विभाग नववा : ई-अंशुमान
उपमन्यु – धौम्यॠषीचा एक शिष्य. हा गुरुगृहीं गायी राखीत असें. हा प्रथम उदरनिर्वाहार्थ मधुकरी मागत असे. तें गुरूनें बंद केल्यावर दुग्धप्राशन, नंतर वासराच्या तोंडावरला फेंस, यावर निर्वाह करी पण तोहि गुरूनें निषिद्ध मानल्यावर उपमन्यु रुईचा चीक खाऊन राहूं लागल्यामुळें अंधळा बनून एके दिवशीं विहिरींत पडला. धौम्यॠषि त्याच्या भक्तीनें प्रसन्न झाले व त्याला दृष्टी येण्यास अश्चिनीकुमारांची प्रार्थना करण्यास सांगितलें. तसें केल्यावर उपमन्यूला दृष्टि आली व दिव्य ज्ञान प्राप्त झालें [म. भा. आदि ३]
(२) वसिष्ठ किलोत्पन्न व्याघ्रपाद नामक ॠषीचा पुत्र व धौम्यॠषीचा ज्येष्ठ भ्राता. याची आई यास पाण्यांत पीठ कालवून दूध म्हणून देत असे. एकदां यास खरें दूध मिळालें तेव्हां त्यानें आईजवळ तसेंच दूध मागितलें तिनें ईश्वरापाशीं मागावयास सांगितल्यावरून त्यानें ईश्वराराधन करून आकल्प आयुष्य व क्षीरसागराचें आधिपत्य, अशीं संपादन केलीं. याची गणना शैवांत असून यानें शिवसहस्त्रनाम रचिलें आहे. कृष्णानेंहि याजपासून शैव दीक्षा घेतली होती. (भार. अनुशा. अ. १४ व पुढें) हा तंडी ॠषीचा शिष्य झाला. याची कथा लिंगपुराण (पू. १०७) व शिवपुराण ( उमा संवाद) यांतहि आढळते.