विभाग नववा : ई-अंशुमान
उपकेशगच्छ – जेव्हां जैनांतील निरनिराळ्या धर्मगुरूंच्या धार्मिक मतांमध्यें फरक होत गेले, तेव्हां त्यांचे निरनिराळे संप्रदाय बनत गेले. अशा संप्रदायांनां गच्छ असें नांव आहे. प्रत्येक गच्छाची गुरुपरंपरा (गच्छावलि, पट्टावलि) असून महावीरापासून गच्छसंस्थापकापर्यंत त्रोटक माहिती व पुडें गच्छसंस्थापकापासून आजतागाईत प्रत्येक सूरीची विस्तारानें माहिति अशा पट्टावलींतून दिलेली असते. हे गच्छ अजगासें ८४ आहेत व या गच्छांमध्यें फार मोठेसे भेद नसून केवळ एखाददुसरा आचार मात्र निराळा असतो. ज्या गुरूपासून दीक्षा मिळेल त्या गुरूच्या गच्छाचा तो शिष्य घटक बनतो. प्रत्येक गच्छ इतर गच्छाधिकार्यांनां मान देतात. ओसवाल जैन उपकेशगच्छाचे असून ते आपली परंपरा पार्श्वनाथापासून मोजतात. गच्छाची गुरुपरंपरा गच्छसंस्थापकापासून पुढची कांहींशी ऐतिहासिकदृष्ट्या विश्वसनीय मानतां येईल; पण इ. स. ९ व्या शतकापर्यंतची मात्र फार जपून ग्रहण केली पाहिजे. कारण मध्यंतरीं कोठें तरी तीन शतकांइतका कालानुक्रमांत मोठा खळगा पडलेला दिसतो. [ जैन बिब्लिओग्रॅफीवरील निबंध, पॅरिस १९०६ जैन एपिग्रॅफी वरील रिपोर्ट, पॅरिस १९०८.]
श्रीमालच्या ऊहडानें ओसनगरी स्थापिली. तेव्हांपासून या ठिकाणच्या जैनसमाजाला उपकेश हें नांव मिळालें व शहरालाहि उपकेशपट्टण किंवा नगरी असें नांव पडलें. उपकेशाची संक्षिप्त संज्ञा‘ओस’ अशी रूढ होऊन उपकेश नगरीचें ओसनगरी असें नामांतर झालें. ओसच्या जैन जातीला ओसवाल किंवा ओस्वाल असें म्हणत. (‘ओसवाल’ पहा )
पार्श्वनाथाचे संतानीय (संतान ही संज्ञा पट्टपरंपरा दर्शविण्यासाठीं योजितात. हिचा अर्थ “धर्गगुरूंची परंपरा” असा आहे.) हे खालीं दिल्याप्रमाणें आहेत.
१ ग ण ध र शु भ द त्त – हा पार्श्वनाथाचा पहिला शिष्य होता. २ हरिदत्त - शुभदत्ताचा उत्तराधिकारी. ३ आर्यसमुद्र – हरिदत्ताचा उत्तराधिकारी. ४ गणधर केशिन् – आर्यसमुद्राचा उत्तराधिकारी. राजप्रश्नीय उपांगांत असें सांगितलें आहे कीं, ह्यानें सेयबीच्या प्रदेशी नृपाला (मांडलिक राजाला) दीक्षा दिली. ५ स्वयंप्रभ सूरि – केशिनचा उत्तराधिकारी. ह्याचा उपदेश ऐकून विद्याधर रत्नचूड प्रतिबुद्ध झाला. रत्नचूडानें जिनपार्श्वाच्या मूर्तीची पूजा करण्याची इच्छा स्वयंप्रभसूरीला कळविली. त्यानंतर स्वयंप्रभानें विद्याधर रत्नचूडाला (रत्नप्रभसूरी) दीक्षा दिली. तो क्रमाक्रमानें १२ अंगें व १४ पूर्वे शिकला आणि महावीराच्या मृत्यूनंतर ५२ व्या वर्षीं गुरूनें त्याला आपला उत्तराधिकारी नेमिला. ह्याप्रमाणें आचार्य पदवीवर नेमिला गेल्यामुळें तो पांचशें साधू बरोबर घेऊन पृथ्वीवर पर्यटन करू लागला.
६ श्री र त्न प्र भ सू रि. - श्रीरत्नप्रभसूरि पांचशें शिष्य बरोबर घेऊन लवण-सरोवराच्या टेंकड्यांवर (लूण-द्रवि-डूंगरी) आला. तेथील लोक जैन धर्मावर विश्वास ठेवणारे नव्हते. कोरंटकांत महावीराची मूर्ति आचार्य रत्नप्रभानें स्थापन केली. श्रीमाल येथील प्रधान ऊहड व त्याचे अनुयायी श्रावक बनले. रत्नप्रभानें सच्चिकादेवीच्या पूजेपासून लोकांचें मन परावृत्त केलें व स्वतः देवी मांसभक्षण सोडून जैनधर्मीय बनली. ह्यामुळें पुष्कळ लोक श्रावक बनले.
महावीरानंतर ८४ व्या वर्षीं आचार्य रत्नप्रभ स्वर्गाप्रत गेला. ७ आचार्य यक्षदेव - रत्नप्रभाचा उत्तराधिकारी. ह्यानें यक्ष माणभद्राला दीक्षा दिली व या प्रकारें संघाचा त्रास नाहींसा केला.
ह्यानंतरचे क्रमशः उत्तराधिकारी – ८ कक्कसूरि. ९ देवगुप्तसूरि. १० सिद्धसूरि ११ रत्नप्रभसूरी. १२ यक्षदेवसूरि. १३ कक्कसूरि. १४ देवगुप्त-सूरि. १५ श्रीसिद्धसूरि. १६ श्रीरत्नप्रभ-सूरि.
१७ श्रीयक्षदेवसूरि – महावीरानंतर ५७ व्या वर्षीं होऊन गेला. वज्रस्वामिनचा शिष्य वज्रसेन ह्याच्या मृत्यूनंतर त्याच्या १८ नागेंद्र, चंद्र, निवृत्ति व विद्याधर नांवाच्या चार शिष्यांनां १२ वर्षांच्या दुर्भिक्षांत ह्या यक्षदेवानें दीक्षा दिली व चार शाखा स्थापिल्या.
ह्यानंतर क्रमशः उत्तराधिकारी येणेंप्रमाणें होऊन गेले:- १९ कक्वसूरि, २० देवगुप्तसूरि, २१ श्रीसिद्धसूरि, २२ श्रीरत्नप्रभसूरि, २३ यक्षदेवसूरि, २४ कक्कसूरि, २५ देवगुप्तसूरि, २६ सिद्धसूरि, २७ रत्नप्रभसूरि, २८ यक्षदेवसूरि, २९ कक्कसूरि, ३० देवगुप्तसूरि, ३१ सिद्धसूरि, ३२ रत्नप्रभसूरि, ३३ यक्ष देवसूरि,
३४ कक्कुडाचार्य:- यक्षदेवसूरीचा उत्तराधिकारी. ह्यानें १२ वर्षेंपर्यंत आचाम्लासह‘षष्ठतप’ नांवाचें तप केलें. मरोटकोटांतील श्रेष्ठी सोमक हा त्याच्या स्तुतिस्तोत्राच्या योगानें बंधमुक्त झाला. त्यानंतर सोमकानें कक्कुडाचार्यांची पादपूजा करण्याचा निश्चय केला, व म्हणून तो भरुकच्छा (भडोच)ला गेला. तो जेव्हां कक्कुडाचार्याला भेटावयास गेला त्यावेळीं सर्व मुनि भिक्षा मागण्याकरितां निघून गेले होते. सच्चिकादेवी मात्र गुरुची सेवा करीत होती. हें पाहून सोमकाच्या मनांत संशय उत्पन्न झाला. सच्चिकादेवीनें हें जाणून त्याला रक्त ओकण्याची शिक्षा दिली. त्यानें आपला अपराध कबूल केल्यावर सर्वांनीं त्याची निर्भर्त्सना केली. गुरूनें मात्र त्याच्यावर दया करून त्याला पूर्वस्थितींवर आणिलें.
श्रीरत्नप्रभसूरि व श्रीयक्षदेवसूरि हे फार बलाढ्य होते. त्यांच्या नांवानें धान्यागारें स्थापन केलीं होतीं. परंतु संघ जेव्हां तृषेनें व्याकूळ झाला तेव्हां अर्बुद पर्वताच्या पार्श्वभागांवर काठी टोंचून कक्कुडाचार्यानें पाणीं उत्पन्न केलें; आणि आपल्या धर्माच्या लोकांकरितां वाटणार्या प्रेमामुळें त्यानें जेसलपुराहून (आतां, जेसलमीर) भरुकच्छाला भडोचला धृत आणिलें.
ह्यानंतरचे क्रमशः उत्तराधिकारी:- ३५ देवगुप्तसूरि, ३६ सिद्धसूरि, ३७ कक्कसूरि, ३८ देवगुप्तसूरि, ३९ सिद्धसूरि, ४० कक्कसूरि.
४१ दे व गु प्त सू रि:- विक्रमशकाच्या ९९५ व्या वर्षीं हा उत्तराधिकारी झाला. हा क्षत्रिय जातीचा होता व ह्याला वीणा वाजविण्याचा फार नाद होता. ह्यामुळें कर्तव्यकर्मांत तो दुर्लक्ष करूं लागला. म्हणून चार संघांनीं त्याच्या जागीं ४२ श्री सिद्धसूरि विशविश्वोपकाला, नेमिलें.
४३ क क्क सू रि:- श्रीसिद्धसूरीचा उत्तराधिकारी. हा “पंचप्रमाण” नामक ग्रंथाचा कर्ता होता.
४४ श्री दे व गु प्त सू रि:- विक्रमशक १०७२ मध्यें हा कक्कसूरीचा उत्तराधिकारी झाला. हा “नवपदप्रकरण” नामक ग्रंथाचा कर्ता होता.
ह्यानंतरचे क्रमशः उत्तराधिकारीः- ४५ सिद्धसूरि ४६ कक्कसूरि, ४७ देवगुप्तसूरि, ४८ सिद्धसूरि, ४९ कक्कसूरि,
५० दे व गु प्त सू रि:- विक्रमशक ११०८ मध्यें हा कक्कसूरीचा उत्तराधिकारी झाला. भीनमाल शहरांत ह्याच्या पदमहोत्सवाच्या [पदावर आरूढ होण्याच्या वेळीं केलेला महोत्सव] मेजवानीच्या प्रसंगीं साह भेंसाक्ष यानें सात लक्ष द्रव्य खर्च केलें. त्याप्रसंगीं गुरूचें पादप्रक्षालन करून जें पाणीं मिळालें तें विषावर उतार्याचें औषध आहे असें आढळून आलें !
ह्या भैसाक्षाची माता श्रीशत्रुंजयाच्या यात्रेला जात असतां पट्टण येथें तिच्याजवळचें द्रव्य सरलें. म्हणून तिनें श्रेष्ठी ईश्वर ह्याच्यापाशीं मदत मागितली. त्यानें द्रव्य दिलें, परंतु तें देतांना भेंसाक्षाविषयीं तिरस्कारविषयक भाषण केलें. तो म्हणाला कीं‘तुम्ही माझें पिण्याचें पाणीं आणणार्याची आई आहां असें मला वाटलें.” हा वृत्तांत तिनें भेंसाक्षाला कळविला. त्यानें पूर्वीं डिडुवापुरांत आपल्या भैसा नांवाच्या बायकोच्या कांचेच्या बांगड्या जतन करून ठेविल्या होत्या. गुर्वाज्ञेप्रमाणें त्यानें गुरूचे पाय धुतल्यावर जें पाणी मिळालें त्यानें त्या बांगड्या धुतल्या तेव्हां त्यांची चांदी झाली. ह्या चांदीच्या मुद्रा पाडल्या. त्यांनां गडहीय मुद्रा असें म्हणतात. ह्या सवालक्षाच्या रजतमुद्रा त्यानें गर्दभांवर पट्टणाला नेल्या. श्रेष्ठी ईश्वरानें “तूं देशील तितकी चांदी मी घेतों” असा पूर्वीं करार केला होता; परंतु एवढी मोठी रक्कम पाहून तो आश्चर्यचकित झाला. गुर्जर देशांत रेड्यावर पिण्याचें पाणी आणण्याच्या शिक्षेच्या करारावर भेंसाक्षानें ईश्वराला क्षमा केली. तो पैसा सप्तक्षेत्रासाठीं खर्च करावा असें भेंसाक्षानें सांगितलें. (सप्तकर्मक्षेत्रें) = १ मंदिर बांधणें, २ तेथें प्रतिमा स्थापणें, ३ पवित्र ग्रंथांचा तेथें संग्रह करणें, वरील कृत्य करण्याच्या वेळीं, ४, ५ पुरुष व स्त्री साधूंना अन्न व वस्त्रें देणें, आणि ६, ७ शक्त्नुसार पुरुष व स्त्री ! श्रावकांना धन देणें) ह्याप्रकारें “गाडहीय शाखा” उत्पन्न झाली.
५१ श्री. सि द्ध सू रि:- हा देवगुप्तसुरीचा उत्तराधिकारी होता.
५२ श्री क क्क सू रि.– विक्रमशक ११५४ त हा श्री सिद्धसूरीचा उत्तराधिकारी झाला. हेमसूरि व कुमारपाल यांच्या सल्ल्यानें त्यानें क्रियाहीन मुनींना काढून लाविलें.
५३ श्री देवगुप्तसूरि:- श्रीकक्कसूरीचा उत्तराधिकारी. ह्यानें एक लक्ष द्रव्य दान दिलें.
५४ श्री सि द्ध सू रि:- ५५ श्रीकक्कसूरि.– विक्रमशक १२५२ हा सिद्धसूरिचा उत्तराधिकारी झाला. ह्यानें मरोटकोटाला पूर्वस्थितीप्रत आणिलें ह्यानंतरचे क्रमशः उत्तराधिकारी:- ५६ श्रीदेवगुप्तसूंरी, ५७ सिद्धसूरि, ५८ कक्कसूरि, ५९ देवगुप्तसूरि, ६० श्रीसिद्धसूरि, ६१ कक्कसूरि, ६२ श्रीदेवगुप्तसूरि, ६३ श्रीसिद्धसूरि, ६४ कक्कसूरि, ६५ देवगुप्तसूरि.
६६ श्री सिद्धसूरि:- विक्रमशक १३३० त हा देवगुप्तसूरिचा उत्तराधिकारी झाला. पाल्हणपुरांत साह देशल ह्यानें त्याच्या पदारोहणाची मेजवानी दिली. समराच्या आश्रयाखालीं ह्या सिद्धसूरीनें शत्रुंजय पर्वतावर, सहाव्या उद्धाराच्या काळची आदिनाथाची मूर्ति बसविली. (जैनांचा असा विश्वास आहे कीं ॠषभदेवाच्या काळापासून बहादुर शाहाच्या (औरंगझेबाचा मुलगा) काळापर्यंत, शत्रुंजय पर्वतावर १६ मोठे उद्धार (देवळाचे जीर्णोद्धार) होऊन गेले.
६७. श्री क क्क सू रि. – हा श्री-सिद्ध सूरीचा उत्तराधिकारी होता. ह्याच्या पदारोहणाची मेजवानी साह सहज याच्या आश्रयाखालीं विक्रमशक १३७१ त झाली. मच्छप्रबंध नांवाचा ग्रंथ यानें रचिला. त्यांत देशलाचे दोन पुत्र ‘समर’ व‘सहज’ यांचें चरित्र वर्णिलें आहे.
६८. श्री दे व गु प्त सू रि. – हा प्रख्यात कवि, विद्वन्मुकुटमणि, सिद्धांतपारंगत व अखिल शास्त्रनिकष होता. ५: हजार सुवर्णमोहरा खर्च करून सारंगधरानें १४०९ सालीं दिल्लींत त्याच्या पदारोहणाची मेजवानी दिली.
६९. श्री सि द्ध सू रि. – विक्रमशक १४७५ त हा श्रीदेवगुप्त सूरीचा उत्तराधिकारी झाला. त्याचा आश्रयदाता (आग्रह) चोरवेडी या गोत्राचा झांबानीम्ह यानें अणहल्लपुरांत याच्या पदारोहणाची मेजवानी दिली.
७०. श्री क क्क सू रि. – विक्रमशक १४९८ त हा श्री सिद्धसूरिचा उत्तराधिकारी झाला. चोरवेडी या गोत्राचा साह सारंग व सोनापूरचा राजा यांनीं चित्रकूट (चिताड) येथें त्याच्या पदारोहणाची मेजवानी दिली. यानें १४४४ सालीं सर्व कच्छ प्रांतांत सर्व प्रकारच्या प्राणिवधाची मनाई मिळविली होती. त्यानें जान श्रीवीरभद्राला जैन धर्माची दीक्षा दिली. यानें संस्कृत व प्राकृत ग्रंथ लिहिले. सर्व शास्त्रें यानें अधीत केलीं. हा वाचस्पतीसारखा वक्ता (वाग्मी), सकल कलायुक्त व धर्मशास्त्रवेत्ता होता.
७१. श्री दे व गु प्त सू रि:- श्रेष्टिगोत्राचा मंत्रीश्वर साहूल याचा पुत्र मुख्य प्रधान जयंत (श्री देवगुप्तसूरीचा आश्रयदाता). यानें मोठ्या समारंभानें श्रीदेवगुप्त सूरीचा पदारोहणविधि विक्रमशक १५२८ त करविला. यानें पार्श्वनाथाचा एक प्रासाद व एक उपोषणशाळा (उपास पाळण्याकरितां केलेली निवान्त जागा) बांधली. त्यानें शत्रुंजयाची एक यात्रा केली. त्यानें पांच पाठक नेमले. त्यांचीं नांवें येणेंप्रमाणें.– श्रीधनसागरउपाध्याय, श्री देवकल्लोल उपाध्याय, पद्मतिलक उपाध्याय, हंसराज उपाध्याय, मतिसागर.
७२. श्री सि द्ध सू रि. – हा श्री देवगुप्तसूरीचा उत्तराधिकारी, श्रेष्ठिगोत्राचा मुख्य प्रधान दशारथ याचा पुत्र मुख्य प्रधान लोलागर (लोलाग्रहण) यानें मेदिनीपुरांत (मिदनापूर) विक्रमशक १५६५ त, याच्या पदारोहणाची मेजवानी दिली.
७३. श्री क क्क सू रि. – हा श्री सिद्ध सूरीचा उत्तराधिकारी झाला. हा योधपुरांत (जोधपूर) विक्रमशक १५९५ त गच्छाधिप (गच्छाचा मुख्य) झाला. श्रेष्ठि गोत्राचा मंत्री जग याचा पुत्र मुख्य प्रधान धर्मसिंह यानें जोधपुरांत याच्या पदारोहणाची मेजवानी दिली.
७४. श्री दे व गु प्त सू रि. – श्री कक्कसूरीचा उत्तराधिकारी श्रेष्ठिगोत्राचा प्रधान सहसवीर याचा पुत्र. प्रधान देद (श्रीदेवगुप्तसूरिचा आश्रयदाता) यानें विक्रमशक १६३१ त त्याच्या पदारोहणाची मेजवानी दिली.
७५. श्री सि द्ध सू रि. – १६५५ सालीं चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षांतील त्रयोदशीला हा श्री देवगुप्तसूरीचा उत्तराधिकारी झाला. मंत्रीश्वर वाकूरसिंह (श्रेष्ठि गोत्रीय) यानें विक्रमपुरांत (विक्रमपुरांत) मोठ्या समारंभानें त्याच्या पदारोहणाची मेजवानी दिली.
[संदर्भ ग्रंथ – मुनि आत्मारामजी आनंदविजयजी यांनीं अज्ञानतिमिरभास्कर नांवाचा एक ग्रंथ लिहिला आहे, त्यांत या गच्छाची पट्टावली सांपडेल. इं. अँ. पु. १९ पा. २३३-२४२ उवासगदसाओ (हर्नोलची प्रत). प्रिन्सेप – इंडियन अँटिक्विटीज पु. १०. पीटर्सनचा रिपोर्ट ४. (बाँ. ब्र. रॉ, ए. सो. १८९४),]