विभाग नववा : ई-अंशुमान
उदयसिंह. (१) – उदा राणा हत्यारा (इ. स. १४६९ – १४७४) : उदयसिंह उर्फ उदाराणा हा अपला बाप कुंभोराणा याचा खून करून वि. सं. १५२५ (इ. स. १४६९) मध्यें गादीवर बसला. त्याच्याविषयीं रजपूत लोकांनां इतका तिरस्कार वाटतो कीं,‘हत्यारा’ या निंदाव्यंजक नांवाशिवाय त्याला कोणी उल्लेखीत नाहीं. मागील राण्यांनीं आपल्या प्रयत्नांनीं मेवाडच्या राज्यास जें वैभव प्राप्त करून दिलें होतें त्यांपैकीं अर्धेंअधिक हा आपल्या पांच वर्षांच्या कारकीर्दीत गमावून बसला. त्यानें देवरा ठाकुरास अबूप्रांत देऊन स्वतंत्र केलें, आणि जोधपूरच्या राजास सांभर, अजमीर व त्या लागतचे जिल्हे देऊन त्याची मैत्री संपादण्याचा उपक्रम चालविला. परंतु एवढा लांच देऊनहि त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं. ह्या राजांच्या मैत्रीवर विसंबून राहणें त्यास धोक्याचें वाटल्यामुळें अन्यायानें संपादन केलेलें राज्य हातीं ठेवण्याकरितां शेवटीं तो दिल्लीच्या राजास शरण जाऊन त्यास आपली मुलगी देण्यास तयार झाला. परंतु ईश्वराच्या मनांत मेवाडच्या घराण्याच्या अब्रूस कलंक लागू द्यावयाचा नव्हता. उदयसिंह हा राजाची भेट घेऊन दिवाणखान्याबाहेर पडतो न पडतो तोंच तो अंगावर वीज पडून ठार झाला. (रायमल्ल पहा).