विभाग नववा : ई-अंशुमान
उदयभानु – उदेभान राठोड. शुक्रवार माघ वद्य नवमी श. १५९१ (फेब्रुवारी सन १६७०) रोजीं तानाजी मालुसर्यानें सिंहगड किल्ल्यावर रात्रींच्या वेळीं पन्नास मावळ्यांनिशीं अचानक हल्ला केला. तेव्हां उदयभानु हा त्या किल्ल्याच्या संरक्षणार्थ मोंगलांकडून नेमलेला तेथील अधिकारी होता व याच्या हाताखालीं रजपूत लोकांचें भरभक्कम सैन्य होतें. परंतु या हल्ल्याच्या वेळीं हा आपल्या सुमारें पांचशें लोकांसह मावळी लोकांशीं लढतां लढतां मरण पावला. शेंकडो रजपूत लोकांनीं तर मराठ्यांच्या तावडींतून सुटण्याकरितां किल्ल्याच्या कड्यावरून खालीं उड्या टाकल्यामुळें त्यांच्यापैकीं कित्येकांचा कपाळमोक्ष झाला. हा मूळचा रजपूत पण बाटून मुसुलमान झाला होता. [ जेधे शकावली ग्रँटडफ.]