विभाग नववा : ई-अंशुमान
उपेनंगडी – मद्रास. दक्षिण कानडा जिल्ह्यांतील तालुका. याचें क्षेत्रफळ १२३९ चौ. मै. असून १९०१ सालीं लो. सं. १,८१,८४२ होती. पत्तूर हें पोट विभागाचें मुख्य स्थान असून खेड्यांची संख्या १८२ होती. काळीचें उत्पन्न १९०३-०४ सालीं २३१ हजार झालें होतें. तालुक्यांत जंगल पुष्कळ आहे. वेलदोड्याचें पीक चांगल्या प्रमाणांत असून पत्तूरच्या आसपास नदीकिनार्याची जमीन सुपीक आहे. येथें हिंवताप फार असल्यामुळें पुष्कळ लोक म्हैसूर व कुर्ग प्रांतांत मजूरी करण्यास जातात. मुख्य पीक तांदुळाचें असून सुपारीच्या बागाहि बर्याच आहेत. नारळाचीं झाडें या ठिकाणीं चांगलीशी येत नाहींत. पूर्व सरहद्दीवर पश्चिम घांटाच्या कुद्रेमुख व सुब्रमण्य या दोन मुख्य टेंकड्या आहेत.