विभाग नववा : ई-अंशुमान
उत्तर सरकार – मद्रास इलाख्याच्या उत्तरेकडील गंजम, विजगापट्टण, गोदावरी, कृष्णा व गंतूर या ५ जिल्ह्यांपैकीं प्रत्येकाचें नांव असून तें मुसुलमानी अमदानीपासून चालत आलें आहे.
१७५० त मुजफरजंग हा फ्रेंचांच्या मदतीनें दक्षिणेचा सुभेदार झाल्यावर त्यानें मच्छलीपट्टण व सभोंवारचा प्रदेश त्यांच्या स्वाधीन केला. यानंतर सलाबतजंग गादीवर आल्यावर त्यानें मच्छलीपट्टण व १७५३ त सर्व उत्तर सरकार प्रदेश फ्रेंचांनां देऊन टाकला. पुढें बुशी यानें याच्यावर एक नांवांचा राजा बसविला व सर्व सत्ता आपल्या हातीं ठेविली. याला विजयाराम राजराजा म्हणत. याच्या नंतर आनंदराव हा गादीवर आला. यानें हा प्रदेश बंगाल्यांतील इंग्रजांस देऊं केला व लगेच क्लाईव्ह यानें सैन्य पाठवून मच्छलीपट्टण हस्तगत केलें होतें. पुढें सलबतजंगाशीं तह करण्यांत आला व या तहान्वयें मच्छलीपट्टण व त्याच्या सरहद्दींतील ८० मैल लांब व २० मैल रुंद असा प्रदेश इंग्रजांस देण्यांत आला. यानंतर १७६५ त शहा अलम बादशहानें पांचहि सरकार कंपनी सरकारास दिले. ही देणगी संरक्षण करण्याकरितां इंग्रजांनीं कोंडपल्ली किल्ला हस्तगत करून ता. १२ नोव्हेंबर १७६६ रोजीं हैद्राबादच्या निजामाशीं तह केला. या तहान्वयें कंपनी सरकारनें देणगीचा मोबदला म्हणून दरसाल ९० हजार पौंड खर्चून निजामच्या मदतीकरितां फौज ठेवण्याचें कबूल केलें. यावेळीं गंतूरवर निजामचा भाऊ बसालतजंग याची खास मालकी असल्यामुळें तें मेहरबानी खातर तो मरेपर्यंत तहाच्या अटींतून वगळण्यांत आलें होंतें. ता. १ मार्च १७६८ रोजीं दुसरा तह झाला. या तहान्वयें निजामानें शहा अलम बादशहानें सरकार प्रांताचीं दिलेली देणगी कबूल करून त्या प्रीत्यर्थ इंग्रजांकडून सालिना ५० हजार पौंड घेण्याचें ठरलें. याहि वेळीं गंतूर वगळण्यांत आलें होतें. १७६९ त इंग्रज या प्रांताची प्रत्यक्ष रीतीनें व्यवस्था पाहूं लागले. १७८८ त म्हणजे बसालतजंग मेल्यावर सहा वर्षांनीं गंतूर इंग्रजांच्या ताब्यांत आलें. पुढें १८२३ त इंग्रजांनीं निजामास ११६ १/२ लाख रु. देऊन या प्रांतावर कायमची मालकी मिळविली.