विभाग नववा : ई-अंशुमान
उदेय्यार पालेयम्, ता लु का–मद्रास. त्रिचनापल्ली जिल्ह्यामधील ईशान्येकडील तालुका. क्षेत्रफळ ७५३ चौ. मै. असून १९११ मध्यें लोकसंख्या ३१८४४४ होती. यांतील खेड्यांची संख्या २२७ असून उदेय्यारपालेयम् व अरय्यलूर हीं दोन मोठीं गांवें आहेत. येथील जमीन लाल आणि काळी या मिश्रणाची आहे. अरय्यलूर जमीनदारीचा बहुतेक भाग काळाभोर असून कापसाच्या पिकाला चांगली आहे. दरसाल पावसाचें मान ३९ इंचांपर्यंत असतें. काळीचें उत्पन्न ४०१००० आहे.
श ह र.-मद्रास. त्रिचनापल्ली जिल्ह्यांतील उदेय्यारपालेयम् तालुक्यामधील एक शहर. १९११ सालीं लो. सं. ६७५९ होती. येथील जमीनदाराचें राहण्याचें ठिकाण याच गांवीं असतें. कर्नाटकमधील युद्धाच्या वेळीं अठराव्या शतकांत पुष्कळ संस्थानिकांनां अनेक स्थित्यंतरांतून जावें लागलें, त्यांपैकींच उदेय्यारपालेयमांची स्थिति झाली होती. १८०१ सालीं त्रिचनापल्ली ईस्ट-इंडिया-कंपनीला दिली, तेव्हां जमीनदाराला फक्त हजार रुपये दर महिन्यास वेतन मिळत असून जमीनदारी नबाबाच्या स्वाधीन होती. इंग्रज सरकारनें १८१७ त कांहीं भाग जमीनदाराकडे दिला.