विभाग नववा : ई-अंशुमान

उत्रौला, त ह शी ल.– संयुक्त प्रांत. ही गोंदा जिल्ह्यांतील उत्तर अणि दक्षिणेकडील तहशील असून हींत उत्रौला, सादुल्ला नगर, बुढापारा, मणकापूर, बलरामपूर आणि तुळसीपूर वगैरे परराण्यांचा समावेश होतो. हिचें क्षेत्रफळ १५६५ चौ. मै. असून लोकसंख्या १९११ सालीं ६७०५८१ होती.  एकदंर खेडीं १४७४ असून बलरामपूर व उत्रौला हीं दोन शहरें आहेत. १९०३-०४ सालीं काळीचें उत्पन्न ७५५००० असून इतर बाबीपासून १११००० रु. उत्पन्न झालें. तहशिलीचा बहुतेक भाग रापती नदीच्या उत्तरेस नेपाळ सरहद्दीवर हिमालयाच्या पायथ्याशीं आहे. जंगल १४२ चौ. मैलाचें असून रापती नदीचा दक्षिणभाग जास्त सुपीक आहे. १९०३-०४ सालीं १००६ चौ. मै. जमीन लागवडी खालीं असून त्यांतील २२१ चौ. मै. पाण्याखालची होती.

श ह र. - संयुक्त प्रांत. गोंदा जिल्ह्यांतील उत्रौला तहशिलीचें मुख्य ठिकाण. याची लो. सं. (१९११) ६५२३. असून येथें अलिखान यानें बांधलेलें एक सुंदर सरोवर अद्याप अस्तित्वांत आहे व सरोवराच्या कांठीं त्याच्याच वंशजांपैकीं कांहींचीं थडगीं आहेत. सुमारें १५५२ च्या सुमारास अलीखान यानें उत्रौला शहर हस्तगत करून घेतलें होतें. या ठिकाणीं एक जुना किल्ला आहे. त्याच्या कांहीं भागांत तहशील कचेरी असते. येथें म्यु. कमिटी. असून १९०३-०४ सालीं तिचें उत्पन्न ५५०० होऊन खर्च ४००० झाला होता. स्थानिक व्यापार थोडा फार चालतो. मातीचीं भांडीं सुबक करितात. येथें ३ शाळा आहेत.