विभाग नववा : ई-अंशुमान
उपनयन. - त्रैवर्णिकांच्या सोळा संस्कांरांपैकीं हा एक मुख्य संस्कार आहे. उपनयनानंतर आचरावयाचें जें ब्रह्मचर्य व्रत त्या व्रताच्या नांवावरून उपनयन झालेल्या मुलास ब्रम्हचारी असें म्हणतात. ब्रम्हचारी पदाचा ॠग्वेदांत ( १० १०९, ३ ) उल्लेख आहे परंतु तेथें याचा ब्रह्मचर्याश्रम असा अर्थ होत नाहीं. अथर्व वेदांत मात्र (११. ७, ५) उपनयनाचा स्पष्ट उल्लेख असून ब्रह्मचारी यानें आचरावयाच्या धर्मांचाहि स्पष्ट उल्लेख आहे. तसेंच ब्रम्हचार्यास त्याचा गुरु विद्यादानानें जन्म देतो असाहि उल्लेख आहे.
उपनयन म्हणजे गुरूनें विद्यार्थ्यास अध्ययनासाठीं आपल्या जवळ आणणें. चूडाकर्मापर्यंत बालकाचे सर्व संस्कार पित्यानें करावयाचे असून उपनयन हा संस्कार अध्ययन सांगणार्या गुरूनें करावयाचा असतो. परंतु सध्यां विद्यार्थ्यांनें गुरुगृहीं विद्याभ्यासास जाण्याची चाल मोडल्यापासून पित्यानेंच पुत्राचा उपदेशकर्ता होऊन उपनयन संस्कार करण्याची चाल सुरू झालीं.
ब्राह्मणपुत्राचें उपनयन आठव्या वर्षीं करावें असें सर्व सूत्रांचें मत आहे. क्षत्रियांचा उपनयन संस्कार अकराव्या वर्षीं व वैश्यांचा बाराव्या वर्षीं करावा असें सांगितलें आहे.
उपनयनांत सर्व वेदांचें सार असा जो गायत्री (सावित्री) मंत्र त्याचा उपदेश करावयाचा असतो आणि नंतर वेदांचें अध्ययन करावयाचें असतें. याकरितां ज्या त्रैवर्णिकांनां सावित्रीचा उक्तकालीं उपदेश होत नाहीं, त्यांनां ‘पतित सावित्रिक’ अशी संज्ञा आहे. वरील संस्कार वेळच्या वेळीं न झाल्यास ब्राह्मणांनां शेवटची मुदत सोळावें वर्ष, क्षत्रियांनां बावीसावें वर्ष, व वैश्यांनां चोविसावें वर्ष अशी सांगितली आहे. या मुदतीच्या आंत जर उपनयन झालें नाहीं तर यापुढें त्यांचें उपनयन करूं नये, त्यांनां वेदांचा उपदेश करूं नये, अशांचे पौरोहित्य करूं नये आणि यांच्यांशीं संसर्ग होऊं देऊं नये असें सांगितलें आहे. याज्ञवल्क्य स्मृतींत अशा प्रकारच्या पतित सावित्रीकांनां व्रात्य अशी संज्ञा दिली आहे, आणि अशांचे संस्कार ‘व्रात्यस्तोम’ नामक ॠतु करून करावे असें सांगितलें आहे.
उपनयन संस्कारांत प्रथम कुमाराची हजामत करवून त्यास स्नान घालावें. नंतर उपनयनास उक्त असा होम झाल्यावर शिष्याकडून कौपीन, कृष्णाजिन, यज्ञोपवीत व वस्त्रें धारण करवावीं. नंतर आचार्यानें अग्नीच्या उत्तरेस पूर्वेकडे तोंड करून बसावें आणि आपल्यापुढें आपल्याकडे तोंड करून शिष्यास बसवावें आणि आपली ओंजळ पाण्यानें भरून ती शिष्याच्या पाण्यानें भरलेल्या ओंजळींत ओतावी. नंतर‘देवस्यत्वा’ हा मंत्र म्हणून त्याच्या शेवटीं शिष्याचें संबुध्यंत नांव घ्यावें आणि अंगुष्ठासह शिष्याचा उजवा हात धरावा. नंतर पुन्हां पूर्वींप्रमाणें ओंजळीनें पाणीं ओतण्याचा विधि करून‘सविता ते हस्तमग्रभीत्’ हा मंत्र म्हणून गुरूनें पुन्हां शिष्याचा हात धरावा आणि मंत्राच्या शेवटीं शिष्याचें नांव उच्चारावें. तसेंच तिसर्यांदा पाणी ओतण्याचा विधी केल्यावर अग्निराचार्यस्तव’ असा मंत्र म्हणून त्याच्या शेवटीं नामग्रहण करावें. या विधीस ‘अंजल्पवक्षारण’ असें म्हणतात. हा विधि कांहीं सूत्रांनीं व प्रयोगकारांनीं दिला नाहीं. कांहीं सूत्रांत शिष्यास अग्नीच्या उत्तरेस ठेवलेल्या दगडावर उभे करण्याचा विधि सांगितला आहे. नंतर‘हा शिष्य तुझा आहे याचें रक्षण कर’अशा अर्थाचा मंत्र आचार्यानें पठण करून व शिष्यास पूर्वाभिमुख करून शिष्याकडून सूर्यावलोकन करवावें असा विधि सांगितला आहे. कांहीं सूत्रांत आदित्य अथवा प्रजापति या देवतांच्या ठिकाणीं संरक्षणार्थ शिष्यास इंद्राच्या स्वाधीन करण्याबद्दल उल्लेख आहे. नंतर आचार्यानें शिष्याच्या दोन्ही खांद्यावर आपले दोन्ही हात ठेवून त्याला आपल्या सन्मुख करावें आणि त्याच्या हृदयावर आपला हात ठेवावा.
नंतर शिष्यानें अग्नीच्या पश्चिमेस बसून‘अग्निकार्य’ नामक नित्यौपासन होम करावयाचा असतो. हा होम न करतां नुसती अग्नींत समिध द्यावी असेंहि मत आहे. नंतर अभिवादन करून शिष्यानें आपला उजवा गुडघा जमीनीवर टेंकून सावित्रीचा (गायत्रीचा) उपदेश करण्याबद्दल आचार्याची प्रार्थना करावी. अथवा शिष्यानें आपल्या उजव्या हातानें डावा कान व डाव्या हातानें उजवा कान धरावा आणि कान सोडून तशाच हातांनीं आचार्याच्या पायांना स्पर्श करावा आणि अभिवादन करावें. अशा प्रकारचाहि एक अभिवादनाचा प्रकार सांगितला आहे. शिष्यानें प्रार्थना केल्यावर आचार्यानें शिष्याचे दोन्ही हात त्याच्या वस्त्रासह आपल्या हातांत घ्यावे आणि त्यावरहि आच्छादन घालावें आणि शिष्यास गायत्रीचा उपदेश प्रथम पादशः, नंतर अर्धर्चशः आणि नंतर सर्व मंत्र असा करावा. अथवा शिष्याला जसा ग्रहण करतां येईल तसा करावा. नंतर आचार्यानें शिष्याच्या हृदयावर आपला तळहात ठेवून‘माझ्या मताप्रमाणेंच तूं वागावेस, माझ्याच व्रतांचें आचरण करावेंस’ अशा अर्थाचा मंत्र म्हणावा. व शिष्याच्या कमरेस मेखला बांधून हातांत दंड द्यावा. नंतर ब्रह्मचर्यव्रताचा (त्यानें पाळावयाच्या नियमांचा) उपदेश करावा. शिष्यानें भिक्षा मागून आणावी व आचार्यास निवेदन करावी. सायंकाळी चरु शिजवून अनुप्रवचनीय होम आचार्यानें-शिष्यानें अन्वारंभ केला असतां-करावा. नंतर ब्रह्मचार्य यानें तीन रात्रीं अथवा बारा रात्रीं ब्रह्मचारी व्रताचें आचरण करावें आणि नंतर मेधाजनन नामक कर्म करावें.
कांहीं कारणानें पुनरुपनयन करणें झाल्यास उपनयनापूर्वीं करावें लागणारें वपन (हजामत) करूं नये व मेधाजनन कर्महि करूं नये आणि गायत्री मंत्राचा उपदेश करावयाचा तो‘तत्सवितुर्वणीमहे’ या मंत्राचा करावा. निरनिराळ्या सूत्रकारांच्या मतानें वरील विधींत थोडा थोडा फरक आहे. वर विधि दिला आहे तो आश्वलायन सूत्राला अनुसरून आहे.