विभाग नववा : ई-अंशुमान
उप्लेटा. – मुंबई, काठेवाड, गोंडल संस्थानांतील एक शहर. हें जुनागडच्या ईशान्येस १९ मैलांवर मोज नदीच्या पश्चिम किनार्यावर वसलें आहे. लोकसंख्या १९११ सालीं १०१८५ होती. गोंडल संस्थानांत गोंडल, धोराजी यांच्या खालोखाल संपन्न असें उप्लेटा हें शहर आहे. या ठिकाणीं एक दरबार राजवाडा असून धोराजीला जाणारी एक पक्की सडक आहे. हें भावनगर-गोंडल-जुनागड-पोरबंदर-रेल्वेचें स्टेशन आहे.
ऐनी-अकबरींत सोरठ सरकारचा एक परगणा म्हणून उप्लेटाचा उल्लेख आहे. मिरत-इ-अहमदींत या परगण्यांत ५३ गांवें असल्याचें लिहिलें आहे. शेरखान बाबी स्वतंत्र झाल्यावर उप्लेटा जुनागडच्या हद्दींतला एक तालुका म्हणून गणला जात असे. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धांत हा गोंडल राजाकडे गेला. [मुं. गॅ. ८. इं. गॅ. २४].