विभाग नववा : ई-अंशुमान
उमरखान (१८६०-१९०३) – हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवरील जांडोलचा हा पठाण संस्थानिक १८९५ मधील चित्रळवरच्या मोहिमेस कारणीभूत झाला होता. जांडोलच्या खानाचा हा धाकटा मुलगा. पण यानें आपल्या थोरल्या भावाला मारून राज्य बळकाविलें व सरहद्दीवर प्रबल होऊन राहिला. १८९४ मध्यें सबंध बाजौरवर त्याची सत्ता होती. तो महत्त्वाकांक्षी असल्यानें चित्रळच्या अंतस्थ कलहांत पडला, तेव्हां हिंदुस्थान सरकारला मध्यें पडून उमरखानला चित्रळहून हांकून देणें भाग पडलें. चित्रळची मोहीम या कारणाकरितांच निघाली होती. उमरखान अफगाणिस्तानांत जाऊन राहिला व त्या ठिकाणीं १९०३ मध्यें वारला.