विभाग नववा : ई-अंशुमान
उंब्रज. – हें खेडेगांव पुणें-बेळगांव रस्त्यावर असून कर्हाडच्या वायव्येस १० मैल व सातार्याच्या आग्नेयस चार मैल अंतरावर आहे. येथील लोकसंख्या सुमारें ३००० आहे. याच्या जवळ कृष्णा, तारळी व मांड या नद्यांचा संगम होतो. मांड नदी जेथें मिळते तेथून पाटणांतल्या मल्हारपेठेंतून चिपळूणाकडे जाण्यास रस्ता आहे. याच्या पूर्वेंकडील कच्या रस्त्यावरून थोडा व्यापार चालतो. येथें या जिल्ह्यांतील एक अती जुनी व मोठी सावकारपेढी आहे. येथील बाजार रस्ता मोठा व प्रशस्त आहे. येथून मिरच्या, भूईमूग व तांदूळ सांगली, मिरज व चिपळूणास जातात व चिपळूणाहून मीठ, खजूर आणि किराणा माल येथें येतो. पाल व तारळ्याहून लुगडीं व खण येतात. येथें एक मराठी शाळा, एक पोष्ट ऑफीस आणि इंजिनीयर खात्याचा एक बंगला आहे.