विभाग नववा : ई-अंशुमान
उन-देलवाडा – मुंबई. काठेवाड. जुनागड संस्थानांतील एक जोड गांव. हें मचुंद्री नदीच्या कांठीं असून १९११ सालीं लो. सं. ६२५१ होती. प्राचीन उन गांवाला उन्नतदुर्ग म्हणत असून तें सांप्रतच्या उन गांवाजवळच होतें. सांप्रतच्या गांवाचें नांव पूर्वीं देल्वाडा होतें. म्हणून सबंध गांवाचें नांव उन-देलवाडा असें पडलें. पूर्वीं येथें उनेवाल ब्राह्मणांची सत्ता होती. परंतु वेजल वाजो याच्या नवरीचा या ब्राह्मणांकडून अपमान झाल्यामुळें त्यानें सार्या ब्राह्मणांची कत्तल केली. ब्राह्मणवधामुळें उन्नतदुर्ग भ्रष्ट झाला म्हणून सर्व वस्ती जवळच्या देलवाड्यास आली. त्याला उन नांव पडण्याचें कारण हेंच. यानंतर उन्यास मुसुलमानी अंमल झाला. मुसुलमानांनीं उन्याच्या दक्षिणेस ३ मैलांवर नवी वस्ती वसविली. या नव्या वस्तीला देलवाडा म्हणतात. देलवाड्यापासून ४ व उश्नापासून ७ मैल दिवबेट व किल्ला आहे; उन येथें शहाबागेंत संवत् १६५२ चा लेख आहे; त्यांत अकबरानें जिझीया वगैरे कर कसे उठविले याचें वर्णन आहे. [मुं. गॅ. ८ इं. गॅ. २४]