विभाग नववा : ई-अंशुमान
उमरखेड - मध्यप्रांत. जिल्हा यवतमाळ, तालुका पुसद. पुसदगांवाहून रस्त्यानें ४३ मैलांवर गांव आहे. लोकसंख्या १९०१ मध्यें ४५७० होती. येथें दवाखाना, पोलिसकचेरी आणि एक सरकी काढण्याचा कारखाना आहे. हें पूर्वीं परगण्याचें ठिकाण असून साधारण महत्त्वाचें होतें. सन १७५० च्या सुमारास हें ठिकाण पेशव्यांकडे आलें, आणि १८१८ सालीं पुण्यास पराजय झाल्यानंतर पूर्वेंकडे जात असतांना, पेशव्यांनीं या ठिकाणीं मुक्काम केला होता. साधूमहाराज नांवाचे कोणी ब्राह्मण होऊन गेले. त्यांना ज्या ठिकाणीं अग्नि दिला त्या ठिकाणीं एक लहानसें देवालय आहे. इ. स. १८७० सालीं गोमुखस्वामी नांवाच्या एका साधुपुरुषानें हें आपलें राहण्याचें मुख्य ठिकाण केलें. याला सर्व लोक गोचर स्वामी म्हणत व तो आपणांस कोणी चिंतामण भट यांचा शिष्य म्हणवीत असे. हा भिक्षा मागून दानधर्म व अन्नसंतर्पण करीत असे.
उमरखेड येथें साधुपुरुषांना पुष्कळ इनाम जमिनी दिलेल्या आहेत. जवळच असलेल्या अंबोना तलावाचा एका काळीं बागाईतीकरतां उपयोग करीत असत. परंतु हल्लीं तसें कोणीं करीत नाहीं.