विभाग नववा : ई-अंशुमान
उदयन - मगध देशचा राजा, शैशुनाग वंशांतील आठवा पुरुष. याचीं उदय, उदयन, उदयाश्व, वत्सराज अशींहि नांवें आढळतात. बौद्ध याला उदयीभद्ध असें संबोधितात. हा वत्स देशाचा राजा होता. याचा काल ख्रि. पू. ५०३ चा होय. यानें गंगेच्या कांठीं कुसुमपूर हें शहर वसविलें. याची राणी ही अवंतीच्या महासेन राजाची कन्या होय. [ व्हि. स्मिथ अर्ली हिस्टरी पृ. ३८-३९ व ऑक्स. हिस्टरी पृ. ४७ ].
उदयनासंबंधीं बर्याच कथा काव्यांतून ग्रथित केलेल्या आहेत. रत्नावली नाटकांतील नायक उदयन आहे. उज्जनीची राजकन्या वासवदत्ता हिनें वत्सराजाला स्वप्नांत पाहिलें तेव्हांपासून तिचें मन त्याच्यावर बसलें. उदयनाला उज्जनील फसवून नेण्यांत येऊन कैद करण्यांत आलें पण कैदेंत घालणार्या चंडसेन राजाच्या प्रधानानें त्याची जेव्हां मुक्तता केली तेव्हां तो वासवदत्तेलाहि घेऊन गेला.