विभाग नववा : ई-अंशुमान
उदासी - शीखांच्या धार्मिक पंथामध्यें‘उदासी’ हा एक प्रमुख पंथ आहे. ह्या पंथास “नानकपुत्र” असेंहि म्हणत असून हा बराच जुना पंथ असावा. ह्या पंथाची स्थापना गुरु नानकाचा वडील मुलगा श्रीचंद यानें केली असें समजतात. शीखांचा तिसरा गुरु अमरदास यानें लढवय्या जातीच्या शीखांपासून उदासी पंथाच्या लोकांस वेगळें केलें. कांहींचे म्हणणें असें कीं हें पंथविभागणीचें काम शीखांचा पांचवा किंवा सहावा गुरु अर्जुन यानें केलें. कसेंहि असलें तरी ह्या विभागणीवरून शीखांनीं मोंगलसत्तेविरुद्ध टिकाव धरून राहाण्याकरितां समाजघटनेच्या केलेल्या प्रयत्नांची कल्पना येते. ह्या विभागणीमुळें उदासी पंथाचें स्वरूप हिंदु धर्मासारखेंच राहिलें. परंतु यामुळें उदासी पंथास आपल्या अनुयायांची संख्या वाढविण्यास किंवा मूळ शीखधर्मगुरूंच्या शिष्यवृंदांपैकीं कांहीं लोकांस आपल्या पंथांत सामील करून घेण्यास बिलकुल अडचण पडली नाहीं. उदाहरणार्थ:- सहावा शीखांचा धर्मगुरु हरगोविंद यानें श्रीचंद यास आपला थोरला मुलगा गुरुदत्त यास आपला पट्टशिष्य करून घेण्याची मोकळीक दिली असें म्हणतात.
उदासी पंथाचे प्रथम चार भेद (धुआन = अग्नि) पडले. व त्यांचे संस्थापक अनुक्रमें बाबा हसन, फूल गोंदा व अल्मस्त हे असून त्यांपैकीं पहिलें नांव मुसुलमानी असून शेवटचें शुद्ध अरबी आहे व हे चौघे पुरुष गुरुदत्त याचे शिष्य होत. अल्मस्त साहिब याचें मंदिर नैनिताल व जगन्नाथ येथें दाखविण्यांत येत असतें, परंतु हीं स्थानें एकंदर शीखांचें मुख्य ठिकाण पंजाब याजपासून पुष्कळ दूर आहेत. गोंदासाहेबाची पूजा सिंधमधील शिकारपूर या ठिकाणीं व पंजाबमध्यें अमृतसर येथील एका मंदिरांत करण्यांत येत असते. व बाकीच्या दोघांचीं मंदिरें पंजाब मधील डोंगरपठावर मात्र आहेत. ह्यावरून शीखसंप्रदायाचा विस्तार व्हावा या हेतूनें शीखांच्या धर्मगुरूंकडून कसे प्रयत्न करण्यांत आले याचें प्रत्यंतर मिळतें. ह्या पंथांतील सर्व अनुयायांची मिळून “बडा आखाडा” अशी एक सभा असून मागाहून सातव्या “हरराय” नांवाच्या शीख गुरूच्या “फेरू” नांवाच्या शिष्यानें “छोटा आखाडा” ही संस्था स्थापन केली. सर्व उदासी अविवाहित असतात. व जे ब्रह्मचर्य कडक रीतीनें पाळतात त्यांनां‘नंगे’ म्हणतात. सर एडवर्ड मॅक्लेगन यानें त्याजविषयी म्हटलें (सेन्सस ऑफ इंडिया. १८९१ भाग १९) आहे कीं जरी ते नेहमीं तांबडी वस्त्रें वापरतात तरी त्यांपैकीं बरेच लोक केवळ कटिवस्त्राशिवाय सर्व शरीर उघडें ठेवून अंगास राख फांसून फिरतात. ह्यांनांच‘नंगे’ ही संज्ञा लावण्यांत येते.
“भगत भगवान्” या नांवाचा एक पोटपंथ असून तो या चारांपैकींच एक आहे असें म्हणतात. परंपरेवरून ह्या पंथाचा हिंदु धर्माशीं कांहीं तरी संबंध असलेला दिसतो, कारण ह्याविषयीं अशी अख्यायिका सांगतात कीं एक ‘भगदगीर’ नामक संन्यासी बलुचिस्तानांतील हिंगलाज क्षेत्रास यात्रेकरितां जात असतां वाटेंत शीख धर्माचा संस्थापक गुरु नानक ह्याचा ‘डेरा’ पहाण्याकरितां गेला. तेथें नानकाचा नातू धर्मचंद यानें भगदगीर यांच्या भिक्षापात्रांत अन्न ओतलें परंतु ते भरेना. परंतु जेव्हां त्यानें श्रीगुरूचें नांव घेऊन थोडी प्रसादाची चिमूट पात्रांत टाकली त्यावेळीं तें भिक्षापात्र पूर्ण भरलें. हा चमत्कार पाहून भगदगीर यानें शीखसंप्रदायाची दीक्षा घेतली, व सर्व अनुयायांसह धर्मचंदाचा शिष्य होऊन तो स्वत:स‘भगत भगवान’ म्हणवूं लागला. हे लोक जटा धारण करतात व अंगाला राख लावतात, परंतु नानकानें घालून दिलेल्या आचरणाचे नियम पळतात.
उदासी पंथामध्यें‘संगत साहीब’ हा जो पंथ आहे तो मात्र ह्या चार पोटपंथाबाहेरचा आहे. शिखांचा सातवा गुरु हरराय याचा‘फेरू’ नांवाचा आचारी होता; त्याला हररायानें उपदेश देऊन शीखांवरील धार्मिक कर वसूल करण्याचें काम सांगितलें होतें. परंतु अशा प्रकारच्या जुलुमांनीं शीख लोक संत्रस्त झाल्यामुळें पुढें गुरु गोविंदसिंग यानें ही वसुलीची चाल बंद केली. परंतु त्यावेळीं फेरू यानें कसल्याहि प्रकारचा अडथळा न केल्यामुळें गोविंदसिंगानें त्याजवर संतुष्ट होऊन‘संगत साहीब’ ही त्यास पदवी दिली व आपला संप्रदाय प्रसृत करण्यास अनुज्ञा दिली. ह्या पंथाची दक्षिण व पश्चिम पंजाबमध्यें बरीच प्रसिद्धि आहे, परंतु आख्यायिकांवरून हा पंथ शीख गुरूंच्या वर्चस्वाखालीं पूर्णपणें असतो असें दिसत नाहीं.
दुसर्या एका आख्यायिकेप्रमाणें ह्या पंथाच्या संस्थापनेचा मान गुरु गोविंदसिंगानें धर्मांतर करविलेला सुप्रसिद्ध सुलतान सखसिखर याजकडे देण्यांत येतो. ह्या पंथाचा अमृतसर येथें ब्रह्यभूत आखाडा व लाहोर येथें एक संस्था आहे, त्यावरून हा पंथ नानकाच्या जुन्या शीख संप्रदायाशीं निगडित झाला असावा. ह्या पंथामध्यें गुरु नानकाच्या आदिग्रंथास फार मान आहे. शेवटीं राहिलेल्या‘रामदास उदासी’ पंथाबद्दल माहिती सांगितली पाहिजे. नानक याच्या एका शिष्याचा नातू गुरुदत्त यानें ह्या पंथाची स्थापना केली. ह्या पंथाचें रामदास या ठिकाणीं एक मंदिर आहे. उदासी संप्रदायाच्या प्रत्येक पोटपंथाची वर्गण्या जमवून एकंदर व्यवस्था करण्याकरितां एक सुयंत्रित संघटना आहे. ह्या प्रत्येक पोट पंथाचा एक मुख्य “श्री महंत” असून त्याच्या हाताखालीं दुसरे महंत असतात.
उदासी पंथामध्यें सर्व हिंदु जातींमधून लोक घेतले जातात, इतकेंच नव्हेतर कोणाहि हिंदूच्या हातचें अन्न घेतात. हे लोक काशी, अमृतसर इत्यादि ठिकाणीं प्रवास करीत असतात परंतु त्यांचीं मुख्य ठिकाणें पंजाबचा मध्यभाग रोहटक जिल्हा इत्यादि होत. ह्या लोकांचे आचार विचार सारखे नाहींत. ह्यांपैकीं कांहीं जटा राखतात, कांहीं सर्व केस काढतात, कांहीं लोक तिलक लावतात तर कांहीं लावीत नाहींत. मृतांचें दहन करण्यांत येतें व कधीं कधीं दफनहि करण्यांत येतें. ज्या ठिकाणीं एखाद्या महंताचा दहनविधि होतो त्याठिकाणीं एक समाधि बांधण्याची चाल आहे. ह्यापैकीं बहुतेक तापसीवृत्तीचेच असतात, परंतु कांहीं थोडे उघडपणें किरकोळ धंदे करतात.
अशा रितीनें उदासी पंथामध्यें, व हिंदु धार्मिक पंथामध्यें आढळून येणारे सर्व विशेष म्हणजे उच्च ध्येय, परंतु व्यवहारांत त्याचा पदोपदीं त्याग, जुन्या संप्रदायाशीं तेढ न येईल अशा रितीनें केलेला नवीन मताचा पुरस्कार व तपस्वीवृत्तीच्या ब्रम्हचारी पंथाचें आनुवंशिक जातीमध्यें अपरिहार्य पर्यवसान इत्यादि गोष्टी पूर्णपणें आढळून येतात.