विभाग नववा : ई-अंशुमान
उपनिधि. – आपलें द्रव्य सुरक्षित रहावें यासाठीं दुसर्याजवळ ठेव म्हणून ठेवलें असल्यास त्यास औपनिधिक असें म्हणतात. व तें द्रव्य ज्या करंड्यात अथवा पेटींत ठेवलें असेल त्यास वासन अथवा उपनिधि असें म्हणतात. अशा प्रकारचा उपनिधि एखाद्याजवळ ठेवलेला चोरीस गेला, पुरून ठेवलेला नाहींसा झाला, अथवा राजानें तो हरण केला तर, ज्याच्या जवळ तो ठेवला असेल त्याच्याकडून तो ठेवणारानें घेऊं नये. मात्र खरोखरच तो निधि नाहींसा झालेला असला पाहिजे. द्रव्य ठेवणारा द्रव्य ठेवलेल्या मनुष्याजवळ मागण्यास गेला असतां तें मागणारास दिलें नाहीं आणि त्यानंतर तें द्रव्य नष्ट होईल तर राजानें तें द्रव्य ठेवणाराला देववावें व त्या द्रव्याइतकाच तें द्रव्य ठेवून घेणारास दंड करावा. तसेंच एखाद्यानें वरील प्रकारच्या ठेवीचा व्यावहारिक (व्याजी लावणें वगैरे) उपयोग केल्यास त्यासहि राजानें दंड करावा. हा दंड करणें तो शेकडा पांच टक्के प्रमाणें करावा असें याज्ञवल्क्य स्मृतींत (व्यवहाराध्याय, उपनिधिप्रकरण) सांगितलें आहे. (ठेव पहा).