विभाग नववा : ई-अंशुमान
उंदीर - रोडंट नांवाच्या कुरतडणार्या सस्तन प्राण्यांची ग्लायर नांवाची एक पोटजात आहे त्या जातीमध्यें उंदरांचा अंतर्भाव होतो. या उंदरांचे तीन भेद पाश्चात्त्य प्राणिशास्त्रकोविदांनीं केले आहेत. (१) मुस मुस्कूलस-घरगुती उंदीर, (२) मुस सिल्व्हॅटिकस-रानटी उंदीर, (३) मुस मिन्यूटस-पिकांच्या वेळीं येणारे उंदीर.
(१) मुस मुस्कूलस– हा घरगुती उंदीर जगाच्या पाठीवरील सर्व देशांत आढळतो. याच्या पाठीचा भाग काळसर निळसर असून खालचा भाग फिकट पिंवळा असतो. याच्या डोक्याच्या लांबीच्या निम्यानें याचे कान असतात, पण ते रुंदट असतात. शेंपूट अंगापेक्षां आंखुड असतें. याचें डोकें पुढें आलेलें, दांत अणकुचीदार, व डोळे तीक्ष्ण असतात. या उंदरांची मूळ वसति मध्यआशियामध्यें असून नंतर हे सर्व जगभर पसरले असें बॅरेट, हॅमिल्टन वगैरे तज्ज्ञांनीं ठरविलें आहे. कारण मध्यआशियांत या घरगुती उंदरांशीं शारीरदृष्ट्या साम्य असलेल्या मुस बॅक्टियानस व मुस बॅग्नेरी या दोन जाती आहेत व त्यांच्यामध्यें व या घरगुती उंदरामध्यें गुणांत पुष्कळच सारखेपणा दृष्टीस पडतो. हे घरगुती उंदीर मनुष्य वस्तीपासून दूर रहात नाहींत; कारण त्यांचें जीवित माणसांवरच अवलंबून असतें. त्रास न देणार्या इसमाजवळ हे मोठ्या धिटाईनें जातात. यांच्यामध्यें उत्पत्तीचें प्रमाण मोठें असल्यानें व चोरटेपणाची या जातीला हौस असल्यामुळें हें उंदीर घरादाराची नासधूस करतात. पीठ, भाकर, दुभतें लोणी वगैरे सांपडेल त्या जिनसावर ताव मारण्यास ते कमी करीत नाहींत. घरगुती उंदरांचा क्षत्रु म्हणजे मांजर; पण मांजराला देखील घरांतून सर्व उंदरांचें उच्चाटण करतां येत नाहीं.
(२) मुस सिल्व्हॅटिकस – रानटी उंदीर. हा उंदीरहि सर्व देशांत अढळून येतो. घरगुती उंदरापेक्षां याचें शेंपूट लांब असतें. याचा वरचा भाग तांबूस पिंगट रंगाचा व खालचा भाग फिकट रंगाचा असतो. याच्या छातीवर, पिंगट रंगाचा एक ठिपका अढळून येतो. हा उंदीर रानांत, अगर डोंगराच्या आश्रयानें बिळें करून राहतो. थंड प्रदेशांत हिवाळ्यांत बाहेर पडतां येत नाहीं यासाठीं तो हिंवाळ्यापुरता बिळांत धान्याचा सांठा करून ठेवतो. या उंदराचा शेतकर्यांनां फार त्रास होतो.
(३) मुस मिन्यूटस – हंगामी उंदीर. हा आकारानें वरील दोहोंपेक्षां लहान पण दिसण्याला फार सुंदर असतो. याच्यां शरीराची लांबी फार झालें तर तीन इंच असते. त्याचा रंग फिकट-तांबूस असा असतो; व त्याच्या शरीराच्या ठेवणीप्रमाणें त्याचे कान, डोळे, शेंपूट हीं लहान असतात. या उंदराची जात नेहमीं गव्हाच्या अगर इतर धान्याच्या शेतांत आपलीं बिळें करून रहाते. या उंदराच्या पुष्कळ पोटजाती आहेत. या हंगामी उंदरांचा प्रचार इंग्लंडपासून जपानपर्यंतच्या मुलखांत आढळून येतो.
हिंदुस्थानांतहि उंदरांचा भरणा मोठा असून, त्यांच्या निरनिराळ्या जाती प्राचीन ग्रंथकारांनीं सांगितल्या आहेत. या जातींपैकीं, लालन, पुत्रक, कृष्ण, हंसिर, चुछुंदर, अलस, कषायदंत, कलिंग, अजिंत, कपिल, कोकिल इत्यादि प्रमुख जाती आहेत.
उंदरांचें विष फार बाधक आहे. निरनिराळ्या जातींच्या उंदरांच्या विषाचे परिणाम निरनिराळ्या तर्हेनें मनुष्याच्या प्रकृतीला अपायकारक होतात. उंदराचें विष, त्याच्या शुक्रामध्यें मुख्यत्वेंकरून असतें. आणि त्याच्या मूत्रांत, विष्टेंत, नखांत व दांतांतहि असतें. उंदराचें शुक्र मनुष्याच्या शरीराच्या कोणत्याहि भागाला लागलें असतां, किंवा शुक्र लागलेला उंदराच्या शरीराचा अवयव मनुष्याच्या कोणत्याहि अवयवाला लागला असतां, तेथील रक्त दूषित होऊन तें सर्व शरीरांत भिनतें व त्यामुळें गांठी, फोड, भयंकर त्वचेचे रोग उत्पन्न होतात. तसेंच पीडा, ज्वर, प्रबळ मूर्च्छा, वांती, रोमांच वगैरेहि लक्षणें होतात.
उंदराच्या अंगीं उपजतच धूर्तपणा असतो असें एका ग्रंथकारानें म्हटलें आहे. नार्वे देशांतील उंदरांची मनोरंजक हकीकत एका मासिक पत्रांत छापली होती, त्याचा सारांश असा:-नार्वे व स्वीडनमध्यें कोलेन डोंगराच्या खोर्यांत उंदीर पुष्कळ सांपडतात. त्यांची वाढ जलद असल्यानें, दहाबारा वर्षांत त्यांस अन्नाचा तोटा पडतो. त्यामुळें पुष्कळांना अर्धपोटीं रहाण्याचा प्रसंग येऊं नये म्हणून कांहीं उंदीर आपले प्राण इतर उंदराच्या कल्याणाकरतां अर्पण करण्यास तयार होतात. ही गोष्ट खरी असेल तर तें एक आश्चर्यच होय असें म्हणण्यास हरकत नाहीं.
उंदरांच्यामुळें प्लेगाची सांथ पसरते. प्लेग सुरू झाल्याचीं चिन्हें दिसूं लागतांच उंदीर धरून मारण्याची वहिवाट आहे. पण जपानी लोकांनीं मात्र या उंदरांना धरून, त्यांच्यापासून थंडीच्या निवारणार्थ उंदरांच्या कातड्याच्या कानटोप्या बनविण्याची नवीन पद्धत शोधून काढली आहे.
[ संदर्भ ग्रंथ - बीटन – डिक्शनरी ऑफ नॅचरल हिस्टरी; बॅरेट हॅमिल्टन -नोट ऑन दि हार्वेस्ट माइस ऑफ दि पॅली ऑर्टिक रीजन (अॅनल्स अॅण्ड मेगेझाईन ऑफ नॅचरल हिस्टरी, एप्रिल १८९९ ).]