विभाग नववा : ई-अंशुमान
उंबर, नां वे.-सं.= उदुंबर. गुज.= उंबरो. हिं.= उदुंबर, गुलर. बं.= यशडुमुर राज. पु.= उमरो. क.= अति. तैलं.= अत्तिमानु. तामिळ = अतिमार. फार. = अंजीरे, आदम. इं.= फिग ट्री. लॅटिन.= फिकस ग्लोमिराटा.
काश्मीरच्या पूर्वेकडील हिमालयाचा भाग, आसाम, बंगाल, ब्रह्मदेश व पश्चिम हिंदुस्थान आणि सिंहलद्वीप या प्रदेशांत हें झाड दृष्टीस पडतें. याचीं फळें अंजिरासारखीं असतात. तीं कच्चीं व पिकलीं दोन्हीहि खातात. दुष्काळांत तर त्यांचा फार उपयोग होतो. पानें हत्ती व गुरें यांना चारा म्हणून उपयोगी पडतात. लांकूड टिकाऊ नसतें तरी, त्याचीं दारें, गाडीचीं आडवीं दांडकीं वगैरे ओबडधोबड जिनसांकरितां उपयोग करितात. स्वयंपाक वगैरे करण्याच्या कामीं याच्या लांकडांचा सर्पणाकडे उपयोग करीत नाहींत. हा यज्ञिय वृक्ष असून याच्या समिधांचा (काटक्यांचा) श्रौत व स्मार्त कर्मांत उपयोग करितात. व लांकडाची यज्ञिय उपकरणेंहि करितात. (ज्ञानकोश वि. तीन पूर्वार्ध पृ. २३२ पहा.)
उंबराची साल, पानें व कच्चें फळ ह्यांच्या अंगीं स्तंभक धर्म असल्यामुळें त्यांचा आमांशादि रोगांत पोटांत देण्याच्या कामीं व बाह्योपचाराच्या कामींहि उपयोग करितात. तोंडांत अथवा जिभेस गरे पडले असतां फळें पोटांत देतात. उंबर दुधांत शिजवून दिले असतां पोटांतील इंद्रियांच्या मार्गांत कांहीं अडथळा असल्यत्स तो दूर होतो. उंबराच्या फळांचा मधुमेहांत चांगला उपयोग होतो. पाण्यांत फळें व पानें शिजवून त्या पाण्यानें स्नान करीत राहिल्यास महारोग दूर होतो असें म्हणतात. सालीच्या अंगीं रेतस्तंभक धर्म असून तिळाच्या तेलांत तिची वस्त्रगाळ पूड मिसळून दुष्ट व्रणावर लावितात. मधुमेहांत सालीचा काढा घ्यावा. कोवळ्या पानांची पूड करून मधाच्या अनुपानांत पित्तविकारावर देतात. उंबराच्या मुळीस फांसण्या टाकून त्यांतून निघणारा पातळ पदार्थ अथवा उंबराचें पाणी पौष्टिक म्हणून पोटांत देतात.
उंबराच्या झाडाखालीं किंवा जवळच पाणी लागतें असें म्हणतात. उंबराखालीं दत्ताचें वास्तव्य असतें असा समज असल्यानें त्याची पूजा करण्यांत येते. व झाड तोडणें हेंहि गर्ह्य मानलें जातें. इतर झाडांप्रमाणें उंबराला प्रथम फूल व नंतर फळ असा प्रकार होत नसून एकदम आपणांला फळच दृष्टीस पडतें. तेव्हां सशाच्या शिंगाप्रमाणें तें अशक्य व दुर्लभ असा समज होऊन‘उंबराचें फूल’ (दुर्मिळ वस्तु) ही म्हण पडली आहे.
[ पदे. भिषग्विलास पु. २१ वाट. दत्त-मटी. मेडि, हिंदु १९०० बोटॅनि. सर्व्हे इंडिया २,३ ].