विभाग नववा : ई-अंशुमान
उमरकोट, ता लु का– मुंबई. सिंध. थर आणि पारकर जिल्ह्यांतील एक तालुका. क्षेत्रफळ १४६१ चौ. मै. असून लो. सं. (१९०१) ४९११८ होती. तालुक्यांत खेड्यांची संख्या ११० असून मुख्य शहर उमरकोट हेंच होय. मुख्य पीक बाजरीचें असून काळीचें उत्पन्न १९०३-०४ सालीं १.६ होते.
गां व. – मुंबई. सिंध. थर आणि पारकर जिल्ह्यांची मुख्य जागा १९०१ सालीं लो. सं. ४९२४ होती. नार्थवेस्टर्न रेल्वेवर कोर नांवाचें स्टेशन आहे. तेथून उमरकोट ७ मैल लांब आहे. या ठिकाणीं एक मोठा किल्ला असून यावर ४०० शिंबदी राहूं शकते. सुमारें ७०० वर्षांपूर्वीं तो बांधलेला असावा असा अंदाज आहे. सांप्रत सरकारी आफीसें किल्ल्यांत असून गांवांतील लोकांचा मुख्य धंदा शेतकी व गुरांची जोपासना हा आहे. हिंदु लोकांचें लक्ष्य व्यापाराकडे असल्यामुळें बरेच हिंदु श्रीमंत आहेत. स्थानिक व्यापार धान्यें, तूप, उंट, गुरें आणि तंबाखु यांचा चालतो. कापसाचा जाड कपडा विणून तयार करितात. उमर नांवाच्या एका पठाणानें हें शहर वसविलें म्हणून यास उमरकोट हें नांव पडलें असें सांगतात. सन १५४२ त अकबर येथें जन्मला. अकबराची जन्मभूमि म्हणून एक शिला असून तिजवर लेख आहे ती दाखवितात. अकबर बादशहा झाल्यावर त्यानें रजपुतांपासून उमरकोट घेतलें. नंतर १८४३ सालीं तें इंग्रजांकडे आलें. उमरकोटहून ३ मैलांवर एक महादेवाचें देऊळ असून हिंदु लोक दर्शनार्थ पुष्कळ येतात. १८६० त म्यु. कमिटी स्थापन झाली. १९०३-०४ सालीं उत्पन्न १४ हजार होतें. एक दवाखाना, दोन प्राथमिक शाळा असून तिला एक सुतार व लोहार वर्ग जोडलेला आहे.