विभाग नववा : ई-अंशुमान
उन्नाव, जि ल्हा. – संयुक्त प्रांत. लखनौविभांगातील एक जिल्हा. हा गंगा नदीच्या इशान्येस असून याचें क्षेत्र १७९२ चौ. मै. आहे. चतुःसीमा उत्तरेस हरदोई, ईशान्येस लखनौ व रायबरेली, आग्नेयीस रायबरेली. भागिरथी नदी येथून खोल वाहत जाते. उन्नाव जिल्ह्याची मुख्य नदी भागीरथी असून ती सबंध नैॠत्य दिशेची सरहद्द आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडून सायनदी वहात जाऊन भागीरथीशीं समांतर होऊन ईशान्य हद्दींतून वाहते. कल्याणी नांवाची लहान नदी भागीरथीच्या वरील प्रदेशांतून वाहत येऊन, लोणी नांवाची नदी उन्नाव जिल्ह्याच्या मध्यभागीं उगम पासून आग्नेयीकडून रायबरेलीकडे जाते.
उन्नाव जिल्ह्यांत लांकडांची समृद्धि आहे. लांडगे, कोल्हे, रानडुकर, निलगाई व काळवीट आढळतात. जंगली गुरें कळपानें फिरतात. नदींत मासे पुष्कळ सांपडतात. उन्नाव जिल्ह्याची हवा निरोगी असून उष्णकाळांत पारा ७५० पासून १०३० अंशापर्यंत जातो व हिंवाळ्यांत ४६० पासून ७९० पर्यंत असतो. पावसाचें मान दरसाल ३५ इंच असतें.
इ ति हा स. – दंतकथेवरून जिल्ह्यांतील बर्याच गांवांचा संबंध रामायणांतील कथाभागांशीं जोडतात. याहून उन्नावचा इतिहास मुसुलमानी स्वार्यापर्यंत विशेष नाहीं. सन १२०० सालीं उन्नाव घेण्याचा प्रयत्न रजपुतांनीं केलेला होता परंतु मुसुलमानांपुढें त्यांचें कांहीं चाललें नाहीं. अल्लाउद्दीनानें उन्नाव घेतलें होतें. पंधराव्या शतकांत जौनपुराहून इब्राहिम शहानें स्वारी करून सफीपूर घेतलें. अकबर बादशहा असतां उन्नाव लखनौ सरकारांत सामील केलेलें होतें. १८ व्या शतकांत अयोध्येचा नबाब सादतखान याचा पराभव बियास राजानें केला. १८५६ सालीं ज्यावेळेस उन्नाव जिल्हा इंग्रज राज्याला जोडला त्यावेळेस उन्नाव जिल्ह्याचें ठाणें करून पुर्बिआ जिल्हा नवा केला. एक वर्षांनंतर ५७ सालच्या बंडाची धामधूम सुरु झाली. त्यावेळीं उन्नावच्या डेप्युटी कमिशनरला लखनौस पळून जावें लागलें. थोडे तालुकदार राजनिष्ट राहिले त्यांनीं शक्य ती मदत इंग्रजांना दिली. कांहीं तटस्थ राहिले. तथापि चांगला पुढारी नसल्याकारणानें इंग्रजांची बाजू फारशी डळमळली नाहीं. जुलईस हॅवेलॉकनें कानपूर सोडून उन्नावपर्यंत प्रवेश करून लखनौवर चाल केली परंतु शेवटीं त्यास मागें हटावें लागलें. पुढें सप्टेंबर महिन्यांत औटरॅमनें लखनौ सोडविलें व पुढें बंडाचा जोर कमी कमी होत चालला. १८६९ सालीं उन्नाव जिल्हा लखनौ व रायबरेलिचे परगणे मिळून सांप्रत आहे तसा बनवून टाकला.
विठूरच्या समोर भागीरथीच्या कांठीं परैपर गांवाजवळ तांब्याचीं बाणाग्रें पुष्कळ सांपडलीं. बुद्धाच्या वेळचे अवशेष अढळतात. प्राचीन मुसुलमानी इमारती बांगरमाऊ येथें आहेत.
लो क सं ख्या. – जिल्ह्यांत एकंदर ८ शहरें असून खेडीं १६५४ आहेत. १९२१ सालीं लो. सं. ८१९१२८ होती. जिल्ह्यांत ४ तहसिली आहेत. उन्नाव, सफीपूर, पुबिआ व मोहन. मोहन तालुक्याचें मुख्य ठिकाण हसनगंज आहे. उन्नाव येथें म्यु. कमिटी आहे.
शे त की. – उन्नाव जिल्हा सरासरी पिकाचा असून अयोध्येप्रमाणें सुपीक नाहीं. मुख्य धान्यें जव, गहूं व हरबरा, तूर, बाजरी, मका, तांदूळ आणि ज्वारी पुष्कळ पिकतात. कापूस आणि गळिताचीं धान्यें थोड्या प्रमाणांत येतात. गुरें उत्तम प्रकारचीं नसून चांगली पैदास व्हावी म्हणून प्रयत्न चालू आहेत, या जिल्ह्यांत कालवे मुळींच नाहींत.
उ द्यो ग धं दे. – उन्नावमध्यें उद्योगधंदे फारसे नाहींत. पूर्वी नीळ व मीठ होत होतें. आतां ते धंदे साफ बुडालेले आहेत. आतां भगवंत नगर, नवलगंज व मुरादाबाद येथें तांब्याचीं व पितळेचीं भांडीं तयार करतात. आपल्यापुरता जाड कापसाचा कपडा विणतात. उन्नावमधून धान्यें, साखर, तूप बाहेरगांवीं पाठविलें जातें. बाहेरगांवांहून कापड, मीठ, धातू आणि मसाले येतात. कानपूरशीं गाडी मार्गानें दळण वळण बरेंच आहे.
म्युनिसिपलकमिटी फक्त उन्नाव येथें असून बाकी सात गांवांची व्यवस्था १८५६ च्या वीसाव्या कायद्यान्वयें चालते. जरूर कामें बोर्डांतून निकालास लागतात.
शिक्षणाच्या बाबतींत उन्नाव मागेंच म्हणतां येईल. एकंदर लोकसंख्येंत शेंकडा तीन लिहिणारे वाचणारे आहेत. १९०३-४ सालीं १८० शाळा असून ८०१८ विद्यार्थी शिकत होते. त्यांत ५२ मुली होत्या. शिवाय खाजगी शाळा ६१ असून त्यांत ६३९ विद्यार्थी होते. शिक्षण प्रीत्यर्थ खर्च एकेचाळीस हजार रुपये झालेला आहे. उन्नाव येथें इस्पितळ व दवाखाने मिळून ७ आहेत.
त ह शी ल – संयुक्त जिल्ह्यांतील एक तहशील. ईंत उन्नाव, शिकंदरपूर, परियर वहही हे परगणे येतात. क्षेत्रफळ ४०१ चौरस मैल असून १९११ सालीं लोकसंख्या १८४८५५ होती. खेड्यांची संख्या २८७ असून तहशिलीचें व जिल्ह्याचें मुख्य ठिकाण उन्नाव येथें आहे. १९०३-०४ सालीं काळीचें उत्पन्न ३४७००० व इतर बाबीचें उत्पन्न ३६००० होतें. तालुक्यांतील वस्ती विरळ असून पीक उत्तम असतें. १९०३-०४ सालीं २१५ चौ. मै. जमीन वहितीखालीं असून त्यांत ७७ चौ. मै. जमीन पाण्याखालीं होती.
गां व – संयुक्त प्रांत. उन्नाव जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. हें रोहिलखंड रेल्वेवर स्टेशन असून कानपूरपासून लखनौ पर्यंत जी मोठी सडक जाते ती उन्नाव शहरावरून जाते. लोकसंख्या १९११ सालीं ११८०९ होती. या शहरासंबंधानें दंतकथा अशी कीं, उन्नाव आठव्या शतकांत कोणी गोडोसिंग नांवाच्या मनुष्यानें बांधलें. पुढें कांहीं कालानंतर तेथें कनोजचे राजे राज्य करूं लागलें. उनवंतसिंग नांवाच्या एका कामदारानें तेथील सुभेदाराला ठार मारून आपल्या नांवाचां एक किल्ला बांधला. १४५० सालीं सय्यदांनीं उनवंतसिंगाच्यां वंशजाला ठार मारून उन्नाव आपल्या स्वाधीत ठेविलें. पूढें शहाजहान बादशहा गादीवर असतां उन्नाव येथें फत्ते उल्ला नांवाचा सय्यद रहात असे. त्यानें शहरांत चांगल्या इमारती उठविल्या. १८५७ च्या जून महिन्यांत हॅवेलॉकनें बंडखोरांना उन्नाव येथें पिटाळून लावलें. म्यु. कमिटी १८६९ सालीं स्थापिली जाऊन १९०३-०४ सालीं १२ हजार उत्पन्न होऊन सोळा हजार रुपये खर्च झाले. उद्योगधंदे फारसे नाहींत तरी हें भरभराटींत आहे. येथें एक साखरेचा कारखाना चालतो.