विभाग नववा : ई-अंशुमान
उपनेत्र – (चष्मा) मनुष्याच्या नेत्रांतील दोष दूर करण्याकरितां कांचेच्या किंवा गारेच्या भिंगांचा (लेन्स) उपयोग करितात; हीं भिंगें डोळ्यापुढें व्यवस्थित रीतीनें रहाण्याकरितां धातूच्या सांगाड्याचा (फ्रेम) उपयोग करितात. ही भिंगें क्रौनग्लास नांवाच्या बिलोरी कांचेचीं किंवा रॉक क्रिस्टल नांवाच्या गारेचीं करितात. गारेचीं भिंगें जास्त स्वच्छ (जास्त पारदर्शक) आणि थंड असतात. साच्या साठीं पोलाद, निकेलपोलाद, सोनें इत्यादि धातूंचा उपयोग करितात. काळ्या किंवा दुसर्या रंगांच्या भिंगांचा उपयोग तीव्र प्रकाशापासून डोळ्यांचा बचाव करण्याकरितां करितात. डोळ्यांत फूल पडलें असल्यास आपलें व्यंग दिसूं नये म्हणून कित्येकांस असल्या प्रकारचीं भिंगें वापरावी लागतात. असल्या प्रकारच्या रंगीत भिंगाकरितां निरनिराळे रंग आणि त्यांच्या अनेक छटा यांचा उपयोग करितात.
त्रि को नी किं वा स म पा र्श्व भिं गां चे च ष्मे. – असल्या प्रकारच्या भिंगांचा उपयोग तिरळेपणा घालविण्याकरितां करितात. त्रिकोनी भिंगा (प्रिझम) च्या अंगीं प्रकाश किरणांचें वक्रीभवन करून त्या किरणास त्रिकोणाच्या पायाकडे वळविण्याची शक्ति असते. तेव्हां तिरळे डोळ्यास प्रकाश सरळ रेषेंत आणून मदत करण्याचें काम या भिंगाकडून उत्तम प्रकारें बजाविलें जातें. जर एखाद्या मनुष्याच्या डोळ्यांत समीपदर्शित्वाचा किंवा दूरदर्शित्वाचा दोष असून त्या बरोबरच तिरळेपणाचा दोष असेल तर त्रिकोणी भिंगासहित अन्तर किंवा बहिर्गोल भिंगांचा उपयोग करितात. एका त्रिकोणी भिंगाच्या पुढें किंवा मागें अन्तर किंवा बहिर्गोल भिंग ठेवूनहि कार्यभाग होतो; परंतु अशा प्रकारच्या रचनेंत बोजडपणा येतो तो न यावा म्हणून त्रिकोणी भिंगच घांसून त्याचें वर्तुलात्मक भिंग बनवितात.
व र्तु ला त्म क भिं गें (लेन्स) – असल्या प्रकारच्या भिंगांचे मुख्यतः तीन प्रकार असतात. या भिंगांची केंद्रें किती इंच अंतरावर आहेत हें मोजून त्या प्रमाणें त्यांस नंबर देण्याची पद्धत चालू होती; परंतु लांबीच्या मापांत निरनिराळ्या देशांत फरक असल्यामुळें ही पद्धत गैरसोइची ठरली व नवीन पद्धति प्रचारांत आली आहे. या नवीन पद्धतींत ज्या भिंगाचें केंद्रान्तर (फोकल लेंग्थ) एक मीटर आहे त्याची वक्रीभवनशक्ति हें मूलमान ठरवून त्यास‘डॉयाप्टिक’ हे नांव दिलें आहे व या मानानें निरनिराळ्या भिंगांचे नंबर लावतात. वर निर्दिष्ट केलेल्या तीन प्रकारच्या भिंगापैकीं पहिल्या प्रकारची भिंगें नेहमींच्या व्यवहारांत चष्म्याकरितां उपयोगांत आणलीं जातात. दुसर्या प्रकारचीं भिंगें भारी प्रतीच्या चष्म्याकरितां उपयोगांत आणतात. तिसर्या प्रकारचीं भिंगें क्वचित प्रसंगी उपयोगांत आणलीं जातात.
अं त र्गो ल भिं गें. – समीपदर्शित्वाचा दोष ज्याच्या नजरेंत उत्पन्न झाला असेल अशा मनुष्यास दूरचें नीट दिसण्याकरितां अंतर्गोलभिंगांचा उपयोग करितात. आतां समीपदर्शित्व मनुष्याच्या ठिकाणीं कसें उत्पन्न होतें हें पाहिलें पाहिजे. डोळ्यांत एक प्रकारचें भिंग असतें. हे बाह्यगोल असतें. नेत्रांतील या भिंगाच्या रचनेंत फरक पडल्यास दृष्टिदोष उत्पन्न होतात. हें भिंग जाडें झाल्यास समीपदृष्टिदोष प्राप्त होतो. हा दोष नाहींसा व्हावा म्हणून वरील प्रकारच्या भिंगांचा चष्मा वापरतात. साधारणपणें आठरा फूट अंतरावरून जाड्या टाईपांत लिहिलेलें वाचतां येईल इतक्या शक्तीचें (नंबरचें ) भिंग वापरावें. समीपदृष्टि हा दोष फारच जास्त प्रमाणांत असेल तर जवळचें वाचण्याकरितां कमी शक्तिचें भिंग वापरावें लागतें. समीपदृष्टित्वाचा दोष बालपणींच बहुधा उत्पन्न होतो; व विद्यार्थिदशेंत हा बहुधा वाढतो. विशेषतः याची उपेक्षा केल्यास हा खात्रीनें वाढतो. याकरितां हा दोष असलेल्या मनुष्यानें उपनेत्रांचा उपयोग लवकर करून हा दोष घालवावा. शेंकडा ९५ बाबतींत हा दोष औषधोपचारानें बरा होण्यासारखा असत नाहीं. ज्याच्या ठिकाणीं हा दोष उत्पन्न झाला असेल त्यांनीं वेळेवर शारीरिक व्यायाम घेऊन प्रकृति सुधारावी म्हणजे उत्पन्न झालेला दोष वाढत नाहीं व त्यामुळें चष्म्याचे नंबर वाढवावे लागत नाहींत. हा दोष असणार्यांनीं खुली हवा, स्वच्छ उजेड, मोठ्या अक्षरांचींच पुस्तकें वाचणें आणि आरोग्य इतक्या गोष्टीकडे अवश्य लक्ष पुरवावें.
बा ह्य गो ल भिं गें:- दूरदर्शित्वाचा दोष ज्याच्या नेत्रांत उत्पन्न झाला असेल त्याला या प्रकारचीं भिंगें असलेला चष्मा वापरावा लागतो. दूरदर्शित्वाचा दोष ज्याच्या नेत्रांत येतो त्याच्या नेत्रांतील भिंगांच्या अंगचा फुगीरपणा कमी होऊन त्या जागीं बराच चपटेपणा उत्पन्न झालेला असतो. त्यामुळें डोळ्यांतील भिंगांचें केन्द्रान्तर बरेचसें वाढतें व त्यामुळें पदार्थांची प्रतिमा नेत्रान्तःपटला(रेटिना)वर नीट पडत नाहीं. तेव्हां पदार्थांची प्रतिमा पटलावर यावी एतदरर्थ बाह्यगोलभिंगांचा उपयोग करितात.
ज्या वेळेस सुमारें आठ इंचावरील पदार्थ स्पष्ट दिसेनासा होतो तेव्हां दूरदर्शित्वाचा दोष उत्पन्न झाला असें समजण्याची वहिवाट आहे. अशा प्रकारचा दृष्टिदोष बहुधा वयाच्या चाळिसाव्या वर्षापासून सुरू होतो. व या दोषापासून नेत्रांचा बचाव करण्याकरितां ज्या साधनाचा उपयोग करतात त्यास‘चिळिशी’ हा शब्द लावण्यास सुरुवात झाली. ज्या मनुष्याच्या पूर्ववयांत समीपदर्शित्वाचा दोष कांहीं प्रमाणांत असेल त्याच्या अंगीं दूरदर्शित्वाचा दोष फार उशिरानें उत्पन्न होतो. समीपदर्शिदोष असलेल्या मनुष्याची दृष्टि वृद्धपणांत सुधारूं लागते आणि ही दृष्टि सुधारत सुधारत सामान्य मनुष्याच्या दृष्टीप्रमाणें होते व नंतर कांहीं काळानें दूरदर्शित्वाचा दोष हळू हळू उत्पन्न होऊं लागतो. हा दूरदर्शित्वाचा दोष मनुष्याच्या ठिकाणीं फारच वाढल्यास त्याला जवळचेंच काय पण दूरचें पहाण्याकरितां कमी शक्तीचें भिंग लागूं लागतें. जसजसें मनुष्याचें वय वाढूं लागतें तसतसा हा दूरदर्शित्वाचा दोष वाढूं लागतो. यामुळें वरचेवर डोळे तपासून योग्य त्या शक्तीचें भिंग असलेला चष्मा वापरणें भाग पडतें.
न लि का का र भिं गें. – कित्येक मनुष्यांच्या डोळ्यांतील भिंगांत जो फुगीरपणा किंवा चपटेपणा उत्पन्न होतो तो सर्व दिशेनें सारखा असत नाहीं. त्यामुळें कित्येकांनां सृष्टींतील वस्तू चपट्या दिसूं लागतात तर कित्येकांनां त्याच वस्तू उभट व चिंचोळ्या दिसूं लागतात. असल्या प्रकारचे दृष्टिदोष सुधारण्याकरितां निराळ्याच प्रकारचे चष्मे वापरतात. या प्रकारच्या चष्म्यांतील भिंगांचा आकार नलिकाकार असतो. अंतर्गोल किंवा बहिर्गोल भिंगांचा आकार भरीव वर्तुलच्छेदापासून उत्पन्न झालेला असतो. परंतु नलिकाकार भिंगांचा पृष्ठभाग नलिकांच्या आकाराचा असतो. त्यामुळें प्रकाशाचें विशिष्ठ रीतीनें वक्रीभवन होऊन दृष्टींत असलेला वरील प्रकारचा दोष सुधारला जातो. कित्येक मनुष्यांच्या डोळ्यांत दूरदर्शित्वाचा किंवा समीपदर्शित्वाचा दोष असून त्याबरोबरच नलिकाकाराचे दोष असतात. असल्या प्रकारच्या मनुष्याकरितां “संयुक्त” भिंग तयार करितात. या प्रकारच्या दोषयुक्त दृष्टीच्या मनुष्यास योग्य त्या प्रकारचें आणि शक्तीचें भिंग तपासून देणें बरेंच कठिण आहे. परंतु खटपट करून योग्य तें भिंग शोधून काढणें श्रमसाध्य आहे. व योग्य तें भिंग शोधून काढल्यास श्रमाचें सार्थक्य होऊन दृष्टीस अत्यंत फायदा होतो.