विभाग नववा : ई-अंशुमान
उदयगिरि, ता लु का– मद्रास. गंजम जिल्ह्यांतील उत्तर एजन्सीतील तालुका. याचें क्षेत्रफळ ५०४ चौ. मै. असून बहुतेक प्रांत पहाडी आहे. १९११ सालीं लोकसंख्या ८१७३० असून खेड्यांची संख्या ४०३ होती. या तालुक्यांत गुमसूर, मालिया, कोरडा व राणबा या जमीनदार्या असून सगळे गुमसूर उदयगिरी येथें राहतात. राणबा जमीनदार सरकारला कांहीं देत नसून, कोरडा सालीना १५ रुपये देतो. १९०३-०४ सालीं गुमसूर भालिया जमीनदारींत सरकारला २५०० रुपये काळीचा वसूल आला. एकंदर लोकसंख्येंत खोंड लोकांचा भरणा विशेष आहे.
(२)– मद्रास. नेलोर जिल्ह्यांतील एक तालुका. याचें क्षेत्रफळ ८७१ चौ. मै. असून लोकसंख्या १९११ त ९८३९१ होती. खेड्यांची संख्या १३३ असून तालुक्याचें मुख्य ठिकाण उदयगिरी येथें आहे. काळीचें व इतर बाबी मिळून उत्पन्न ७४ हजार रुपये आहे. अगदीं उत्तरेस कालहस्ती ही जमीनदारी आहे. पश्चिमभाग पहाडी असल्यामुळें जमीन सुपीक नाहीं. पूर्वेकडील भाग चांगला आहे. मनेरु व पल्लिपेरु या नद्या उत्तरेस व बागेरु नदी दक्षिणेस वाहते. या नद्या कालव्यांच्या उपयोगी नाहींत. पाण्याचा पुरवठा विहिरींपासून होतो. तरी पाऊस कमी पडल्यास विहिरी आटण्याचा फार संभव आहे. एकंदरींत पाण्याचा पुरवठा कमी व पाऊसहि कमी, तेव्हां पीक कमीच. यामुळें लोकांची स्थिति चांगली नाहीं. त्यामुळें उदरनिर्वाहाकरितां लोक बाहेर जातात.
गां व – मद्रास. नेलोर जिल्ह्यांतील उदयगिरी तालुक्याचें मुख्य ठिकाण. लोकसंख्या (१९०१) ४०२१. पूर्वीं हें शहर फार मोठें होतें. या शहराच्या सभोंवतीं तट होता तोहि आतां नाहींसा झाला आहे. तरी पहाडावरील कांहीं अवशेष अजून नजरेस पडतात. किल्ल्याला १३ दरवाजे होते. पैकीं ८ पहाडावर असून ५ खालीं गांवांत होते. तटाच्या आंत देवळें, थडगीं व राजवाडे यांचे अवशेष सांपडतात. पहाडाचा कांहीं भाग संबंध तुटल्यामुळें दुर्गम झाला आहे. १४ व्या शतकांत या ठिकाणीं लांगूल गजपती नांवाचे राजे राज्य करीत होते. १५१२ त विजयानगरच्या कृष्णदेवानें तें राज्य बळकावलें. नंतर तें गोंवळकोंड्याच्या सत्तेखालीं आलें. पहाडाच्या शिखरावर एक मशीद आहे. तीवर एक फारसी शिलालेख आढळतो. त्यावरून ती मशीद गोंवळकोंड्याचा सुलतान अबदुल्ला राज्य करीत असतां १६६० मध्यें शेख हुसेन यानें बांधली असें कळतें. अर्काटच्या नबाबानें उदयगिरी जहागीर मुस्तफा अलीखान नांवाच्या मनुष्याला दिलेली होती. १८३९ सालीं त्या घराण्यांतल्या शेवटच्या मनुष्यास राजद्रोहाच्या आरोपावरून चिंगलपट येथें पाठवून देऊन जहागीर जप्त केली. या ठिकाणीं एक दवाखाना व शाळा आहे.
(२) ग्वाल्हेर संस्थान. भिलसा जिल्ह्यांतील एक प्राचीन गांव. बेट्वा आणि बेश नद्यांच्या मध्यभागीं भिलसापासून चार मैल दूर हें आहे. येथें पुष्कळ लेणीं असल्यामुळें यास महत्त्व आलेलें आहे. येथें जैनमंदिरांचे अवशेष असंख्य आहेत. वायव्येपासून आग्नेयीपर्यंत सरासरी टेंकडीची लांबी पाऊण मैल असून पायथ्यापासून ३५० फूट उंच आहे. येथें एकंदर लेणीं पुष्कळ आहेत. परंतु त्यांत नंबर ३,४,९ आणि १० हीं सुंदर असून ऐतिहासिक महत्त्वाचीं आहेत.
नंबर ३ चें लेणें १४ फूट लांब व १२ फूट रुंद आहे. त्याला कमानदार खोदींव दार असून व लगत एक खोलीं असून तींत अष्टमातृकेची मूर्ति आहे. नंबर ४ चें लेणें वराह अवताराचें आहे. त्यांत गंगायमुनांचा प्रवाह स्पष्ट दाखविला आहे. नंबर ९ चें लेणें सर्वोत्कृष्ट आहे. हें २२ फूट लांब व १९ फूट रुंद आहे. त्याच्या चोहों बाजूनें ४ खांब असून वर उत्कृष्ट छत आहे. नंबर १० चें लेणें जैनांचें असून जैनांचा २३ वा तीर्थंकर पारसनाथ याची मूर्ति आहे. हें लेणें ५० फूट लांब, १६ फूट रुंद असून यांत ५ खोल्या काढलेल्या आहेत.
मगध देशच्या चंद्रगुप्तानें गुजराथ आणि माळवा सर केला त्या वेळच्या तारखा शिलालेखांत स्पष्ट नमूद केलेल्या आहेत. असेच आणखीहि दुसरे शिलालेख पुष्कळ आहेत.
टें क डी–( सूर्योदय टेंकडी ) बंगाल. कटक जिल्ह्यांतील जाजपूर पोटविभागांतील एशिया पहाडावरील उंच शिखर. हें जिल्ह्याच्या अगदीं पूर्वेस टेंकडीवर असल्यामुळें याला उदयगिरी हें नांव पडलेलें आहे. या ठिकाणीं एक देऊळ असून त्याचे तीन भाग आहेत. यांत एक मोठी प्रचंड बुद्धाची बसलेली मूर्ति आहे. मूर्ति १० फूट उंचीची असून छातीपर्यंत जमिनींत गढलेली आहे. देवळाच्या उत्तरेस बोधिसत्वाच्या २ कोरींव मूर्ती आहेत. शिवाय २ मूर्ती अलीकडे सांपडल्या आहेत. पश्विमेस एक विहीर असून द्वाराजवळ पद्मपाणी बोधिसत्त्वाची ८ फूट उंचीची मूर्ति एका खडकाची कोरलेली आहे.