विभाग नववा : ई-अंशुमान
उदेपूर संस्थान. – (लहान) मध्यप्रांत २२० ३’ ते २२० ४७’ उत्तर अक्षांश आणि ८३० २’ ते ८३० ४८’ पूर्व रेखांश यांमध्यें आहे. क्षेत्रफळ १०५२ चौरस मैल. पूर्वीं हें संस्थान बंगालच्या छोटा नागपूरच्या संस्थानांत मोडत होतें. परंतु सन १९०५ सालापासून तें मध्यप्रांतांत घातलें आहे. याच्या उत्तरेस सुरगुजा संस्थान, आणि पूर्वेस जशपूर आणि रायगड संस्थानें; दक्षिणेस रायगड संस्थान आणि पश्चिमेस बिलासपूर जिल्हा. संस्थानचा उत्तरेकडील जवळ जवळ अर्धा प्रदेश डोंगराळ असून दक्षिणेकडील सपाट आहे. संस्थानांतील खनिज संपत्तीविषयीं विशेष तपास अजून झाला नाहीं; तथापि सोनें, लोखंड, अभ्रक, दगडी कोळसा वगैरे धातू येथें सांपडतात.
इ ति हा स.–रक्षेल रजपूत घराण्यानें सुरगुजा संस्थान काबीज केल्यापासून उदेपूर संस्थान हें सुरगुजा संस्थानची धाकटी पाती आहे. सन १८१८ सालीं मुधोजी भोसलें (अप्पासाहेब) याजबरोबर झालेल्या तहांत हें संस्थान इतर संस्थानांबरोबर ब्रिटीश अमलाखालीं आलें. यावेळीं संस्थानिक कल्याणसिंग असून त्यानें खंडणी सुरगुजा संस्थानामार्फत दिली होती. इ. स. १८५२ सालीं संस्थानिक व त्याचे दोन बंधू यांजवर खुनाचा आरोप येऊन त्यांस कैदेची शिक्षा झाली; व संस्थान खालसा करण्यांत आलें. सन १८५७ च्या बंडांत कांहीं खटपट करून संस्थानिक व त्याचे भाऊ यांनीं उदेपूर संस्थानांत शिरून कांहीं वेळ तेथें राज्यहि केलें. पुढें सन १८५९ सालीं बंडाचा शेवट झाल्यावर त्यांस काळ्या पाण्याची शिक्षा देऊन अंदमान बेटांत त्यांची रवानगी करण्यांत आली व सन १८६० सालीं सुरगुजा संस्थानिकाचा भाऊ बिंदेश्वरी प्रसादसिंग देव याच्या स्वाधीन तें संस्थान केलें. यानें ब्रिटीश सरकारास बंडांत उत्तमप्रकारें मदत केली होती. त्याचप्रमाणें सन १८७१ सालीं केओंझर संस्थानांत झालेलें बंड यानें मोडलें. यास राजाबहादुर हा किताब मिळाला होता. सन १८७६ त हा मरण पावल्यावर त्याचा मुलगा धर्मजितसिंग देव गादीवर बसला. यानें राजकोट हें आपलें राहण्याचें ठिकाण करून त्यास धर्मजयगड असें नांव दिलें. हा सन १९०० सालीं मरण पावला व त्याच्या मागून त्याचा अज्ञान मुलगा चंद्रशेखरप्रसाद सिंगदेव यास गादी मिळाली. हा अज्ञान असल्यामुळें संस्थानची सर्व व्यवस्था ब्रिटीश सरकारच पहात होतें. हल्लीं हा स्वतःच करभार पहातो. यास हिज हायनेस हा किताब आहे. येथील लोकसंख्या १९११ मध्ये ६४८५३ होती. एकंदर खेडीं १९६ आहेत. येथें मुख्य पीक भाताचें असून उडीद, मूग, अवहर व इतर कडधान्याचीं पिकें होतात.
उ द्यो ग धं दे. - येथील लोक स्वतःस लागणारे जिन्नस उत्पन्न करतात. उदाहरणार्थ ओबडधोबड कापड, स्त्रियांचे दागिने, विटा, कौलें, मोटा वगैरे.
व्या पा र.–बंगालनागपूर रेल्वे सुरू होण्यापूर्वी गया जिल्हा, मिर्झापूर, कलकत्ता वगैरे ठिकाणांहून बैलावरून व्यापार होत असे. हल्लीं धर्मजयगडहून ३९ मैलांवर रायगड नांवाचें स्टेशन आहे तेथूनच संस्थानचा सर्व व्यापार चालतो.
संस्थानिकास ब्रिटीश सरकारला ८०० रुपये खंडणी द्यावी लागते व ती वीस वर्षेंपर्यंत वाढवावयाची नाहीं असा करार १८९९ व १९०५ मधील सनदांत आहे. संस्थानावर देखरेख कमीशनरची असून तो कर वगैरे बसविण्याच्या बाबतींत सल्ला देतो. चीफ कमिशनरच्या परवानगीवांचून आयात निर्गतीवर कर बसवितां येत नाहीं. येथें नऊ शाळा आहेत.