विभाग नववा : ई-अंशुमान
उद्दंड - उद्दंड रंगनाथ किंवा उद्दंडिन. तुंडीर मंडलांतील लाटपूरचा हा रहिवाशी असून याचें कुलनाम इसगपनाथ असें होतें. गोकुलनाथाचा पौत्र व कृष्णाचा पुत्र अशी याची वंशावली सांगतात.
हा कुक्कुटक्रोड (कालिकत) येथील मानविक्रम नांवाच्या झामोरिनच्या दरबारीं राजपंडित होता. हा १७ व्या शतकांत झाला. यानें झामोरिनच्या हुकुमावरून‘मल्लिका मारुत’ नांवाचें दशांकी नाटक लिहिलें. यांत विद्याधर राजाची मुलगी मल्लिका मारुत नांवाच्या कुंतल राजपुत्रास दिली असल्याचें दाखविलें आहे. लग्नापूर्वी एका रानटी हत्तीशीं साहस व मल्लिकेचें राक्षसाकडून हरण दाखविलें आहे. उद्दंड व दंडी हे एकच असावेत असाहि एक चुकीचा समज आहे. [स्टीन कनो. आफ्रेक्टं].