विभाग नववा : ई-अंशुमान
उद्धवचिदघन – हा कवि इ. स. १६८० च्या सुमारास होऊन गेला. मोंगलाईंत वाडी स्टेशनपासून ५७ मैलावर धारूर गांव आहे त्याठिकाणीं उद्धवचिदघन राहात असे. याचें नांव उद्धव असून चिद्धन हें याच्या गुरूचें नांव आहे. हा देशस्थ ब्राह्मण रोमोपासक होता.
“ज्याचे वंशीं कुलधर्म रामसेवा । त्याचे वंशीं मज जन्म देगा देवा ।।ध्रु.।।” हें उद्धवस्वामीचें पद प्रसिद्ध आहे. याची कविता अगदीं साधी परंतु भक्तिरसपूर्ण आहे. भाषा अत्यंत सुलभ असून तींत परकीय भाषेंतले शब्द फारसे नाहींत. तथापि काव्यदृष्टीनें याची कविता फारशी हृदयंगम नाहीं.
“कृष्णा धांवरे लवकरी । संकट पडलें भारी ।
हरि तूं आमुचा कैवारी । आलें विघ्न निवारी ।।ध्रु.।।”
हा धांवा करुणारसपूर्ण असून स्त्रियांत रूढ आहे.
उद्धवचिदघनाची कांहीं कविता काव्यसंग्रहांत छापिली आहे. याची छापिलेली कविता निरनिराळ्या वृतांत आहे. ‘अनुभवशतक’ हें अनेक वृतांत श्लोकबद्ध रचिलेलें आहे. याचा‘गीतार्थमंजरी’ हा गीतेचा छायारूपी ग्रंथ सवाई वृत्तांत आहे. याचा शुकरंभा संवाद‘दिंडी’ वृत्तांत आहे, व‘नागनाथ’ आणि त्याचे शिष्य‘हेगराज’ व‘बहिरंभट’किंवा‘बहिरापिसा’ यांचीं चरित्रें तसेंच मृत्युंजय,‘गोराकुंभार’ वगैरेंचीं चरित्रें यानें साकी वृत्तांत गाइलीं आहेत; अशी याची विविध रचना आहे. परंतू उद्धवचिदघनाचें नांव आपणांस नेहमीं ऐकू येतें तें याच्या यांपैकीं कोणत्याहि प्रकरणावरून नसून याच्या अप्रसिद्ध व अनुपलब्ध अशा‘भक्तकथामृतसार’ किंवा अशाच नांवाच्या संतचरित्रात्मक ग्रंथावरून होय. हा ग्रंथ कोठेंहि आढळत नाहीं. उद्धवचिदघनानें रचिलेली एक संतमाला मात्र प्रसिद्ध आहे हींत पुष्कळ संतांचा उल्लेख असून कांहींच्या संबंधीं मुख्य अशी एखाद दुसरी गोष्ट सांगितलेली आहे. या संतमालेची नक्कल महीपतीबुवांनीं उतरून घेतली होती. उद्धवचिदघन याची समाधी मौजें‘धाकरु’ येथें आहे. [महाराष्ट्र कविचरित्र; महाराष्ट्र सारस्वत]