विभाग नववा : ई-अंशुमान
उपरिचर – उत्तानपादकुलोत्पन्न एक राजर्षि. एकदां देवराज इंद्र, आणि महर्षि, यांच्यामध्यें असा वाद पडला कीं, यज्ञांत पशुहिंसा करणें हें विहित कीं अविहित ? त्यांत विहितत्वाविषयीं इंद्राचा पक्ष असून तद्विरुद्ध महर्षीचा होता. इतक्यांत हा तेथें साहजिक गेला तेव्हां याचें मत विचारतां यानें इंद्राच्या बाजुनें मत दिलें म्हणून रागावून‘तूं अधोलोकीं पतन पावशील’ असा शाप महर्षींनीं यास दिला (मत्स्य पुराण अ. १४२). यानें अनेक यज्ञ केले होतेसें दिसतें (म. भा. शांतिपर्व अ. ३३६).
(२) एक चेदिराज वसु.इंद्रकृपेनें हा अंतरिक्षांतून विमानांतून संचार करीत असल्यानें याला उपरिचर असें नांव पडलें. शुक्तिमती नदीची गिरिका नांवाची कन्या याची स्त्री झाली. याचें वीर्य अद्रिका नांवाच्या मत्स्यरूपी अप्सरेनें भक्षिल्यामुळें तिला मत्स्यराज व मत्स्यगंधा असें कन्यापुत्राचें एक जुळें झालें. हीच मत्स्यगंधा पुढें सत्यवती नांवानें शंतनु राजाची पत्नी झाली. (म. भा. आदिपर्व अ. ६३)