या उत्तरेस राहणारे जे एस्किमो लोक, त्यांनां ‘आर्क्टिक प्रदेशांतील डोंगरी लोक’ या नांवानें संबोधलें जातें. या डोंगरी लोकांचा, पेरी साहेबाला त्याच्या उत्तरध्रुवाच्या सफरींत अतिशय उपयोग झाला.
प्रा ची न शो ध. – उत्तरध्रुवासंबंधीची नक्की माहिती प्राचीन लोकांनां नव्हती. या प्रदेशांत कांहीं दिवस अजीबात सूर्य मावळत नाहीं व कांहीं दिवस अजीबात नसतोच अशा प्रकारच्या कांहीं चमत्कारिक गोष्टी प्राचीन (ॠग्वेद वगैरे) कांहीं ग्रंथांतून सांपडतात. तसेंच प्राचीन ग्रीक ज्योतिर्विदांनीं ज्योतिर्विज्ञान शास्त्राच्या आधारें देखील वरील अनुमान काढलेलें होतें. पण सर्वसाधारणपणें लोकांचा असा समज होता कीं उत्तरध्रुवाकडील प्रदेश वस्ती करून राहण्याला लायक असा नाहीं. या उत्तरध्रुवमंडळाच्या जवळ जाऊन आलेला पहिला मनुष्य म्हणजे पिथियास नांवाचा ग्रीक होय. यानें ख्रि. पू. ३२५ व्या वर्षीं यूरोपच्या पश्चिम किनार्याच्या बाजूनें सफर केली. त्यानंतर सुमारें हजार बर्षांनीं डिकूइल नांवाच्या एका आयरिश साधूनें लिहिलेल्या एका ग्रंथांत आयरिश साधूंनां केरोज व आइसलंड ही बेटें सांपडलीं व त्या बेटांत मार्च महिन्यांत अजीबात रात्रच आढळत नाहीं असा उल्लेख सांपडतो. नवव्या शतकाच्या अखेरीस नॉर्स लोकांनीं या आइसलंडमध्यें वसति केली. यानंतर कांहीं काळ लोटल्यावर एरिक दि रेड या नार्वेजियन गृहस्थानें ग्रीनलंड शोधून काढलें व त्या ठिकाणीं त्यानें वसाहत केली. थोड्याच दिवसांत या ठिकाणीं नॉर्स लोकांनीं दोन वसाहती केल्या. नॉर्स लोकांनीं पश्चिम किनार्याच्या बाजूनें उत्तरेकडील प्रदेश शोधण्यास सुरवात केली. पंधराव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत ग्रीनलंड व नॉर्वे या प्रदेशामध्यें दळणवळण चालूं असल्याचा उल्लेख सांपडतो पण त्यानंतर दोन शतके पर्यंत या वसाहतींसंबंधाची माहिती मुळींच उपलब्ध नाहीं. सोळाव्या शतकांत ज्यावेळीं ग्रीनलंडचें पुन:संशोधन झालें त्यावेळीं या नॉर्स लोकांच्या वसाहतीचा मागमूसहि नव्हता.
नॉर्स लोकांनीं या उत्तरध्रुवाजवळच्या प्रदेशाची माहिती मिळवण्यासाठीं फार खटपट केली. या नॉर्स लोकांनांच जलपर्यटणांतील कौशल्याबद्दलचें श्रेय देणें आवश्यक आहे. या नॉर्स लोकांपासूनच इंग्लंडनें जलपर्यटणाच्या बाबतींत धडा घेतला. जॉन कॅबट नांवाचा इंग्लिश गृहस्थ हा १४९७ सालीं जलपर्यटण करण्यास निघाला व त्यानें अमेरिका खंडाचें पुन:संशोधन केलें. १५०१-२ मध्यें इंग्रज व पोर्तुगीज लोकांनीं मिळून एक सफर काढली. त्यानंतर रटविलोबी, चॅन्सेलर, बरो, पेट, कार्टेरीअल इत्यादि संशोधकांनींहि चीन व हिंदुस्थानाकडे जाण्याला ईशान्य दिशेकडील रस्ता शोधून काढण्यासाठीं सफरी काढल्या. या सफरींमुळें उत्तरध्रुवाकडील विशेष माहिती जरी उपलब्ध झाली नाहीं तरी, उत्तरध्रुवाकडे सफरी नेण्याविषयींची महत्त्वाकांक्षा निरनिराळ्या राष्ट्रांत उत्पन्न झाली. या प्रदेशाचें संशोधन करण्यासाठीं‘मस्कोव्ही अथवा रशिया कंपनी’ नांवाची व्यापारी कंपनी स्थापन झाली व तीनें निरनिराळ्या संशोधकांनां आपल्या खर्चानें सफरीवर धाडण्यास प्रारंभ केला. या कंपनीतर्फें पाठवल्या गेलेल्या स्टीफन बरो नांवाच्या गृहस्थानें नोव्हा झेमला, बैगाच बेट व कॅराची सामुद्रधुनी शोधून काढली.
ईशान्य दिशेनें चीन व हिंदुस्थान या देशाला जाणारा रस्ता शोधून काढण्याचे प्रयत्न सुरू झाले व त्यांत बरेंचसें यश आलें, हें आढळतांच वायव्यदिशेनेहि या देशांत जाण्याचे मार्ग शोधून काढण्याचें इंग्लंडनें मनावर घेतलें. या सफरीला सुरवात सर फ्रोबिशर यानें केली. यानें उत्तरध्रुवाच्या पश्चिमेकडील प्रदेशाचें थोडें फार संशोधन केलें. पुढें सन १५६५ मध्यें डच लोकांनीं कोल येथें वसाहत केली. वसाहत स्थापण्याच्या कामीं ऑलीव्हियर ब्रनेल यानें पुढाकार घेतला. हा गृहस्थ फार धाडशी असून यानें, सैबीरियाच्या किनार्याच्या बाजूनें बराच प्रवास केला होता. तसेंच नोव्हा झेमलाच्या बाजूलाहि त्यानें एक सफर केली होती. यानें १५८२ मध्यें, चीन व हिंदुस्थानला जाण्याचा ईशान्येकडील मार्ग शोधून काढण्यासाठीं एक सफर काढली पण ती यशस्वी झाली नाहीं. तथापि या प्रयत्नानें डच लोकांनां हा मार्ग शोधून काढण्याची महत्त्वाकांक्षा उत्पन्न झाली. १५९४ मध्यें बेरेंट्सच्या शासनाखालीं, दोन जहाजें सफरी करतां निघाली. बेरेंट्सनें ग्रेट आइस केप पर्यंतचा सर्व किनारा शोधून काढला. याच वर्षीं बेच्या नेतृत्वाखालीं जीं दोन जहाजें सफरीकरतां निघालीं होतीं त्यांनीं युगोरची समुद्रधुनी व यलमलचा पश्विम किनारा शोधून काढला. पण युगोरच्या समुद्रधुनींतून कॉराच्या समुद्रांत जाण्याचें अशक्य झाल्यानें उत्तरेकडे थोडासा वळसा घेऊन काराच्या सामुद्रधुनींत प्रवेश करण्याचा निश्चय १५९६ मध्यें हीमस्कर्क व रिज्य या संशोधकांनीं ठरविला. उत्तरेकडे प्रवास करीत असतां त्यांनां बर्फाच्छादित असा प्रदेश आढळून आला. या प्रदेशाला त्यांनीं स्फिट्सबर्गन हें नांव दिलें, यानंतर नोव्हा झेमलाच्या उत्तर भागाला वळसा घालीत घालीत ते “आइस हॅवेत”या ठिकाणीं आले. अशा रीतीनें १६ व्या शतकांतील उत्तरध्रुवसंशोधनाच्या इतिहासांत, बेरेंट्सच्या सफरींना प्रमुख स्थान मिळालें आहे.
मस्कोव्ही कंपनीच्या आश्रयाखालीं इंग्लिश लोकांनीं हा प्रदेश धुंडाळण्यास सुरुवात केली होतीच. सन १६०७ मध्यें हडसन नांवाच्या एका संशोधकानें एक सफर काढून ग्रीनलंडचें उत्तरेकडील टोंक शोधून काढलें. आपल्या दुसर्या सफरींत त्यानें स्पिट्सबर्गन व नोव्हा झेमला या टापूंतील प्रदेशाचें संशोधन केलें. तिसर्या सफरींत त्यानें उत्तर अमेरिकन किनार्याचें संशोधन करून, हडसनची सामुद्रधुनी शोधून काढली.
सोळावें व सतरावें हीं शोधांचीं व धाडसाचीं शतकें होऊन गेलीं. हडसनची सामुद्रधुनी, हडसनचा उपसागर, डेव्हीसची सामुद्रधुनी, बॅफीन बे, व ग्रीनलंडपासून स्पिट्सबर्गनमधील बर्फाचा समुद्र इत्यादि प्रदेशांचें या काळांत संशोधन झालें. पुढील शतकांत या सर्व ठिकाणीं वसाहती स्थापन झाल्या.
सन १७४६ मध्यें कॅप्टन मूरनें‘वॅगर इनलेट’ नांवाचें बेट शोधून काढलें व हडसन बे कंपनीनें आपले संशोधक पाठवून अमेरिकन उत्तरध्रुवमहासागराचा किनारा शोधण्यासाठीं प्रयत्न केले. १७६९ ते १७७२ च्या अवधींत हर्न नांवाच्या धाडसी संशोधकानें कॉपरमाईन नदींतून उत्तरध्रुवसागरांत आपलें जहाज नेलें व १७८९ त मॅकेंझी यानें मॅकेंझी नदीचें उगमस्थान शोधून काढलें.
सैबीरिया प्रांत रशियानें काबीज केल्यानंतर त्या प्रदेशाच्या सर्व उत्तर भागाचें संशोधन होण्यास सुरवात झाली व रशियन संशोधकांनीं ओबी, येनीसी, लेना इत्यादि नद्यांचें उगमस्थान शोधून काढलें. १७७१ मध्यें लियाकॉफ नांवाच्या एका रशियन व्यापार्यानें न्यू सैबीरिया बेटें शोधून काढलीं व त्या ठिकाणीं कांहीं अवशेष सांपडतात किंवा नाहीं हें पाहण्यासाठीं तीं बेटें खणण्याची परवानगीं त्यानें मिळविली.
१७७३ पासून तों १९ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत जें कांहीं उत्तरध्रुवसंशोधन झालें तें शास्त्रीयदृष्ट्या माहिती मिळविण्याच्या उद्देशानें मुख्यत: झालें. १७७३ मध्यें व त्यानंतर १७७८ मध्यें डेन्स बॅरिग्टन आणि रॉयल सोसायटी यांच्या प्रोत्साहनानें, उत्तरध्रुवप्रदेशाकडे जहाजें रवाना झालीं पण त्यांत विशेष यश आलें नाहीं. पुढें‘फ्रेंच राज्यक्रांतीच्या’ धामधुमींत जवळजवळ १८१५ पर्यंत संशोधनाचें कार्य बंद पडलें. पण १८१५ नंतर सर जॉर्ज बॅरो याच्या आत्यंतिक परिश्रमामुळें उत्तरध्रुवाकडील प्रदेशाचें संशोधन करण्यासंबंधीचा कायदा ब्रिटीश पॉर्लमेंटमध्यें पास झाला. त्याप्रमाणें स्पिट्झबर्गनच्या मार्गानें व बॅफीन बेच्या मार्गानें अशीं दोन जहाजें पाठविण्यांत आलीं. सन १८१९ मध्यें पॅरीच्या आधिपत्याखालीं नवीन संशोधनाची मोहीम निघाली. त्यानें आपलीं जहाजें लँकेस्टर साउंड मधून बॅरोच्या सामुद्रधुनींतून पश्विम दिशेला नेलीं. तेथून त्यानें उत्तरेकडे ३०० मैल मेलव्हिली बेटापर्यंत प्रवास केला. पण पुढें त्याला बर्फाच्या नदीमधून जातां येईना. या सफरीचा बराच फायदा झाला. सन १८५० सालीं पुन्हां पॅरीनें आपल्या सफरीला सुरवात केली. मेलव्हिली बेटाच्या पुढें बरेच मैल प्रवास केल्यानंतर हडसन सामुद्रधुनीच्या मुखांतून पश्विमेकडे एक खाडी जात असलेली त्याला आढळली. त्या खाडीला त्यानें‘फ्यूरीची खाडी’ असें नांव दिलें. पॅरीचा स्नेही फ्रँकलिन यानें याच सुमारास कॉपरमाईन नदीच्या मुखापर्यंत जाऊन तेथून ५५० मैल पर्यंतचा किनारा धुंडाळून टाकला. आपल्या प्रवासाच्या शेवटच्या स्थानाला त्यानें‘कॅपटन जीन’ हें नांव दिलें.
१८२१-२४ च्या अवधींत, रशियन कॅप्टन लुटके यानें, नोव्हा झेमलाच्या पश्विम किनार्याची पहाणी केली व नजीकच्या समुद्रांतील बर्फाचें संशोधन केलें. १८२३ मध्यें क्लेव्हरिंगनें, ग्रीनलंडच्या पूर्वकिनार्याची पहाणी केली. सन १८२९ मध्यें, कॅप्टन ग्रह नांवाच्या डॅनिश संशोधकानें, केप फेअरवेलला वळसा घातला. अमेरिकेच्या बाजूच्या उत्तर ध्रुवप्रदेशाचें संशोधन, हडसन बे कंपनीच्या संशोधकांनीं केलें. पॅरी, फ्रँकलिन, रॉस इत्यादि संशोधकांनीं जे तुटक तुटक शोध केले होते ते सर्व शोध पूर्ण करण्याचें काम या कंपनीच्या संशोधकांनीं केलें. न्यू सैबीरियांतहि रशियन लोकांनीं बारकाईनें संशोधन चालविलेंच होतें. या कामांत अंजू, रँगेल, मिडेनडॉर्फ यांनीं फार मेहनत घेतली. १८४६ मध्यें फ्रँकलिननें जी मोहीम अंगावर घेतली ती यशस्वी झाली नाहींच पण त्या मोहीमेंत फ्रँकलिनचें काय झालें हें दोन वर्षें कळलेंच नाहीं. तेव्हां त्याच्या शोधार्थ रॉस, ऑस्टीन, केनेडी, बेलॉट, कॉलिन्सन इत्यादि संशोधकांनीं खूप प्रयत्न केले पण त्याचा कांहीं पत्ता लागला नाहीं. पण या फ्रँकलिनच्या शोधार्थ निघालेल्या संशोधकांनीं इतर पुष्कळ शास्त्रीय शोध लावले.
फ्रँकलिन व त्याचे साथीदार यांचा शोध करण्यासाठीं म्हणून, अमेरिकेनें या उत्तरध्रुवसंशोधनाच्या बाबतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. त्यांच्या शोधार्थ जी सफर निघाली त्यांत डॉ. केन नांवाचा एक शास्त्रज्ञ होता. त्यानें, स्मिथसाउंड ते बॅफीन बे यांमधील प्रदेशांचें संशोधन केलें. नार्वेमधील संशोधकांनीं स्पिट्झबर्गनच्या भोंवतालच्या समुद्राचें पूर्ण संशोधन करण्यास सुरुवात केली. या बाबतींत किलहौचे प्रयत्न महत्वाचे होते. पुढें या नोर्वेजियन संशोधकांचें अनुकरण, स्वीडनमधील लोकांनीं केलें. त्यांनीं या स्पिट्झबर्गनच्या किनार्यावरील निरनिराळ्या ८० स्थलांची पहाणी केली, व बर्फाच्या पर्वतांची उंची निश्वित केली. पण उत्तर ध्रुवसंशोधनाच्या बाबतींत अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे ग्रीनलंडचा अंत:प्रदेश होय. हा अंत:प्रदेश पूर्णपणें बर्फमय असल्यामुळें, त्याचें संशोधन करणें अतिशय कठिण झालेलें आहे. या प्रदेशाचा शोध लावण्याचे पुष्कळ प्रयत्न झाले. शेवटीं नॉर्डन स्कियोल्ड यानें, समुद्रापासून २२०० फूट उंचीपर्यंत या अंत:प्रदेशांत प्रवास केला.
१८७५ मध्यें ब्रिटीश संशोधकांची सफर निघाली व कॅप्टन मार्कहॅम वगैरे संशोधकांनी, उत्तरध्रुवप्रदेशाच्या ३०० मैलांच्या टापूचें निरनिराळ्या तर्हेनें निरीक्षण केलें. १८७९ मध्यें मार्कहॅम, व गोरेबुथ यांनीं, बेरेंट्स व कॉरा समुद्रांतील बर्फाच्या प्रवाहाचें व थरांचें शास्त्रीय तर्हेनें निरीक्षण केलें. १८७५ मध्यें प्रो. अमंडहेलंड या नार्वेजियन भूस्तरशास्त्रवेत्त्यानें ग्रीनलंडची सफर करून ग्रीनलंडमधील बर्फाचा प्रवाह फारच जलद असतो असें सिद्ध केलें. ग्रीनलंडच्या अंत:प्रदेशाचें संशोधन करण्याचा प्रयत्न जेन्सेन, लेफ्टनंट हेमर, होल्मगर्डे, नान्सेन इत्यादिकांनीं केला व त्यांनीं ग्रीनलंडसंबंधीं पुष्कळच शास्त्रीय माहिती जमा केली.
सन १८७५ सालीं फ्रँझ जोसेफ लँडचा संशोधक लेफ्टनंट वायप्रेक्ट यानें, जर्मन सृष्टिशास्त्रवेत्त्यांच्या सभेंत एक निबंध वाचला. त्यांत त्यानें उत्तरध्रुवप्रदेशाच्या संशोधनापासून कोणते फायदे होतील व ते कसे साध्य करून घेतां येतील, या संबंधीचें आपलें मत पुढें मांडलें. उत्तरध्रुव व दक्षिणध्रुव मंडळाच्या सभोंवतीं स्टेशनें उभारून त्याठिकाणांहून, ज्योतिर्निरीक्षण अगर इतर भौगोलिक निरीक्षण करण्यांत यावें अशा तर्हेची त्यानें सूचना केली. या त्याच्या सूचनेला अनुसरून सन १८७९ व ८० मध्यें हँबर्ग येथें सार्वराष्ट्रीय ध्रुवसंशोधकांच्या परिषदा भरून त्यांत प्रत्येक राष्ट्रानें, एक अगर अधिक स्टेशनें बांधून, तेथून ज्योतिर्निरीक्षण वगैरे १८८२ च्या आगस्टपासून करण्यास सुरवात करावी असें ठरलें. त्याप्रमाणें निरनिराळ्या राष्ट्रांनीं आपलीं स्टेशनें बांधली व ठरल्याप्रमाणें निरीक्षणास सुरवात झाली; व ठरलेलें निरीक्षणाचें कार्य सुखरूप तर्हेनें पारहि पडलें.
सन १८८३-८५ त होल्मच्या आधिपत्याखालीं निघालेल्या डेन लोकांच्या सफरींत, ग्रीनलंडच्या पूर्वकिनार्याची पहाणी करण्यांत आली. १८९२-९३ मध्यें बर्लिन जीऑग्राफिकल सोसायटीनें ग्रीनलंडच्या पश्चिम किनार्यावरील बर्फाच्या थरांचा अभ्यास केला. ग्रीनलंडच्या अंत:प्रदेशाचें संशोधन करण्याचें काम पॅरी व नान्सेन यांनीं केलें. या अंत:प्रदेशांतील बर्फाच्छादित भागाची सर्वांत अतिशय उंची ५७०० फूट होती. तींवर पॅरी हा अत्यंत हालांत व उपसमारीत आपल्या दोन चार सोबत्यांच्या मदतीनें चढून गेला. तो चढून गेल्यावर त्याला चांगली जमीन लागली व समोर एक मोठा उपसागर दिसला. याला त्यानें‘इंडिपेंडन्स बे’ हें नांव दिलें. परत येतांना तर त्याचे न भूतो न भविष्यति हाल झाले. या सफरीचा मात्र अतोनात फायदा झाला.
डॉ. नान्सेन यानें आर्क्टिक महासागराच्या आसपासच्या प्रदेशांतील हवेचें पूर्ण निरीक्षण करून नंतर त्यानें आपल्या सफरीला सुरवात केली. ज्या जहाजांतून त्यानें जावयाचें ठरविलें तें जहाज अत्यंत बळकट असून, त्या प्रदेशाला उपयोगी पडेल अशा तर्हेनें तें बांधण्यात आलें होतें. नान्सेन बरोबर दहाबारा मंडळी होती. जहाजाचें नांव फ्राम होतें. या जहाजांतून कॉरा समुद्रांतून प्रवेश करून, आशियाच्या उत्तर दिशेला तो आला व तेथून त्यानें बर्फाच्या समुद्रांतून तें जहाज हांकारलें. इतका धाडसाचा व उंचीचा प्रवास अद्याप कोणी केलेला नव्हता. आशियाच्या किनार्यावर जें बर्फ जमतें तें तीन अगर पांच वर्षांनीं या उत्तरध्रुव प्रदेशाला येऊन मिळतें असें नान्सेन याच्या सफरीवरून पूर्णपणें सिद्ध झालें. या सफरींत असतांना, नान्सेन यानें अनेल ठिकाणांचें संशोधन केलें. ही सफर तीनचार वर्षांनीं शेवटास गेली. शास्त्रीयदृष्ट्या या सफरीचा अतिशय फायदा झाला.
१८९७ मध्यें मार्टिन कॉन बे यानें स्पिट्झबर्गनच्या प्रदेशाचें संशोधन केलें. त्यानंतर मोनॅकोच्या राजपुत्रानेंहि पुष्कळ शास्त्रीय शोध लावले. पण सर्वांत अधिक उंचीचा पल्ला गांठण्याचें काम अॅब्रझीचा ड्यूक लुशी यानें केलें. यानें आपल्याबरोबर येणार्यांच्या दोन टोळ्या केल्या. दुसर्या टोळीनें पायीं प्रवास करून ४५ दिवसांत ८६ अक्षांशांइतकी उंची गांठली. त्यावेळेपर्यंत इतकी उंची कोणीच गांठली नव्हती. येतांना या टोळीला अत्यंत त्रास झाला. तरी पण ६० दिवसानंतर ती टोळीं सुखरूप परत आली.
सन १८९७ मध्यें, अॅड्री नांवाच्या वैमानिकानें स्पिट्झबर्गनच्या उत्तरेला विमानाच्या द्वारें सफर करण्याचें ठरविलें. दोन वर्षांची शिधासामुग्री घेऊन तो प्रवास करून त्यानें ८२ अक्षांशांपर्यंतच उंचीवर आपलें विमान नेलें, पण पुढें त्या विमानाचा व अँड्रीचा पत्ताच लागला नाहीं.
सैबीरियाच्या भोंवतालच्या प्रदेशाचा नकाशा तयार करण्याच्या कामीं डॉ. बंगे व बॅरन टॉल या शास्त्रज्ञांनीं १८८६ साली प्रयत्न केला. १८९३ मध्यें बॅरन टॉलनें सस्तन प्राण्यांचे अवशेष शोधून काढलें. न्यू सैबीरियाचा अगदीं उत्तरेकडील प्रदेश शोधून करण्याचा टॉलनें प्रयत्न केला पण त्यांत त्यालाच प्राणास मुकावें लागलें.
१९०१ मध्यें रोल्ड अमंडसेन नांवाच्या नार्वेजियन संशोधकानें उत्तरध्रुवापाशीं जाण्याचा प्रयत्न केला. अँड्रप नांवाच्या शास्त्रज्ञानें ग्रीनलंडच्या पूर्व किनार्याची भौगोलिक माहिती मिळविण्यासाठीं १८९९-१९०० च्या दरम्यान पुष्कळ सफरी केल्या. याशिवाय मिलियस एरिचसेन यानेंहि निरनिराळ्या भागांचें संपूर्णपणें निरीक्षण केलें.
पण या सर्वांत अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे पॅरीचा उत्तरध्रुवाचा शोध ही होय. या महान धाडशी संशोधकानें या शोधानें आपलें नांव अजरामर करून ठेवलें आहे. त्यानें १८९८-९९ मध्यें ग्रीनलंडच्या उत्तरेकडील सर्वांत शेवटचें टोंक गांठलें. १९०२-०३ मध्यें त्यानें केप हेक्ला येथें पायीं प्रवास केला. तेथून त्यानें एस्किमो लोकांच्या साहाय्यानें उत्तरध्रुवाची मजल गांठण्याचा प्रयत्न केला पण ८७०.६ इतक्या अक्षांशांत आल्यानंतर त्याला उत्तरध्रुवाकडे पुढें जाणें अशक्य झालें. त्यामुळें त्याला तो बेत रहित करावा लागला पण १९०७ सालीं त्यानें पुन्हां शेवटचा प्रयत्न करावयाचें ठरविलें. त्याप्रमाणें तो १७ एस्किमो; ७ संशोधक व १३३ कुत्रीं बरोबर घेऊन पायीं प्रवास करण्यास निघाला. अनेक अवर्णनीय हाल सोसून तो शेवटीं ८९० ५७’ इतक्या अक्षांशांच्या उंचीवर येऊन पोहोंचला. तेंच उत्तरध्रुवाचें ठिकाण अशी त्यानें पूर्णपणें आपली खात्री करून घेतल्यावर त्यानें त्या ठिकाणीं अमेरिकेचें निशाण फडकविलें. अशा रीतीनें उत्तरध्रुव संशोधनाचें कार्य इतक्या वर्षानंतर व अनेक अवर्णनीय साहसांनंतर सिद्धीस गेल्यासारखें झालें.
अ र्वा ची न शो ध. – सन १९०९ सालीं पॅरीनें उत्तरध्रुवाचा शोध लावल्यानंतर त्या प्रदेशाचें शास्त्रीयदृष्ट्या संशोधन करण्याचे प्रयत्न सुरू झाले. डेन्स लोकांनीं ग्रीनलंडच्या प्रदेशाचें सूक्ष्म दृष्टीनें संशोधन सुरू केलें आहे व त्यामुळें भौगोलिक माहितीवर एस्किमो मानवजातीच्या उत्पत्तीसंबंधाच्या ज्ञानावर अधिकच प्रकाश पडला आहे. या प्रदेशाचें संशोधन करण्यासाठीं पुष्कळ पैसा व श्रम खर्ची पडले. सन १९१० मध्यें रसमुसेन यानें नॉर्थ स्टार बे मध्यें थ्यूल हें ठिकाण पुढील संशोधन करण्यासाठीं मुकर केलें. सन १९१२ मध्यें रसमुसेन हा आपल्या दोघातिघा इसमासह ग्रीनलंडच्या प्रदेशांत जावयास निघाला. ३-४ महिने त्या प्रदेशांत हिंडून त्यानें पेरी चॅनल हें आस्तित्वांतच नाहीं असें सिद्ध केलें. हीच गोष्ट याच्याहि पूर्वीं निघालेल्या मिक्लेसन व इव्हरसन यांच्या सफरीनेंहि सिद्ध झाली. १९१३ सालीं, डे कॉच व डॉ. वेगॅनर यांनीं ग्रीनलंडच्या मध्यभागाची सफर केली. पण याहिपेक्षां महतत्वाची सफर, रसमुसेन यानें ग्रीनलंडचा वायव्य किनारा शोधण्यासाठीं काढली. त्याच्याबरोबर कॉच, डॉ. वुल्फ, आल्सेन, वगैरे मंडळी होती. बर्फमय प्रदेशांतून ७०० मैल प्रवास केल्यानंतर सेंट जार्ज जोर्ड या ठिकाणीं त्यांनीं संशोधन करण्यास सुरुवात केली. या ठिकाणीं एस्किमो लोक येऊं शकले असतील किंवा नाहीं यासंबंधीं रसमुसेन याला शंका वाटूं लागली. १९२० मध्यें कॉचच्या नेतृत्वाखालीं जी तिसरी स्वारी निघाली. त्या स्वारींत पॅरी लँड शोधून, ग्रीनलंडच्या वायव्य किनार्याची अधिक माहिती मिळण्याच्या कामीं उपयोग झाला.
१९०६ मध्यें परीनें ग्रँट लँडच्या पश्विमेस, कोकर लँड नांवाचा प्रदेश आहे असें प्रसिद्ध केलें होतें. त्यासंबंधींचा अधिक तपास लावण्याकरितां अमेरिकन जीऑग्राफिकल सोसायटीनें व इतर अमेरिकन संस्थानांनीं एक संशोधकांचें मंडळ १९१३ मध्यें रवाना केलें. या संशोधकांचा पुढारी डॉ. मॅकमिलन हा होता. या संशोधकांनीं एलेसमीरचा प्रदेश बारकाईनें तपासला, व त्याचा नकाशा तयार केला. ब्यूफर्ट समुद्राच्या भोवतालच्या प्रदेशांत देखील संशोधनाचा प्रयत्न करण्यांत आला पण त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं.
१९०६-७ च्या उत्तरध्रुवावरील सफरींत स्टीफन्सन नांवाचा एक संशोधक सामील झाला होता. त्यानें मॅकेंझी टापूमधील एस्किमो जातीच्या लोकांविषयींची बारीक सारीक माहिती करून घेतली; त्यांची भाषा त्यानें अवगत करून घेतली. त्याचा त्याला पुढील १९०८-१२ च्या सफरींत फार फायदा झाला. व्हिक्टोरिया बेटाच्या आसपासचें संशोधन करीत असतां याला एक एस्किमो जातीचा मनुष्य भेटला. या एस्किमोनें गोरा माणूस आजीबाद पहिलाच नव्हता असें स्टीफन्सन यास आढळून आलें. १९१३ मध्यें तो पुन्हां कनडियन सरकारच्या आश्रयाखालीं, ब्यूफर्ड समुद्राचें संशोधन करण्यास निघाला. त्याच्या बरोबर इतर विद्वान शास्त्रज्ञ होते. तो कार्लक नांवाच्या जहाजांत बसून निघाला. कांहीं काळ प्रवास करून ते एका ठिकाणीं येऊन पोहोचले, त्या ठिकाणीं स्टीफन्सन व त्याचे साथीदार शिकार शोधत असतां, समुद्रांत तुफान होऊन तें जहाज भलतीकडेच जाऊन फुटून बुडलें. जहाजावरील इतर माणसांनां सुरक्षितपणें कांठावर आणण्यांत आलें. पुढें स्टीफन्सननें पुष्कळ धाडसाचे प्रवास करून, समुद्रकांठचीं व समुद्रांतील निरनिराळीं बेटें त्यानें शोधून काढलीं. तसेंच, व्हिक्टोरिया व बँक्स वगैरे बेटांची त्यांनें बारकाईनें पहाणी केली. स्टीफन्सन याच्या या पहाणीमुळें व सफरीमुळें. मानव जातिशास्त्रांत व भूस्तरशास्त्रांच्या बाबतींत पुष्कळच नवीन शोध लागले.
रशियन संशोधकांनीं, उत्तरध्रुवाचा शोध लावण्याकरितां पुष्कळ प्रयत्न केले पण त्यानां यश आलें नाहीं. पण आशियाच्या उत्तरेकडील प्रदेशाचें संशोधन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला बरेंच यश आलें. पण त्या संशोधनाची समग्र माहिती नष्ट झाल्यामुळें त्यांच्या संशोधनाची हकीकत वाचावयास उपलब्ध नाहीं.
जून १९१८ मध्यें उत्तरध्रुवाच्या पायथ्याची माहिती मिळविण्याकरितां नॉर्वेहून संशोधकांचें एक मंडळ निघालें, या मंडळाचा मुख्य रोल्ड अॅमंडसन हा होता. यानें आर्क्टिक समुद्रांतून ईशान्येकडील मार्गानें प्रवास केला व तिकडील प्रदेशाची माहिती मिळविली.
गेल्या दहा वर्षांमध्यें संशोधित उत्तर ध्रुवाजवळील प्रदेशावर कोणत्या ना कोणत्या तरी राष्ट्राचा ताबा सुरू झाला आहे. १९१७ च्या तहान्वयै युनायटेड स्टेट्सकडे ज्यावेळीं डॅनिश वेस्ट इंडिज बेटांची मालकी आली त्यावेळीं युनायटेड स्टेट्सनें डेन्मार्कचा ग्रीनलंड प्रदेशावरील पूर्ण स्वामित्वाचा हक्क मान्य केला होता. महायुद्ध सुरू झाल्यानंतर, आशियाच्या उत्तरेकडील उत्तरध्रुवाच्या प्रदेशांतील बेटांवर आपला हक्क आहे असें रशियानें जाहीर केलें व आगस्ट १९१४ त फ्रँझ जोसेफ येथें रशियन निशाणहि फडकूं लागलें. १९१९ मध्यें स्पिट्झबर्गन व बेअर बेटांची मालकी सुप्रीम कौन्सिलनें नॉर्वेकडे दिली. अमेरिकेनें शोधून काढलेला आर्क्टिक सागराचा ताबा मात्र कानडानें आपल्याकडे आहे असें जाहीर केलें.
उत्तरध्रुवप्रदेशावर अलीकडे तीन सफरी केल्या गेल्या, त्या अमुंडसेनची, रॅसमुसेनची व स्टीफॅन्सनची या होत.
अ मुं ड से न ची स फ र. – १९२३ मध्यें अमुंडसेननें विमानानें उत्तर ध्रुव ओलांडून जाण्याचा बेत केला. प्रयोगात्मक प्रयत्न १९२३ च्या उन्हाळ्यांत करण्यांत आले. १९२४ च्या उन्हाळ्यांत स्पिटझबर्गनपासून आलास्काला पोहोंचण्याकरितां उत्तरध्रुव ओलांडून विमानांतून जाण्याचा बेत अमुंडसेननें ठरविला आहे.
रॅ स मु से न ची स फ र.– १९२१-२३ या काळांत क्नूड रॅसमुसेन या डॅनिश संशोधकानें उत्तर व ध्रुवप्रदेशाकडील मानववंशशास्त्रीय, पुराणसंशोधनशास्त्रीय, व हवामान शास्त्रीय अशी बरीचशी माहिती मिळविली. १९२१ पर्यंत किनार्यानजीक राहणार्या एस्किमोबद्दलच फक्त माहिती मिळालेली होती. सदरहू सालीं रॅसमुसेननें अन्त:प्रदेशांत राहणार्या एस्किमोंच्या दोन जाती असल्याचा शोध लागला. १९२२ मध्यें सुमारें एस्किमोंच्या दोनशें दंतकथा लिहून काढण्यांत आल्या, आणि रिपल्स बे व बेजर बे या उपसागराच्या किनार्यांवरील हवामानाविषयींहि त्यानें बर्याच गोष्टी नमूद केल्या. एस्किमो लोकांमध्यें दोन निरनिराळ्या प्रकारचे आचारविचार (संस्कृति) आहेत. या म्हणण्याला पुष्टिकारक पुरावा मिळाला आहे. एका जातीच्या संस्कृतीचें व्हेल माशांच्या हाडांचीं व दगडांचीं जुनीं कायम व टिकाऊ घरें, हें निदर्शक आहे; व दुसर्या जातीची संस्कृति ऐबिलिक व इडलुलिक एस्किमोमध्यें दिसून येते. या सफरीनें अन्तर्भागांतील एस्किमोंच्या जुन्यापुराण्या वस्तूंची लांबीरुंदीची मापें दिली आहेत. ज्या प्रदेशांत प्रवास केला त्याचे नकाशे तयार केले आहेत.
स्टी फे न स न ची स फ र :- १९२१ च्या सप्टेंबर महिन्यांत स्टीफेनसन नांवाच्या कानडांतील संशोधकानें रँगल नांवाच्या लहान बेटावर ब्रिटीश निशाण रोवलें. हें बेट उत्तरमहासागरांत सैबीरीयाच्या उत्तरेस आहे, व त्यावर जपाननें किंवा सोव्हिएट सरकारनें हक्क सांगू नये म्हणून ब्रिटीश निशाण रोंवण्याची सावधगिरी करण्यांत आली. शिवाय स्टीफेनसननें सहा इसमांची टोळी एक वर्षाची अन्नसामुग्री देऊन तेथें ब्रिटीशांचे हितसंबंध संरक्षण करण्याकरितां ठेविली. १९२२ मध्यें त्यांनां मदत पोहोंचविण्याकरितां एक जहाज पाठविण्यांत आलें, पण त्याला जाण्यास उशीर लागला, त्यामुळें बेटांत ठेवलेल्या एका एस्किमो स्त्री खेरीज करून सर्व इसम मरण पावल्याचें १९२३ सालीं मदतीप्रीत्यर्थ गेलेल्या सफरवाल्यांस आढळून आलें. दहावीस वर्षांत उत्तरध्रुव समुद्र ओलांडून जाण्याचे पुष्कळ वैमानिक मार्ग सुरू होतील, हें सिद्ध करण्याकरितां १९२३ सालीं स्टीफेनसननें प्रयत्न करण्याचें ठरविलें. त्यानें असें प्रतिपादिलें कीं, सदर्हू प्रदेशांतील प्रकाशविषयक स्थिति अगदीं उत्तम आहे, हवामानविषयक परिस्थिति अनुकूल करून घेण्यासारखी आहे, आणि तेल, कोळसा व इतर सामुग्री या प्रदेशांत आहे.
या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला कीं, युनायटेडस्टेटस आरमारानें १९२४ सालीं आगबोटीनें व विमानानें उत्तरध्रुवाची सफर करण्याची नक्की योजना केली आहे. सर्वांत अधिक उत्तरेकडील लोहचुंबकीय वेधशाला (मॅग्नेटिक आब्झर्वेटरी) रेफ्यूज बे, उत्तर ग्रीनलंड येथें वाशिंगटनची कार्नेजी इंस्टिट्यूशन व मॅकमिलन आर्टिक एक्स्पिडिशन यांनीं १९२३ मध्यें स्थापिली आहे. हें ठिकाण भौगोलिक उत्तरध्रुवाच्या दक्षिणेस ७०० मैल अंतरावर आहे; आणि लोहचुंबकीय उत्तरध्रुवाच्या ५५० मैल उत्तरईशान्येस (नार्थ - नार्थ ईस्ट) आहे.
[संदर्भग्रंथ:- ग्रीलि – हँडबुक ऑफ पोलर डिस्कव्हरी (लंडन अँड न्यूयॉर्क १९१०); जे चव्हॅन – दि लिटरेचर ऑफ दि पोलर रीजन्स (व्हिएन्ना १८७८); स्कोअर्स बी – अॅन अकाउंट ऑफ दि आर्क्टिक रीजन्स (२ भाग एडिंबरो १८२०); पॅरी – अटेम्ट टु रीच दि नॉर्थ पोल (लंडन १८२८); ऑसबोर्न - दि डिस्कव्हरी ऑफ दि नार्थ वेस्ट पॅसेज (लंडन १८५७); नेर्स-व्हायेज टु दि पोलर सी (१८७५-७६ २ भाग लंडन १८७८); ए. एच. मार्कहॅम – दि ग्रेट फ्रोझन सी; रिचर्डसन – दि पोलर रीजन्स (एडिंबरो १८६१); मार्क हॅम – दि थ्रेशहोल्ड ऑफ दि अन्नोन रीजन (लंडन १८७३); पॅरी – न्यूलँड्स वुइदिन दि आर्क्टिक सर्कल (२ भाग लंडन १८७६); नानसेन –दि फार्देस्ट नॉर्थ (२ भाग लंडन १८५७); दि नार्वेजियन नॉर्थ पोलर एक्स्पिडिशन (१८९३-१८९६); नानसेन – इन नॉर्दन मिस्ट्स (१९११); हल्थ-स्वीडिश आर्क्टिक अँड अन्टार्क्टिक एक्स्प्लोरेशनस (१७५८-१९१०), अंड्रप-रिपोर्ट ऑन दि डेन्मार्क एक्स्पिडिशन्स (१९०६-८); मीकलसन-रिपोर्ट ऑन दि अल्बामा एक्स्पिडि. (१९०९-१२) स्टीन्सबी-अँथ्रॉपॉलाजिकल स्टडी ऑफ दि ग्रीनलंड एस्किमो; दि अॅक्टिव्हिटीज ऑफ दि कॅनेडियन आर्क्टिक एक्स्पिडिशन; (१९१६-१८); स्टीफनसन-माय लाइफ वुइथ एस्किमो (१९१३); बार्ललेट अँड हेल-दि लास्ट व्हायेज ऑफ दि कार्लक (१९१६); नान्सेन-स्पिट्झबर्गन वाटर्स.]