विभाग नववा : ई-अंशुमान
उपरि – खंडानें शेत घेऊन नांगरणार्या शेतकर्यांस, मिरासदारांपासून ओळखण्याकरितां ग्रँटडफच्या वेळीं उपरि ही संज्ञा देऊं लागले होते. मिरासदाराचें शेत त्याच्या स्वतःच्या मालकींचे असे व तें दुसर्यास विकण्याचा त्याला हक्क होता. मिरासदार जोपर्यंत सरकारांत नियमितपणें सारा भरीत असे, तों पावेतो सरकारास त्याचें शेत त्याजकडून काढून घेतां येत नव्हतें. उपरी कुळांची मात्र तशी गोष्ट नव्हती असें दिसतें. ते मिरासदारांपासून किंवा सरकारांतून दरवर्षी खंडानें जमीन घेऊन नांगरीत असत. अर्थात् मिरासदार लोक, जो ज्यास्तींत ज्यास्ती खंड देण्यास कबूल होई त्यास आपली जमीन देत असले पाहिजे हें सांगावयास नकोच. [ग्रँड. पु. पहिलें पान २४]