विभाग नववा : ई-अंशुमान
उमत्तूर – म्हैसूर. म्हैसूर जिल्ह्यांतील चामराजनगर तालुक्यांतलें एक गांव. नंजनगड रेल्वे स्टेशनपासून १५ मैल आहे. १९०१ साली लो. सं. २०८१ होती. दक्षिण म्हैसूरांत उमत्तूरचें संस्थान बलिष्ठ संस्थानांपैकीं एक होतें. शिवसमुद्रम बेटावर त्यांनीं एक किल्ला बांधला होता. निलगिरीचा कांहीं भाग त्याच्या सत्तेखालीं होता. १६ व्या शतकाच्या आरंभीं गंगराजानीं स्वतंत्र होऊन बंगलुर जिल्हा व त्याच्या आसपासचा प्रदेश संपादन करून पेन्नुकोंडावरहि ते हक्क सांगूं लागले. १५१० त विजयानगरच्या कृष्णरायानें त्याचा पाडाव केला. म्हैसूरच्या घराण्याचे पूर्वीचे प्रतिस्पर्धी अमत्तूरचे राजे असत. शेवटीं १६१० त म्हैसूरच्या राजांनीं तें घेऊन १६१३ त अमत्तूरहि काबीज करून म्हैसूरला जोडिलें. आतां चामराजनगर येथें चामराजेश्वराचें मंदिर आहे त्याजकडे देणगीरूपानें आहे.