विभाग नववा : ई-अंशुमान
उदर - शरीराच्या ज्या पोकळ भागांत पचनेंद्रियें असतात त्यास हें नांव आहे. यास इंग्रजींत अब्डोमेन हा शब्द आहे. यापैकीं मुखापासून जठरापर्यंतच्या भागांस अन्नमार्ग म्हणतात; व त्यापुढील आंतड्यापासून गुदापर्यंत भागास आंत्रपद्धति हें नांव आहे. वास्तविक पाहतां अन्नमार्ग (अॅलिमेंटरी कॅनाल) म्हणजे मुखापासून गुदद्वारापर्यंत जो पोकळ नळीप्रमाणें मार्ग आहे त्या सर्वासच हें नांव लावणें युक्त आहे. परंतु सोयीसाठीं हा फरक करतात. अन्नमार्गापैकीं ओंठ, मुख, टाळू, घसा हीं सर्वांच्या पूर्ण परिचयाचीं असल्यामुळें त्यांचें वर्णन न केलें तरी चालेल. यापुढील मार्ग म्हणजे गलस्रोत अथवा अन्ननलिका होय. ही नरड्याच्या वरील भागापासून जठराच्या ऊर्ध्व छिद्रापर्यंत सुमारें दहा इंच लांबीची नळी असते. व त्याची रुंदी अर्ध्यापासून एक इंचपर्यंत असते. एवढ्या जागेंत ही नळी गळा, छाती व उदर या तिन्ही ठिकाणीं असते. नंतर ती मध्यपटल नामक छाती व उदर यांमधील मोठ्या स्नायूमध्यें प्रवेश करून तेथें संपते. इच्या पुढें व मागें अशा दोन व्हेगस् नामक श्वासहृदयनियामक अति महत्वाच्या व हृदयश्वासपचननियामक मज्जातंतू असतात. आंतील भाग श्लेष्मल असून त्यास उभ्या वळकट्या असतात. तेणेंकरून या अवयवाचें प्रसरण होऊं शकतें. या नळींतून अन्न जठरांत शिरतें, यापुढील मार्ग विस्तृत असून कांहींसा मोठ्या बटव्यासारखा असतो. व हें जठर उदराच्या पोंकळींतील ईशान्येकडील कोपर्यांत असतें व रिक्त स्थितींत चपट्या आकाराचें असतें. यास पुढील व मागील पृष्ठभाग असून त्यास उत्तर अगर लघु व दक्षिण अगर बृहत सीमा असतात. पोट अगर जठर साधारणपणें भरलें असतां बटव्याचा जाड भाग फुगीर होतो व डावेबाजूस फुगवटी दिसते. निमुळत्या दुसर्या टोंकाकडे दक्षिण छिद्र असून तें उजवे बाजूस असतें. या छिद्रांतून अन्न लघ्वंत्रांत प्रवेश करितें. अन्ननलिका जेथें जठरांत शिरते, त्या छिद्रास उत्तर अगर हृदयच्छिद्र म्हणतात. या जठराची उत्तरसीमा अर्ध चंद्राकार असते. दोन्ही छिद्रांमधील जठराचा जो बाहेरील परिघ त्यास दक्षिणसीमा म्हणतात. शरीराचें समोरून विच्छेदन झालेलें पाहिलें असतां जठराच्या पुढें यकृतपिंड, मध्यपटलस्नायु व जठरापुढील स्नायु असतात; जठराच्या मागें स्वादुपिंड, डावा मूत्रपिंड व त्यावरील उपमूत्रपिंड, प्लीहा, महास्रोत व त्यास जखडून ठेवणारें अंत्रावरण हीं इंद्रियें असतात. रिक्तस्थितीमध्यें जठर हें वळलेल्या नळी प्रमाणें लहान होतें व महास्रोताचा आडवा भाग जठराच्या रिकाम्या जागीं घुसून बसतो, जठराच्या दक्षिणछिद्राच्या अलीकडील जठराचा एक इंच भाग नळीसारखा असतो. हें छिद्र अर्धा इंच रुंदींचें असलें तरी बरेंच प्रसरणशील असतें. त्याच्या तोंडाशीं घट्ट संकोचन पावणारे वाटोळे स्नायू बसविलेले असतात. जठराच्या रिक्तावस्थेमध्यें त्याच्या श्लेष्मल अंतर्भागास पुष्कळ वळकट्या असतात. श्लेष्मलत्वचेमागें उभ्या वाटोळ्या व आडव्या अशा स्नायूंचें कवच असल्यामुळें जठरास आपल्या पोकळींतील अन्नावर दाब पाडून अन्नपचन होऊन अन्न आपोआप पुढें लोटलें जावें अशि योजना या स्नायूंची असते. या कवचामागें म्हणजे सर्व जठरावर पापुदर्यासारखें उदरांतील प्रत्येक इंद्रियास लपेटणारें व जखडणारें अंत्रावरण नामक आच्छादन असतें. यामुळें उदरांतील नानाप्रकारचीं इंद्रियें जागचेजागीं जखडलीं असतात. जठराच्या श्लेष्मलत्वचेंतील वळकठ्यांच्या आसपास जठररसोत्पादक सूक्ष्मपिंड व नलिका बहुत असतात. त्या सूक्ष्मदर्शक यंत्रानें दिसतात. ही त्वचा एरवी फिकट रंगाची असते. परंतु जिवंत प्राण्याच्या जठरांत अन्न आलें, अगर मुद्दाम घातलें किंवा त्या प्राण्यास नुसतें तोंडास पाणी सुटेल असें मिष्टान्न दाखिवलें अगर ही त्वचा बारीक पिसानें डवचून उत्तेजित केली तर ती गुलाबी अगर लाल होऊन अन्नपाचक जो जाठररस तो या असंख्य नलिकांतून घामाप्रमाणें स्रवूं लागतो व पुढें येणार्या अन्नाचें पचन करितो. आंत्रपद्धतीचें सविस्तर वर्णन,‘आंत्रपद्धति’ या लेखांत केलेंच आहे. (पृ.‘आ’ १०१).
पचनेंद्रियाच्या रोगवर्णनांत उदरांत होणार्या रोगांचें वर्णनहि आलें आहे (उदाहरणार्थ आंत्रपुच्छदाह हा लेख). हें उदर चिरून त्यांत शस्त्रक्रिया ज्या करतात, त्यांचें वर्णन त्या त्या इंद्रियांचें वर्णन देतांनां त्याच्या शेवटीं दिलें आहे. या लेखांत फक्त पोट चिरून शस्त्रक्रिया करतांनां कोणत्या तत्त्वांच्या अनुरोधानें शस्त्रवैद्यास वागावें लागतें त्याची माहिती दिली आहे. रोग्याची भयंकर अवस्था झाली असतांना नांमांकित शस्त्रवैद्यांसहि उदरांतील रोगोत्पत्तींचें निदान करणें म्हणजे समुद्रांतील वस्तु शोधून काढण्यासारखेंच कित्येक वेळां अवघड होऊन जातें आणि अशा वेळेस पोट चिरून आंत बोट अगर पंजा घालून वस्तुस्थिति डोळ्यांनीं पाहून अगर हातांनीं चांचपून जरूर ती शस्त्रक्रिया करणें हाच श्रेयस्कर मार्ग असतो. म्हणजे केवळ रोगांचें निदान करण्यासाठींच पोट अलीकडे चिरतात हा चमत्कार आहे व तें निदान ठरल्यावर बहुधां शक्य असेल तर त्याच वेळेस रोग कायम बरा होण्याची शस्त्रक्रियाहि उरकून घेतात हें नवल होय. यासंबंधीं एका प्रसिद्ध शस्त्रवैद्यानें विनोदानें असें म्हटलें आहे कीं, टेबलावरील चादर काढून त्याचें लांकूड डोळ्यांनीं पाहिल्याशिवाय कसल्या लांकडाचें टेबल आहे हें सांगणें अशक्य आहे. रोगाचें निदान करण्यासाठीं शस्त्रक्रिया करणें असेल तर ती रोगाच्या अगदीं आरंभींच करणें उत्तम. सर्व उपाय थकल्यावर व रोग्यांची कठिण अवस्था झाल्यावर शस्त्रक्रियेस तयार होणें म्हणजे व्यर्थ होय असेंच सर्व अनुभविक शस्त्रवैद्यांचें मत आहे. वेळेवरच एखादी पोटांतील झालेली गांठ, गळूं, गुंतागुंत, दृढबंधन इत्यादि शस्त्रसाध्य विकृतींचें शस्त्रानेंच यथायोग्य रीतीनेंच समूळ निराकरण केलें असतां जो उत्तम परिणाम घडून येईल तो पुष्कळ औषधे पिऊनहि कदापि होणार नाहीं. औषधें घेतल्यानें कालाचा अपव्यय होऊन वरीलपैकीं एखादी विकृति होती किंवा नाहीं याचा संशय देखील येणें कठिण व तो संशय मृत्यूनंतर प्रेताची तपासणी करूनच फिटावयाचा. या उदरसंबंधीं शस्त्रक्रियेंत यूरोपियन व अमेरिकन शस्त्रवैद्य विशेष प्रगमनशिल असण्याचें कारण तेथील सुशिक्षित व समंजस जनतेमध्यें या शस्त्रवैद्यांवर असलेला उत्तरोत्तर वाढता विश्वास हें होय. पूर्वीं तिकडे देखील भिषग्वर्य आपापल्या रोग्यास असा धाक घालीत कीं‘पहा शस्त्रवैद्यास रोग दाखवाल तर तो आपलें शस्त्रक्रियेचेंच तट्ट पुढें ढकलणार;’ परंतु कालांतरानें शस्त्रवैद्यांच्या नैपुण्यामुळें जनतेचा त्यांवरील विश्वास वृद्धिंगत होऊन त्यास येवढें खास कळून चुकलें कीं खरोखरीच आणीबाणीचा रोग असल्याखेरीज व तो निर्विघ्नपणें यशस्वी रीतिनें पार पाडण्याची धमक आंगीं असल्याखेरीज येवढे विद्वानलोक रोग्याचें जिवित कसें धोक्यांत घालतील? या विश्वासामुळें तेथें या कलेची फार झपाट्यानें प्रगति होऊन तिचें या देशांत अनुकरण व्हावें अशा योग्यतेला ती पोहोंचली आहे. शस्त्रवैद्य म्हणजे कोणी रुधिरप्रिय खाटिक नसून प्रसंगानुसार चाकूनेंहि रोगनिर्मूलन करणारा तो वैद्यश्रेष्ठच आहे व त्याच्या मतास व शब्दास फार मान देणें उचित आहे हें लोकांस पटूं लागलें. पूर्वीं तिकडे अशी वहिवाट होती कीं एकाएकीं उदरांतींल रोगानें झालेले व्याधिग्रस्त रोगी रुग्णांलयांत (इस्तिपळांत) भिषग्वर्याच्या हवालीं करून औषधें, पथ्य इत्यादिकांनीं रोग हटत नाहीं असें पाहून मग शेवटीं त्यास शस्त्रवैद्याच्या हवाली करावयाचें. पण हल्लीं हा प्रकार साफ पालटला आहे. व शस्त्रानें साध्य होणार्या उदरांतील रोग्यांची संख्या व शक्यता यांची प्रगति उत्तम प्रकारें होत आहे. या उदरांत ज्या शस्त्रक्रिया करितात त्यांतील बरीच मोठी संख्या अपघातानें अगर शस्त्रानें फाटलेल्या, अगर नासलेल्या अगर रोगानें पुवाळलेल्या आंतड्यावर होणारी असते व त्या क्रिया यशस्वी होण्याचें साधन म्हणजे मर्फी नांवाच्या अमेरिकन डाक्टरनें शोधून तयार केलेला गंड (बटन-कुडूप) हें होय. याचा उपयोग नासलेलें आंतडें कापून काढल्यावर चांगल्या आंतड्याचीं दोन्हीं टोंकें साधण्याच्या कामीं होतो. हा गंड म्हणजे वर निकल धातूचा मुलामा असलेली दुहेरी डबी एवढी नळी असते व तिचें एकेक टोंक त्या आंतड्यांत झटकन घुसवून देतात. कांहीं दिवसांनीं त्या दोन्ही ताज्या कापलेल्या आंतड्यांचा संयोग झाल्यावर हा गंड (बटन) आंतड्यांत पोकळ भागांत सुटून येतो व मळाबरोबर बाहेर पडून जातो. आणखी याचा उपयोग जठर आणि आमाशय (लहान आंतडे) या दोहोंमध्यें कायमचा अन्नरस जाण्याचा मार्ग बनविण्याच्या कामीं होतो. कांहीं असाध्य रोगाची रोगग्रंथि वाढून जठराचें एक तोंड (आमाशयाशीं संबंध असणारें) बंद होतें तेव्हां अशा तर्हेनें कृत्रिम मार्ग बनविण्यांत येतो. वरच्याप्रमाणें अडथळा आला असतां आमाशय व थोरलें आंतडें अगर आमाशयाच्याच दोन भागांमध्यें कृत्रिम मार्ग करितां येतो. याच साधनामुळें मोठी पित्तवाहिनी आणि आमाशय यांचा संबंध मधील रोगग्रस्त भाग कापून टाकल्यावर जोडतां येतो. हें अमोलिक साधन म्हणजे कल्पकतेची कमाल होय व त्याच्या अभावी वरील सर्व व्याधिग्रस्त रोगी मृत्यु पावले असते. या गंडाची मौज ही आहे कीं वरीलप्रमाणें संबंध जोडण्यास उशीर बिलकूल लागत नाहीं आणि ही शस्त्रक्रिया झटपट आटोपणें ही तर महत्त्वाची बाब आहे. कांहीं शस्त्रवैद्य या गंडाचीं टोंके रुतूं अगर खुपूं नयेत म्हणून हा गंड स्निग्ध हाडांच्या नळीचा करून ती नळी हे सांधे जोडण्यास उपयोगांत आणितात. जेव्हां शस्त्रक्रियेस अवधि लागला असतां चालण्यासारखें असतें तेव्हां आंतड्याचीं दोन्हीं टोकें सुई व शस्त्रक्रियेचा दोरा यांनीं शिवणें हा उत्तम मार्ग होय व त्याचाहि अवलंब पुष्कळ वेळां केला जातो. या सर्व व्याधींत असें होतें कीं आंतड्यांत रोगवृद्धीनें जो अडथळा झालेला असतो त्याच्या वरील भागांत पातळ दुर्गंधिमय व कुजणार्या मळाचें विष रक्तप्रवाह दूषित करितें व त्या विषबाधेनें मरण येतें. म्हणून शस्त्रवैद्य अलीकडे असें करितात कीं अडथळ्यावरील जें आंतडें फुगून ताठ झालेलें असतें त्याचे वेढे अंमळ बाहेर ओढून त्यास शस्त्रानें चीर पाडितात म्हणजे त्यांतील विषारी वायुमय व प्रवाही मळ बाहेर येतो. मग हें आतडें टांकें मारून पुन: पहिल्या जागीं नीट बसवितात. तेणेंकरून विषबाधा होत नाहीं. हा शोध लॅसनटेट यानें लाविला. शस्त्रक्रियेनंतर तशीं चिन्हें दिसूं लागतांच थोडथोडें व वरचेवर एप्समसॉल्ट हें रेचक मीठ द्यावें ही युक्ति त्यानेंच काढिली. म्हणजे त्या योगानें विषारी मळ व वायु धुवून निघतो व लठ्ठ फुगलेल्या नळाच्या योगानें श्वसन व हृदय क्रिया यांच्या सुरळीत व्यापारास अडचण येत नाहीं. याशिवाय खालील उपचार केले असतांना या शस्त्रक्रियेनंतर मृत्यु येण्याचा संभव फार कमी असतो असा अनुभव येऊं लागला आहे. शस्त्रक्रियेनंतर रोग्यास बसवून शुद्ध मीठ सूक्ष्म प्रमाणांत विरघळविलेल्या शुद्ध कढत पाण्याचा बस्ति सावकाश देणें अगर रोगी फारच अशक्त असेल तर कांखांतून तें पाणी पिचकारीनें टोंचून घालणें. याचा परिणाम असा होतो कीं हें पाणी रक्तांत तेव्हांच मिसळून त्याचा संचय वाढवितें व त्यांत सांचलेलीं विषें धुवून जातात आणि अशास्थितींत जी भयंकर तृषा लागून कोरड पडते ती थांबते. याखेरीज पुढील प्रसंगीं ही शस्त्रक्रिया करितात त्याचें वर्णन विशेष संक्षेपानें दिलें आहे. उदरांत शिरणार्या बंदुकीच्या गोळ्या; या अपघातांत आंतडीं अनेक ठिकाणीं फाटून गोळी पलीकडे जाते, अगर ती बारीक असल्यास हीं छिद्रें पुन: बुजून आंतील विषारी घाण बाहेरून येऊन घातुक आंत्रावरणदाह उत्पन्न करीत नाहींत. या जखमा रणांगणावर झाल्या असतां अनुभव असा आहे कीं जर मॉसर गोळ्यासारख्या बारीक गोळ्या उभयदळें वापरीत असतील तर यांच्या वाटेस विशेष न जावें हेंच बरें व असें केलें तरी सुद्धा शेंकडां ६० शिपाई उठतात. सर्व जंतुरहित शस्त्रोपकरणसिद्धता यथाशास्त्र करून ही असली अवधि लागणारी शस्त्रक्रिया एखाद दुसर्या शिपायाकरितां करणें लढाईच्या जागीं शक्य नसतें. कारण शेंकडो हातपाय तुटलेले शिपाई शस्त्रवैद्याच्या मदतीसाठीं खोळंबलेले असतात व शस्त्रक्रिया जरी केली तरी बरेच रोगी दगावतात असा अनुभव आहे. रोग्याचा एकदम गळाठा होऊं लागल्यास छिद्रें मोठीं असून रुधिर स्त्राव उदरांत सुरू आहे असें समजावें. त्यावेळीं काल, उपकरणें व सहाय्य यांच्या मानानें शस्त्रक्रिया करितात व गोळ्या शोधून काढितात व रत्तस्त्राव थांबवून भोंकें मिटवितात. खंजीर, तलवार, इत्यादिकांनीं उदरांत खूपसून झालेल्या खोल जखमा यांचें पर्यवसान अतिभयंकर असतें. याचें कारण त्या शस्त्राबरोबर होणारा आंत्रावरण दाहोत्पत्तिकारक जंतुप्रवेश हें आहेच, शिवाय आंतडीं ही शस्त्रानें फाटून रक्तस्त्राव होणें हें दुसरें कारण. या जखमांमध्यें इतर जखमा तपासण्याचे वेळीं जशी सळई घालून त्यांची खोली, रुंदी, दिशा वगैरे तपासतात तसें अगदीं करतां कामा नये. उत्कृष्ट यथाविधि सिद्धता करून या जखमा कुशल शस्त्रवैद्यास आंतडीं शिवून अगर तुटलेली शीर अगर धमनी बांधून सांडलेलें रक्त टिपून काढून रोग्याचे प्राण वांचविता येतात. बंडीची बाही आंत दुमडून बाहीची पोकळी बंद होऊन जसा आंत हात घालतां येत नाहीं तशी स्थिती लहान मुलांचे कांहीं रोगांत नळाची होऊन शौचमार्ग बंद होतो व कांहीं वेळ लोटला असतां मूल आसन्नमरण होतें. पूर्वीं शस्त्रवैद्य पाण्याचा मोठा बस्ति देऊन ही गुंतागुंत सोडविण्याचा प्रयत्न करीत पण तो बहुधा यशस्वी होत नसे. उलट पाण्याच्या अतिरेकानें आंतडें फुटून मूल मात्र दगावतें. हल्लींचें शस्त्रवैद्य दुसरें तिसरें कंहीं न करतां उदर चिरून तें विवक्षित आंतडें चांचपून फक्त त्याची आंत दुमडलेली व त्यामुळें शौचमार्ग बंद करणारी घडी मोकळी करितात. फारच थोड्या प्रसंगीं रोगोद्भव बराच झाला असल्यामुळें त्यास ही घडी मोकळी करितां येत नाहीं. पण हीं उदाहरणें अपवादात्मक होत. क्यान्सर ग्रंथि हा एक दुःसाध्य रोग आहे, पण तो शस्त्रानें कापून काढिला असतां रोग्याचें जीवित लांबवितां येतें. अगर नळाचा रोग बराहि होतो. हा रोग झालेला नळाचा भाग काढून टाकितात व दोन्ही टोंकें शिवून शौचमार्ग तयार होतो, व हा रोग मोठ्या आंतड्यास असेल तर रोगी साफ बराहि होतो. याच्या आधोभागीं रोग वाढला असतां मलोत्सर्ग न होण्यासाठीं कंबरेंत डावे नळावर छिद्र पाडून त्यांतून तो होण्याची तजवीज करीत. पण आता हें छिद्र डाव्याजांगाडांत तयार करितात व त्याचे तोंडाशीं आंतड्याचा भाग ओढून आणून शिवतात, व तेथें तें आंतडें मांसलत्वचेशीं संयुक्त होतें. थोडे दिवसांनीं त्या आंतड्यास आडवें छिद्र पाडतात व नंतर गुदद्वाराचे ऐवजीं येथूनच मलोत्सर्जन होतें यास कृत्रिम गुदद्वार असें म्हणतात. दुसरी शस्त्रक्रिया करीपर्यंत रोगी नळ फुगून अत्यवस्थ होईल असें वाटल्यास त्यांत एक कांचेची विशिष्ट नळी अडकवतात व त्यास रबर लावतात त्या मार्गानें घाण निघून जावी अशी चातुर्यानें योजना केलेली असते व यामुळें ही विषारी घाण आंत्रावरण दूषित करीत नाहीं व जखमेचा बाहेरील भागहि दूषित करीत नाहीं व शस्त्रक्रिया यशस्वी होते.