विभाग नववा : ई-अंशुमान
उ द्ध व – वसुदेवाच्या देवभाग नांवाच्या भावाचा मुलगा. हा यादव मोठा कृष्णभक्त होता. हा महान योद्धा असून प्रत्यक्ष बृहस्पतीचा शिष्य व श्रीकृष्णाचा जिवलग स्नेही होता. श्रीकृष्ण याला आपलें हितगुज सांगत असे. तो मथुरेस आल्यावर कांहीं दिवसांनीं त्यानें उद्धवास गोकुळवासीयांचें विरहदुःख शमन करण्याकरितां त्यांच्याकडे पाठविलें होतें. “उद्धवा शांतवन कर जा| त्या गोकुलवासि जनांचें||” हे मध्वमुनीचें यासंबंधीं पद विशेष हृदयंगम वाटतें. धर्मानें केलेल्या राजसूय यज्ञास जाण्याविषयीं नारदानें श्रीकृष्णास आग्रह केला असतां, कृष्णानें उद्धवाचा अभिप्राय मागितला, व उद्धवानें अनुमोदन दिल्यावरच तो इंद्रप्रस्थास गेला. यावरून श्रीकृष्ण उद्धवास किती चाहत असे हें दिसून येतें. श्रीकृष्णनिर्याणाच्या प्रसंगीं भगवंतानें उद्धवाला बराच उपदेश केला, व भागवताच्या एकादशस्कंधांत विवेचिलेलें सर्व ज्ञान उद्धवामुळेंच जगाला लाभलें असें म्हणण्यास हरकत नाहीं. श्रीकृष्णाचा विरह झाल्यानंतर त्याच्याच आज्ञेनें तो बदरिकाश्रमीं गेला [ भागवत १, ३ व ११].
( १ ) सत्कथासार हा एक ग्रंथ प्रसिद्ध आहे, त्यावरून याची व त्यांचे गुरु काशिराज यांची जी माहिती मिळते ती अशी लक्ष्मण पत्नी भागीरथी व पुत्र शिवबा (उद्धव) हे रामानुज संप्रदायी, श्रीकृष्ण उपासक व मुलहेर (नाशिक) येथें होते. काल सुमारें १५४० ते १६००. रंगनाथ (मोगरे) यांचे शिष्य एक काशिराज होते. परंतु ते व हे एक नव्हत. तसेंच निरंजन यांचेहि गुरु एक काशिराज होते. ते गाणपत्य होते. उद्धवाचे गुरू (रामानुज असूनहि) गणपति उपासक होते. दोघांचाहि काल एकच तेव्हां या दोन भिन्न व्यक्ती कीं काय हा संशय आहे. यांचें ग्रंथ अभंग, उद्धवबोध, बोधरहस्य संतमाळ, स्वरूपानुभव, पदें. इ. [सं. क. का. सु.]