विभाग नववा : ई-अंशुमान
उमर खय्याम. - फारसी ज्योतिषी व कवि. हा निशापूरचा रहिवाशी होता. याच्यासंबंधीं बर्याच दंतकथा ऐकिवांत आहेत, पण त्याचें खरेंखुरें चरित्र अद्याप अज्ञात आहे. इ. स. १८९७ पासून कांहीं विश्वसनीय पुरावे पुढें आलेले आहेत यांत शंका नाहीं. खय्याम किंवा खय्यामी हें आडनांव आहे, पण त्यावरून उमर किंवा त्याचा बाप तंबू तयार करणारा होता असें म्हणतां येणार नाहीं. उमरचा जन्म व मृत्युकाल अनिश्चित आहे. तो बहुधा इ. स. १०२५-५० यामधील कालांत जन्मला असावा. त्याचा समकालीन निझामी अरुदी याचा पुरावा लक्षांत घेतां, उमर १११५ आणि ११३५ याच्या दरम्यान वारला असावा असें दिसून येईल. वाङ्मय, सृष्टिशास्त्र, धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान आणि वैद्यक या विषयांचें उमरला शिक्षण मिळाले होतें. त्यानें बरेच ग्रंथ लिहिले असें म्हणतात. आपल्याला भूमिति व बीजगणित यांवरचे त्याचे ग्रंथ उपलब्ध आहेत. तो ज्योतिषाचा धंदा करी. जलाली शक सुरू करण्यांत त्याचें प्रमुख अंग होतें. सुलतान मलिकशहा वारल्यानंतर (इ. स. १०९२) उमरनें निशापूर सोडलें.
उमरची जी प्रसिद्धि आहे ती त्याच्या काव्यरचनेमुळें. ‘रुबाईय्यात’ नांवाचे त्यानें बरेच फारसी श्लोक लिहिले. आज जे रुबाई त्याचे म्हणून मानले जातात त्यांपैकीं बरेचसे दुसर्या कोणाचे तरी असून ते त्याच्या नांवावर दडपून दिलेले आहेत. बोडलियन लायब्ररींतील इ. स. १४६१ च्या हस्तलिखितांत फक्त १५८ रुबाई आहेत. तेव्हां उमरच्या म्हणून गणल्या जाणार्या रुबाईवरून त्याचा खरा स्वभाव आपणांस कळणार नाहीं. १३ व्या शतकांतील दोन फारसी ग्रंथकार आपण आधाराला घेतल्यास कांहीं थोडासा प्रकाश पडणार आहे. इब्नुल किफ्ती म्हणतो कीं उमरनें आपला धर्मलंडपणा लपविण्याचा प्रयत्न केला व आपलें खरें मत पुढें मांडण्याला कचरला. त्याच्या काव्यासंबंधीं इब्नुल किफ्तीचा शेरा असा पडतो कीं, उमरचें काव्य बहुतेकांच्या आवडीचें झालें असून, त्याचें अंतरंग परीक्षण करणार्यांस तें अधार्मिक स्वरूपाचें आढळून येई. तथापि कधीं कधीं त्याचा आशय सुफींच्या शिकवणीस अनुसरून असे. नज्मुद्दीन दाय (इ. स. १२५६) हा ग्रंथकार उमरला नास्तिक, भौतिकवादी म्हणून शिव्या देतो. पण श्रद्धाळु सुफी तत्वज्ञान्यांचा उमरसारख्या शास्त्रज्ञांवर हा आरोप नेहमीं असणारच. उमरच्या म्हणून ज्या रुबाई निश्चित झाल्या आहेत त्यांत सुखप्रयोजनता विवेचिली आहे; अपवित्र चर्चेचा निषेध केला आहे; जुन्या लोकांवर हल्ले चढविले आहेत; दैवदुर्विलासाबद्दल शोक दाखविला आहे; सांसारिक आपत्ती व अत्युच्च बुद्धि यांतील विरोध, मनुष्यप्राण्याचें क्षुद्रत्व, दैवी कृपेची आशा व जीमध्यें दुसर्याचें चांगलें करण्याचें कर्तव्य येतें अशी एक नीति यांसारख्या विषयांवर त्याचे विचार ग्रथित केलेले आहेत. तथापि सुफींचा गूढवाद त्यांत सांपडणार नाहीं. समाजांतील दुःखीकष्टी लोकांकरितां तळमळ व अज्ञानी आणि ढोंगी भिक्षुकांबद्दल अनादर या गोष्टींमुळेंच उमर खय्यामला इराणचा किंवा पौरस्त्य व्हालटेअर म्हणतात; पण उमरचा रंगेलपणा या फ्रेंच तत्त्वज्ञानांत नव्हता. तात्त्विक विचारांत व काव्यकल्पनेंत सध्या जो निराशावाद दिसतो तो उमरच्या रुबाईमध्येंहि आढळतो. [रेनॉल्ड निकलसनचा ए. रि. ए. मधील‘उमर अलखय्याम’ वरचा लेख; ब्रौने-ए लिटररी हिस्टरी ऑफ पर्शिया. ए. ब्रि. बील.]